Saturday, June 23, 2007

'आमची माती, आमची माणसं'

आज कुठेतरी वाचनात 'आमची माती, आमची माणसं' या दूरदर्शन वरच्या कार्यक्रमाचा उल्लेख आला, आणि दुरवरुन 'ती' धून ऐकू येते आहे असे वाटून गेले क्षणभर.

संध्याकाळी साडेसहा वाजता दूरