Saturday, April 29, 2006

विडंबन - फिरले रे ग्रह माझे फिरले रे ...

अलिकडेच काही खासदारांना sting operation प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतांना दाखवले होते. त्यांच्या मनात आता हेच गाणे सुरु असेल

चाल : फुलले रे क्षण माझे फुलले रे....

फिरले रे ग्रह माझे फिरले रे
ओढीने, पैशांच्या, पैशांच्या ओढीने, भुलले रे मन माझे भुलले रे

लेकरे टी.व्हीची आली रे घेउन मागणी माझ्यापुढे
गरीब घराची जाणीव होऊन धावले मन वेडे
या वेडाने, या वेडाने, लावीले शनीचे फेरे
ओढीने, पैशांच्या ओढीने, तुटले रे जन माझे तुटले रे
फिरले रे ग्रह माझे फिरले रे....

विचार सोडुन, मनासी मोडुन, पैसे ते स्विकारले
पैशांना जागुन, सभेत जाउन, प्रश्नही विचारले
त्या चोरांनी, त्या चोरांनी, ठेवले होते कॅमेरे
ओढीने, पैशांच्या ओढीने, मोडले रे घर माझे मोडले रे
फिरले रे ग्रह माझे फिरले रे....

- सुभाष डिके

कंडक्टर

आमच्या लहानपणी आम्ही एक कोडं घालत असु

कागद फाडतो पण वेडा नाही,
पैसे मागतो पण भिकारी नाही,
घंटा वाजवतो पण पुजारी नाही,.. ओळखा पाहु कोण

उत्तर अर्थातच कंडक्टर..

प्रत्येकाच्या लहानपणी हेवा वाटणार्‍या अनेक व्यक्तींपैकी कंडक्टर हा एक नक्की असेल, मग तो कुठल्याही कारणा मुळे असेल, त्याच्या कडे एवढे पैसे मिळतात जमा होतात मग ते त्याच्याकडेच रहात असतील काय?, किंवा त्याला किती तरी गाव फुकट फिरायला मिळतात वैगरे.

कंडक्टर या व्यक्तीविशेषाशी आपला अनेक वेळा संबंध येत असतो, सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत महत्वाचा भाग असलेला हा कंडक्टर. कंडक्टर ला मराठीत वाहक हे नाव आहे पण कंडक्टर मधे जो जोर आहे तो वाहक या शब्दात नाही. मी प्रत्येक वेळा गाडीत बसलो की या कंडक्टर्चे निरिक्षण करत असतो, शक्य असेल तर कंडक्टर च्या शेजारचीच जागा मिळवतो. प्रत्येक कंडक्टरने दाढीचे खुंट वाढवलेलेच असावेत असा त्या खात्याचा अलिखित नियम असवा बहुधा, कारण जवळ्पास ९०% कंडक्टर तसेच येतात नेहमी, आणि जो दाढी वैगरे व्यवस्थीत करुन आला आहे तो नवशिका आहे असं समजावं. त्याच प्रमाणे आणखी एक वैशीष्ट्य म्हणजे बर्‍याच कंडक्टर ना चष्मा नसतो, म्हणजे कंडक्टर मधे चष्मा असणार्यांची संख्या खुपच कमी असावी, असे नसेलही बहुतेक पण मला तरी तसे बर्‍याच वेळा जाणवले. काही कंडक्टर आतुन त्यांचा नेहमीचा शर्ट घालुन मग वरुन Uniform चढवतात.

कंडक्टर च्या विश्वात अनेक गोष्टि आपल्या आकलनापलिकडील असतात एस. टी. चे कंडक्टर आपल्या बरोबर एक पेटी नेहमी बाळगतात,मला वाटतं त्यांना ही पेटी खात्या कडुन मिळत असावी बहुधा कारण आत्ता पर्यंत मी पाहीलेल्या सर्व पेट्या एकाच प्रकारच्या होत्या. ही पेटी कंडक्टरच्या सीट च्यावर साखळीने बांधुन ठेवलेली असते, या पेटीत नेमके काय असते कुणास ठावुक. कंडक्टर ना आपल्या कडील एका कागदावर कसल्या तरी नोंदी कराव्या लागतात, ते नेमके काय लिहितात हे पाहण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला, पण Doctor च्या prescription सारखीच कंडक्टर च्या नोंदीची एक विशिष्ठ लिपी असते, आणि ती कदाचित फक्त त्यंच्याच अधिकार्‍यालाच वाचता येत असावी. कदाचीत तिकिट किती संपले असे लिहित असावेत. एवढ्या हालणार्‍या गाडीत बसुन सुद्धा ते अगदी व्यवस्थीत लिहित असतात. मला वाटते यांना Retirement नंतर घरी काही लिहायचे असेल तर एक सतत हालणारा टेबल लागत असेल. या नोंदी
प्रमाणेच तिकिटावर कुठे पंच मारावा लागतो हे ही एक वैशिष्ट्य, मला वाटते टप्प्यांप्रमाणे पंच मारत असतील, पण त्यात वेगळे पण असे की एस. टि च्या बस मधे पासुन आणि पर्यंत अश्या दोन्ही ठिकाणि पंच करतात पण शहर बस सेवेत मात्र केवळ एकाच ठिकाणी पंच करतात. मी बंगळुर शहरात तर एक वेगळाच प्रकार अनुभवला, तिथे तिकिट काढुन तुमच्या हातात देतांना त्यावर पंच करत नाही, त्या ऐवजी थिएटर मधे फाडतात तसे तिकिट पाडतात, (दोन भाग करत नाहीत) आणि मग तुमच्या हातात देतात. अशीच आणखी एक गोष्ट म्हणजे, समजा चालु गाडिमधे गर्दी कमी आहे आणि कंडक्टर पुढच्या दरवाजात उभां राहुन Driver सोबत बोलत असेल, त्याच वेळी जर कुणाला उतरायचे असेल तर कंडक्टर घंटीच का मारतो कुणास ठावुक, कधिही तो Driver ला तोंडने थांब म्हणत नाही, अगदी बाजुला उभा असेल तरीही.

कंडक्टर च्या स्वभावाचे अनेकविध नमुने आपण सर्वांनीच अनुभवले असतील. Electronics मधे Good Conductor आणि Bad Conductor अशी concept असते, ती खरी ठरते या कंडक्टर च्या बाबतीत सुद्धा. काही कंडक्टर रागीट असतात, काही अगदिच सौम्य, काही गोंधळलेले असतात तर काही अगदिच तरतरीत.सकाळी सकाळिच तुमची एखाद्या रागीट कंडक्टर सोबत मुलाखात झाली मी मग दिवसाची सुरुवातच खरब होते, हे रागीट कंडक्टर मंडळी या ना त्या कारणाने नुसते ओरडत असतात, मग ते तिकिटासाठी असेल, सुट्ट्या पैशांसाठी किंवा नुसत्याच पुढे सरका पुढे सरका अश्या आरोळ्या असतील., या उलट काही कंडक्टर चा खुपच चांगला अनुभव येतो, अनोळखी माणसाला त्याच्या पत्त्या प्रमाणे नेमके कुठे उतरणे सोयीचे पडेल हे सांगतील एवढेच नव्हे तर उतरल्यानंतर कुठली बस पकडावी ते सांगतील, गर्दी झाली तरी अत्यंत सौम्य शब्दात "अहो पाटिल पुढे चला", "ताई, तुम्ही बसु शकता" वैगरे अशा शब्दांनी बोलावतात. अशा कंडक्टर च्या बस मधुन गेलात की मग प्रवासाचा शिण बर्‍यापैकी निघुन जातो. कंडक्टर चा सर्वात मोहक प्रकार बघायचा असेल तर तो छोट्या गावाकडील मुक्कमी गाडीत बघावा, संध्याकाळी तालुक्याच्या गावावरुन गाडी निघते, आणि मग तिकीट काढता काढता कंडक्टर साहेब वैयक्तीक चौकशी सुरु करतात, रोजचीच गाडी असल्यामुळे त्याची प्रत्येकाशी ओळख असतेच, मग "काय पाटील साहेब, झालं का कोर्टाचं काम?", "काय रे बाळ्या कसा गेला पेपर?","काय जावईबापु,दिवाळसण वाटत?", "काय तात्या, काय म्हणाले doctor ? ", अशा गप्पा सुरु होतात.

कंडक्टरचं काम तस पहाता खुप कौशल्याचं असतं,विशेष म्हणजे शहरातील गाड्यांचे कंडक्टर. जेमतेम उभं राहण्यापुरती जागा, आणि त्या तेवढ्याश्या जागेतुन इकडुन तिकडे तिकिट द्यायचे (ते सुद्धा पैशाचा हिशोब न चुकु देता), दोन दोन मिनिटांवर येणारे थांबे बघुन बेल मारायचि, मधेच एखादा अतिउत्साही व्यक्ती स्वतःच बेल मारतो, मग त्याच्यशी जुंपते, सुट्ट्या पैशांचा गोंढळ होतो, मधेच एखाद्या महीला आरक्षीत सीट वर कुणी पुरुष बसलेला दिसतो त्याला उठवावे लागते, अशा अनेक प्रसंगाना त्याला एकाच वेळी तोंड देत त्याला गाडी शेवट पर्यंत न्यायची असते. अनेकदा कंडक्टर गाडीच्या खाली राहुन गाडी निघुन गेल्याचे आपण पेपर मधुन वचतच असतो. अश्या अनेक प्रसंगाना कंडक्टर ला तोंड द्यावे लागते, एस. टी च्या कंडक्टर वर ही वेळ अनेकदा येते आडवळणाच्या एखाद्या गावात गाडी बिघडते, मग ती ढकलण्यासाठी लोकं गोळा करण्याचं काम कंडक्टर कडेच येत असतं. अपघात वैगरे झाला तरी कंडक्टर लाच त्याची सुचना द्यावी लागते, प्रवासी मंडळी मधे आपापसात होणार्‍या भांडणात सुद्धा त्यालाच हस्तक्षेप करावा लागतो. प्रवासी मंडळि सुद्ध कंडक्टर सोबत खेळ खेळत असतात, मुलाचे वय हाफ तिकिट काढण्या इतपत आहे हे पटवण्यात आई वडील दंग असतात तर त्यचे वय पुर्ण तिकिट घेण्या एवढे आहे हे कंडक्टर पटवुन देत असतो., तोच प्रकार ६५ वर्ष्याच्या सवलतीचा.कधी कधी एखादा प्रवाशी एक्-दोन रुपये कमी आहेत तरी पण तिकिट द्या असा आग्रह धरतात तर काही माझ पाकीट हरवलं मला बसु द्या अश्या विणवण्या करतात. अशा वेळी कंडक्टर निष्कामकर्मयोग साधत असतील. आही कंडक्टर महाचालु असतात, लोकांचे तिकिट दिल्यानंटर सुट्टे पैसे देण्याचे टाळतात, आणि मग लोकांच्या विसरण्याच्या गुणांमुळे ते पैसे त्यंनाच मिळुन जातात. मी तर असे अनेक वेळा एक्-दोन रुपये विसरुन गेलो आहे. प्रत्येक वेळी पैसे विसरल्यावर आता पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवायचे ठरवतो, आणी पुढच्या वेळि कंडक्टर पैसे उतरतांना घ्या असे सांगितले की उतरे पर्यंत पैसे घेउयात, नाही दिल्यास त्याची तक्रार करुयात वैगरे अनेक कल्पना सुचुन जातात, आणि नेमका तो कंडक्टर प्रामाणिक निघतो आणि आठवणीने पैसे देतो.

कंडक्टर मधे काही विशेष गुण असावे लागतात, या कंडक्टरची निवड प्रक्रिया कशी असते माहीत नाही पण मला वाटते त्यांना असे प्रश्न विचारत असावेत ,"अमुक गावावरुन तमुक गावा पर्यंत पाच फुल आणि तीन हाफ चे किती पैसे होतील", "... गावावरुन... गावाचे अंतर किती", "एक गाडी दोन तासाच्या प्रवासात पाच वेळा थांबली तर तिचा स्पीड ओळखा".. वैगरे. या कंडक्टर ना आपली पैशाची bag सांभाळण्याचे एक विशेष प्रशिक्षण देत असावेत कारण त्यात नेहमी एवढे पैसे असुनही ती bag चोरीला गेल्याचे मी तरी कधी ऐकले नाही, त्याच बस मधुन महीलांची पाकीटे पळविली जातात पण कंडक्टरची bag मात्र सुरक्षीत असते. कंडक्टर च्या व्यवसायात वेंधळेपणा आजिबात चालत नसेल्कारण प्रत्येक दिवशी संध्याकाळी तिकिटाचे पैसे जमा करतांना तिकिटे आणि पैसे यांचा हिशोब जुळलाच पाहीजे.

कंडक्टरच्या जीवनात हाल सुद्धा कमी नसतात. कामाचे तास कमी जास्त होत रहातात, गाडीतच झोपावे लागते,जेवण कुठे आणि कसे मिळेल याची शाश्वती नाही, गाडी कितिही निसर्गरम्य स्थळामधुन जात असेल तरीही बाहेर लक्ष देता येत नाही, गाडीत झोपता सुद्धा येत नाही, नेहमी लक्ष प्रवाश्यांकडेच, घरापासुन बर्‍याचदा दुर रहाणे, मुलांकडे दुर्लक्ष असे एक ना दोन अनेक समस्या असतात.

चित्रपट सृष्टीचे सुद्धा या कंडक्टर कडे लक्ष जात असते, मेहमूद ने साकारलेला कंडक्टर आपणा सर्वांना
आठवत असेल. मराठी चित्रपटातुन तर नेहमी कंडक्टरची व्यक्तीरेखा हमखास आढळते. आणि तेच त्याची आपल्या जीवनातील अपरिहार्यता प्रकट करते. कंडक्टर कडे तसे विशेष कोणीही लक्ष देत नाही, कारण त्याच्या व्यतीरिक्त बघण्यासारख्या, विचार करण्या सारख्या अनेक गोष्टी असतात. थोड्या वेळाच्या प्रवासाचा सोबती असणार्‍या या कंडक्टर वर काही लिहावसं वाटला म्हणुन आपला हा छोटासा प्रयत्न..

सुभाष डिके

माझे सरसगड दुर्गभ्रमण

माझे सरसगड दुर्गभ्रमण

३१ डिसेंबरची रात्र सह्याद्रीवर साजरी करण्याचा बेत आखला होता पण काही कारणास्तव तो बेत सिद्धीस जाउ शकला नव्हता. त्यामुळे २००६ चा पहीला रविवार तरी निदान सह्याद्रीसोबत घालवावा अशी इच्छा होती, त्यासाठी शनिवारी जी.एस. ला विचारले पण तो खुपच busy असल्यामुळे येउ शकणार नसल्याचं कळलं, पण माझं मन स्वस्थ बसु देईना. कुणी आलं नाही तर एकट्यानं का होईना पण या रविवारी कुठेतरी जायचचं असा निश्चय केला. आणि त्या दृष्टीने कुठे जाता येईल असा विचार सुरु केला असता सर्वात प्रथम सरसगडाचं नाव डोळ्यासमोर आलं. मागच्या वेळी आम्ही सरसगड सर करायला गेलो असतांना एक छोटासा अपघात घडल्यामुळे ट्रेक अर्धवट सोडुन परतावं लागलं होतं त्यामुळे एकट्याने जाउन हा ट्रेक करण्याकडे मन झुकले आणि मी सरसगडावर जाण्याचं नक्की केलं.
सकाळी साडेसात-आठच्या आसपास घराच्या अगदी बाजुला खोपोली नगरपरिषद परिवहनाची लोणावळा खोपोली ही बस पकडली आणि साधारण नऊ वाजता खोपोलीमधे पोहोचलो. सरसगड हा किल्ला अष्टविनायकापैकी एक असणाया पाली गावात आहे. त्यामुळे पाली गावात जाण्यासाठी खुप बस मिळतील अशी माझी समजुत होती. खोपोलीमधुन पाली गावात जाण्यासाठी बसची वाट पहात होतो पण खुप वेळ झाला तरी कुठलीच बस मिळेना पण शेवटी पुणे-रोहा पालीमार्गे अशी एक तुडंब भरलेली बस मिळाली. बरेच दिवस झाले एवढे अंतर बसमधुन उभे राहुन जाण्याचा प्रसंग आला नव्हता आता दुर्गभ्रमणामुळे ती वेळ आली होती. मग अत्यंत खराब अशा रस्त्यातुन पालीगावाकडे प्रवास सुरु झाला. अर्थात उभा राहणायांना बसणायापेक्षा कमी धक्के बसत होते. कशिबशी गाडी साडेअकराच्या आसपास पाली गावात पोहोचली. उतरल्याबरोबर भुकेची जाणीव झाली मग लगेचच एका हॊटेलमधे जाउन पोटपुजा करायला सुरुवात केली. बाजुच्याच टेबलवरची काही मंडळी होटेल मालकाला 'गडावर कसे जायचे?','पाण्याचं सोयं काय?' वैगरे प्रश्न विचारत होते. त्यावरुन ती ट्रेकर मंडळी आहेत हे मी ओळखले आणी पुढे होउन त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. गप्पांमधे कळले की त्यांचा सिंहगड ग्रुप नावाचा ग्रुप होता आणि नुकताच सरसगड उतरुन आता ते सुधागडावर निघाले होते. जवळपास पन्नास जण होते आणि निघतांना मला त्यांनी चला तुम्ही सुद्धा सुधागडावर आमच्या बरोबर असा आग्रह केला पण माझ्या मनात एकट्याने सरसगड सर करण्याचा निश्चय असल्यामुळे त्यांना नकार द्यावा लागला. मग त्यांना शुभेच्छा देउन मी निघालॊ.
मागच्या वेळी मी येउन गेलेला असल्यामुळे मला गडावर जाण्याचा रस्ता ठाउक होता पण तरी खात्री करावी म्हणुन मी एका गावकयाला रस्ता विचारुन घेतला. आणि त्याने सांगितलेल्या वाटेवरुन पुढे निघालो. सरसगडावर जाण्यासाठी दोन मुख्य वाटा आहेत. पहिल्या वाटेवरुन जाण्यासाठी पाली गावात यावे लागते. गणपतीच्या मागच्या बाजुने जाणाया रस्त्यावरुन डाव्या बाजुला वळावे आणि समोर एक वाट सोंडेवर जातांना दिसते ती सरळ बुरुजाच्या पायथ्याशी घेउन जाते. दुसरा रस्ता म्हणजे पाली च्या साधारण १ कि.मी. अलिकडे तळई नावाचे एक गाव लागते त्या गावातुन सुद्धा गडाच्या सोंडेवर चढता येते. पाली गावातुन जाणाया रस्त्याने गेल्यास बुरुजावर जाण्यासाठी पायया लागतात आणि त्या पायया ओलांडुन गेल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. तळई मधुन जाणाया रस्त्याने गेल्यास मात्र बुरुजावर जाण्यासाठी बांधलेल्या पायया नाहीत पण कातळात काही खोबणी आहेत त्यामधुन चढावे लागते. मी पाली गावातल्या रत्याने निघालो आणि मुख्य सोंडेवर येउन पोहोचलो. आता खाली पाली गाव दिसत होते आणि समोर सरसगडाचे बुरुज. सरसगडावर झाडांची संख्या खुपच कमी आहे आणि जी थोडेसे झाडे आहेत ती सुद्धा खुरटे. आणि होते नव्हते तेवढे गवत सुद्धा जाळून टाकलेले दिसत होते. त्यामुळे सावली साठी कुठे थांबण्याची सुद्धा सोय नव्हती आणि उन्हाचा मात्र जबरदस्त तडाखा होता. भर दुपारी बारा वाजताच्या सुमारास कडक उन्हात चढणे अतिशय अवघड जात होते. थकल्यानंतर खाली सुद्धा बसता येत नव्हते आणि तशाच परिस्थीत पुढे चालावे लागत होते.
मी माझ्याबरोबर पाण्याचा चार बाटल्या घेउन जात होतो पैकी एक बाटली केंव्हाच संपली होती. थोडेसे पुढे गेल्यावर एक थोडेस बरे वाटावे असे झाड दिसले मग झपाट्याने ते झाड गाठले. त्याच्या सावलीत जाई पर्यंत एवढा थकवा जाणवत होता की पोहोचल्याबरोबर स॔क फेकुन देउन आडवा झालो. बराच वेळ त्याच स्थितीत राहिल्यानंतर अजुन पुढे जायचे आहे ही जाणिव झाली मग पुन्हा निघालो तेवढ्यात 'गडावर चाललात की काय?, थांबा मी पण येतो' असा एक प्रश्न ऐकु आला वळुन बघितले तर एक गावकरी हातात एक प्लास्टीक पिशवी घेउन येत होता. त्याच्याशी बोलतांना कळले की गडावरील दर्गा आणि मंदिर यांची पुजा करण्याचं काम त्याच्याकडे होतं आणी त्यासाठी तो निघाला होता. मग आम्ही दोघे निघालो. एकट्याने जाण्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही असा विचार माझ्या मनात सुरु असतांनाच लगेच मला तो बरोबर असल्याबद्दल बरं वाटलं कारण पुढच्याच वळणावर एका बोरीच्या झाडाकडे तो मला घेउन गेला. काय गोड बोरं होती, वा, त्या रानमेव्याचा मनसोक्त आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा आम्ही पुढे चालायला लागलो. पण थोड्याच वेळात माझा स्पीड बघुन तो वैतागला असणार कारण मी पुढे जातो तुम्ही या हळुहळु असं म्हणून तो झपाझप चालत निघुन गेला आता मी बुरुजाच्या पायथ्याशी येउन पोहोचलो होतो.

समोर त्याच त्या पायया दिसत होत्या ज्यांनी आमचा मागचा ट्रेक पुर्ण करु दिला नव्हता. पुन्हा एकदा उन्हाने त्रास होऊ लागला.यावेळी मात्र खुप जास्त त्रास जाणवत होता. पायया चढायला सुरुवात केली खरी पण त्यावर हात टेकवताच चटका बसत असे आणि खाली सुद्धा बसवत नव्हते साधारण पाच दहा पायया चढुन गेल्यावर मात्र शरिराने लढा पुकारला आणि मस्तकात एक जोरदार सणक भरली. पुढच्या पायरीवर ब॔ग फेकुन देउन मी त्याच परिस्थीत एका पायरीवर आडवा झालो. दोन क्षण काहीच कळेना झटकन ब॔गेतुन एक पाण्याची बाटली काढुन डोक्यावर ओतली. त्याच अवस्थेत काही वेळ पडुन राहिलो पण जास्त वेळ बसणे शक्य नव्हते कारण मी अजुनही उन्हात होतो. मग उरलेले पाणी रुमालावर टाकुन तो रुमाल डोक्याला घट्ट बांधला टोपी चढवली आणी सावकाश एक एक पायरी चढत कसाबसा वरच्या पायरी पर्यंत पोहोचलो पुढे दरवाज्याच्या बाजुला पहारेकयांच्या देवड्या आहेत त्याच्या सावलीत जाउन शांत बसलो. बराच वेळ तेथे थांबल्यानंतर जरा आराम वाटला मग पुढे निघाल्यानंतर लगेचच आलात का म्हणुन एक हाक एकु आली बघतो तर थोड्यावेळापुर्वी भेटलेला गावकरी वर दर्गाच्या बाजुला बसला होता. मग मी बुरुजाला वळसा घालुन उजव्या बाजुने निघालो. आता मी बरोबर बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी आलो होतो. समोर एक छोटीशी गुहा होती त्याच्या उजव्या बाजुला पाण्याचे एक टाके होते. त्या गुहेत एक पीराचे थडगे होते. जेमतेम एक व्यक्ती बसु शकेल एवढेच उंची होती त्या गुहेची. मी शांत अशा त्या गुहेत जाउन बसलो. नुकतीच त्याने पुजा केलेली असल्याने अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता बाजुच्या पाण्यामुळे ती गुहा जास्तच थंड होती त्यामुळे एकंदरीत खुपच शांतता लाभली होती त्या क्षणी. त्या जादुई क्षणात काही काळ बसल्यानंतर पुढे निघालो. बालेकिल्ल्याच्या खालुन उजव्या बाजुने वळसा घालुन पुढे जात असतांना डाव्या बाजुला एक खोल अशी गुहा आढळली, एखाद्या थिएटरची बेसमेंट पार्किंग शोभावी अशी ती गुहा होती. तिन उंच दगडी खांब आणि दोन भागात विभागणी. पैकी एका भागात एक मोठी दगडी चुल सुद्धा होती.
पुढे वळसा पुर्ण झाल्यावर तळई गावातुन येणायावाटेच्या बरोबर वर येउन पोहोचलो. बुरुजावरुन ती वाट दिसत होती आणि मला चढतांना खुप त्रास झाल्यामुळे ही वाट त्याप्रमाणात सोपी वाटत होती. बुरुजाच्या बरोबर बाजुला एक पाण्याचे टाके आहेत गडावरील अनेक पाण्याच्या टाक्यापैकी एवढे एकच टाके पिण्याच्या पाण्याचे आहे. एकदम थंड पाण्याने सर्व थकवा निघुन गेला. तिकडुन पुढे निघाल्यानंतर बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता दिसतो. त्यावरुन बालेकिल्ल्यावर जायला सुरुवात केली. बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी अनेक झाडे आहेत.त्यांच्या सावलीतुन चालत बालेकिल्ल्यावर पोहोचलो. समोर लगेचच एक आधुनिक बांधणीचा दर्गा नजरेस पडतो. दर्ग्याच्या उजव्या बाजुला एक छान तळे आहे आणी त्या तळ्याच्या बाजुला एक शंकराचे मंदिर आहे. या तळयत एवढे कमळ फुलले होते की त्या कमळांना बघताच चढाईचे सार्थक झाल्यासारखे वाटते. मग गडावर फेरी मारायला सुरुवात केली. गडमाथा एकदम आटोपशीर आहे. एक मंदिर एक दर्गा. मंदिराच्या बाजुला उभे राहुन बघितले की एका बाजुला पाली गाव, अंबा नदी, जांभुळ्पाडा, आणि कुठेलेसे एक धरण दिसते. दुसया बाजुला सह्याद्रीच्या रांगा छान दर्शन देउन जातात. दुरवर दिसणार्या अनेक रांगामधुन मला फक्त तेलबैला त्याच्या वैशिष्ट्यपुर्ण रचनेमुळे ओळखता आला. पुन्हा मंदिराच्या बाजुला एका झाड्याच्या सावलीत तळ्यातल्या पाण्यात पाय टाकुन विसावलो. सोबत आणलेला खाउचा आस्वाद घेत असतांनाच लहान मुलांचा आवाज ऐकु आला. समोरुन दहा बारा लहान मुले येत होती. त्यांच्या मागुन एक गृहस्थ आले. चौकशी नंतर कळले की ते स्वतः IDBI मधे असुन ती सर्व मुले एका तायक्वांदो क्लासेसचे विद्यार्थी होते. मग त्यांच्या बाललीला बघण्यात बराच वेळ घालवला आणी मग परतायला सुरुवात केली. उतरांना मात्र फार त्रास झाला नाही. बालेकिल्ला उतरल्यानंतर पुन्हा खालच्या पाण्याच्या हौदातुन पाणी भरुन घेतले आणी उतरायला सुरुवात केली. पुन्हा बुरुजावर पोहोचल्यानंतर पाययावर बसलो. आता मात्र त्या पायया खुपच मोहक वाटत होत्या. आणि त्यांच्या भव्यतेची खात्री पटत होती. समोर खुपच छान दृश्य दिसत होते. ते दृश्य डोळ्यात साठवत एक एक पायरी उतरलो आणि डोंगर उतरावरुन पळत सुटलो.
खाली सोंडेच्या पायथ्याशी पोहोचलो तेंव्हा मागे वळुन बघितले. डोळे भरुन सरसगड बघितला. मनातील भावना शब्दांच्या पलिकडे गेलेल्या होत्या. आनंद, समाधान यांच्या पुढे थकवा काहीच नाही हे जाणवत होते. स्वर्गीय सुखाचा आनंद भरभरुन उपभोगायला मिळाला. गावात उतरल्याबरोबर हातपाय धुवुन बल्लालेश्वराच्या दर्शनासाठी गेलो. दर्शन घेउन सभामंडपात बराच वेळ बसलो. त्या संपुर्ण दिवसाचा तो कळस होता. उठावेसे वाटत नसतांना सुद्धा पोटाची मागणी झाल्यामुळे उठावे लागले. बाजुच्याच सुखसागर नावाच्या होटेल मधे जाउन जेवणावर आडवा हात मारला आणि पाली-खोपोली बस पकडुन खोपोलीत पोहोचलो. खोपोलीतुन लोणावळ्यात पोहोचण्यासाठी असणारी शेवटची बस मात्र चुकली होती त्यामुळे पुन्हा बराच वेळ प्रतिक्षा करावी लागली आणी शेवटी रात्री नऊ वाजता लोणावळ्यात येउन पोहोचलो. घरात शिरल्याबरोबर हर्षातिरेकाने उडी मारली. सकाळी घरातुन निघतांना अनेक प्रश्न मनात होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवुन पोहोचलो होतो. सरसगड पुर्ण केल्याचा आनंद, सरसगड एकट्याने पुर्ण केल्याचा आनंद, मागच्या वेळी अर्थवट सोडलेला सरसगड पुर्ण केल्याचा आनंद, अशा अनेक गोष्टी मला मिळाल्या होत्या. आणि कदाचित म्हणुनच सरसगडाचा फोटो wallpaper म्हणुन केंव्हाच set झालाय जो मला नेहमी माझ्या या आनंदयात्रेची आठवण देत राहील.

Covalent Bond


Covalent Bond


"Covalent Bond : Any atom of a molecule forms a bond with another atom to complete its octate, this bond is known as Covalent Bond"

मी दहावीच्या वर्गात विज्ञान शिकवत होते. नुकतीच मी या छोट्याश्या शहरातील शाळेत विज्ञान शिक्षिका म्हणुन रुजु झाले होते आणि मला दहावीचा वर्ग मिळाला होता. हळुहळु विद्यार्थ्यांशी ओळख व्हायला सुरुवात झाली होती.

"तर अशा प्रकारे हा धडा संपला. कुणाला काही प्रश्न विचारायचे असल्यास विचारु शकता. उद्या येतांना व्यवस्थीत अभ्यास करुन या. मी एक छोटीशी चाचणी घेणार आहे. "

वर्ग संपवुन मी बाहेर आले आणि दुसर्‍या वर्गात निघाले तेवढ्यात मॅडम अशी हाक ऐकु आली. मी वळुन बघितले तर मृण्मयी मला बोलावत होती.

" मॅडम, मला काहीतरी विचारायच आहे तुम्हाला "
" काय गं मनु, काय प्रोब्लेम आहे. विचार ना "
" मॅडम मला जरा नेत्रदान कसे करतात त्याविषयी माहीती हवी होती. "

मी कौतुक मिश्रीत आश्चर्याने तिच्याकडे बघितलं.

" माहीती सांगते मी तुला पण मला एक सांग, तुझ्या मनात कसा काय आला हा विचार आणि तुला जरा जास्तच विचार करावा लागेल कारण तु अजुन खुप लहान आहेस "

" खरं म्हणजे मी माझ्या डोळ्यासाठी नाही विचारत, पण मला केवळ माहीती पाहिजे. माझ्या आईचे डोळे दान करायचे आहेत. "
" मग त्यासाठी तुझ्या आईची समती हवी, तु एक काम कर तुझ्या आईला किंवा बाबांना माझ्याकडे पाठवुन दे मग मी स्वतःच देईन त्यांना हवी ती माहीती. "

" नाही मॅडम तुम्ही मलाच सांगा. माझे बाबा माझ्या लहानपणीच वारले आणि आईला मी स्वतःच सांगणार आहे. " तिच्या या वागणुकी बद्दल मला काहीच समजेना पण नाईलाजाने मी तिला सर्व माहीती सांगितली धन्यवाद म्हणुन ती पळाली. मी सुद्धा लगेचच पुढच्या वर्गावर जाण्यासाठी निघाले. आणि माझ्या व्यस्त कार्यक्रमात मी पुन्हा अडकले. तिचा हा प्रश्न मी विसरुन सुद्धा गेले होते तर एक दिवस अचानक ती परत माझ्याकडे आली.

"मॅडम मला जरा किडनी कशी दान करतात ते सांगाल काय.. " आता मात्र मी उडालेच, " काय किडनी दान, अगं वेडी बिडी झालीस काय तु, तु अजुन दहावीतच आहेस आणि कशाला हवी गं तुला ही सर्व माहीती. "
" मॅडम माझ्या आईची एक किडनी दान करावयाची आहे. "
" तसं पहाता ही खुप चांगली गोष्ट आहे पण किडनी दान करण्याचा निर्णय तुझ्या आईने का व कशासाठी घेतला ते सांगु शकशील काय. "
" मॅडम तुम्ही फक्त मला माहीती सांगा. "
" ते काही नाही. तु मला अगोदर सांगितलेच पाहीजे कशासाठी माहीती विचारतेयस ते. "
" मडम तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला माहीती सांगा. " मी तीला परत सर्व माहीती सांगितली पण या वेळी माझं मन मला स्वस्थ बसु देईना. मी तिच्या आईची भेट घेण्याचं ठरवलं. पण विशेष गोष्ट म्हणजे हुशार आणि लोकप्रिय असलेल्या मृण्मयीचं घर मात्र कुणालाही ठावुक नव्हतं. मुलींच म्हणण होतं की तिने कधीही कुणाला तिच्या घराविषयी काही सुद्धा सांगितलं नव्हतं. शेवटी मी शाळेच्या रजिस्टर मधे तिचा पता शोधायला घेतला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. मृण्मयीच्या नावापुढे स्थानीक पालक म्हणुन दुसर्‍याच कुणाचं तरी नाव नोदवण्यात आलं होत. मला काहिच कळेना, मनु आपले वडिल वारले असं काय सांगतेय विचित्र प्रश्न काय विचारतेय. नुसता गोंधळ उडाला होता. त्या पत्त्यावर मी जाउन पोहोचले.

मोठं प्रशस्त घर होत. मी जाताच एक चाळिशीतले गृहस्थ माझ्यासमोर आले. त्यांच नाव ऐकल्यावर मला कळलं की मनुचे स्थानिक पालक ते हेच.

" नमस्कार तुमच्या मुलीची विज्ञान शिक्षिका. मला जरा तुम्हाला काहिसे प्रश्न विचारायचे होते. "
" मडम मी प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो की मनु माझी मुलगी आहे पण ती माझी मुलगी नाही.
गोधळलात ना. निट सांगतो म्हणजे कळेल. मनु माझ्या मित्राची मुलगी. माझ्या जिवलग मित्र अजय आणि त्याची बायको यांची एकच आवड होती ती म्हणजे समाज सेवा. आणि याच आवडीपायी बाळंतपण शहरात करायचे सोडुन ती दोघे एका खेड्यातील वृद्धाश्रमात गेले. अपुर्‍या वैद्यकीय सोयीमुळे मनुच्या जन्माच्या वेळी तिची आई हे जग सोडुन गेली, पुढे अजय तिला घेउन परत आला. आणि एकाच वर्षात तो सुद्धा गेला. दैवाचा खेळ बघा मरे पर्यंत समाजासाठी काम करणार्‍या अजय च्या मुलीसाठी कुणीही नातेवाईक पुढे न आल्याने शेवटी मी तिला घेउन आलो, मनुच्या नावापुढे मी अजयच नाव ठेवलं. मनुला मी घेउन आलो तेंव्हा ती एक वर्षाची होती आणि माझं लग्न सुद्धा झालं नव्हतं म्हणुन मी ऑफिसला जातांना मनुला बाजुच्या एका आश्रमात सोडुन जात असे. मनु आई बाबांप्रमाणे त्यांच्यात रमली. आजही ती घरात फक्त काही वेळच असते आणि इतर सर्व वेळ ती आश्रमातच असते. "

मनुचं मला कौतुक वाटल.

" पण मी तुमच्या कडे आले ते एका वेगळ्या संदर्भाने. मनु मला काहीसे विचित्र प्रश्न विचारत असते. एत्रदान, किडनीदान वैगरे.. "

" तुम्ही जरा माझ्या बरोबर चला.. म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. "

मी त्यांच्यामागुन निघाले. बाजुलाच एक आश्रम होता. तिथेच एका खोलीच्या दरवाज्याजवळ आम्ही दोघे थांबलो. खिडकीतुन आत डोकावले तर दिसले की मनु एका वृद्धेला मांडिवर घेउन काहीतरी समजावीत होती.

" आजी तु घाबरु नकोस अगं उलट तुला आनंद व्ह्यायला हवा, आज तुझ्या मुळे कुणाला तरी जीवन दान मिळणार आहे, तुला आठवतं की डॉक्टरांनी तुझ्या किडनीचं ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं होत ते ऑपरेशन यशस्वी झालंय आणि तुझी एक किडनी काढुन दान करण्यात आली. किडनी दान म्हणजे.... " मनु मी सांगितलेला एक एक शब्द बोलत होती,

" बघितलंत मडम, मागे असेच एकदा एका आजोबांचा एक डोळा अचानक निकामी झाला, तर मनुने त्यांना नेत्रदाना विषयी माहीती सांगितली आणि त्यांच्या दुःखावर एक फुंकर मारली, कारण गेलेला डोळा परत तर मिळणार नव्हताच उलट आपण कुणाच्या तरी कामी येउ शकलो अशी त्यांची भावना झाली आणि त्यांना परत त्यांच्या जिवनातला आनंद मिळाला. कदाचित मनुचं खोटं बोलण तुम्हाला खटकत असेल पण त्या बोलण्या मागे दुसर्‍यांना निखळ आनंद देण एवढा एकच उद्देश असतो. आपण अगदिच निकामी आहोत ही भावना त्यांच्या मनात निर्माणंच न होउ देण, मला वाटतं हेच खरं मनुच्या कामात फलीत. "

आतुन दोघींच्या हसण्याचा आवाज आला आणि माझ्या डोळे नकळत पाणावले, Covalent Bond चा खरा अर्थ मला समजत होता. आपल्या जीवनातील हिस्सा मनुने अशा प्रकारे दुसर्‍याबरोबर वाटुन घेउन जो बंध निर्माण केला होता तोच Covalent Bond

---------------- सुभाष डिके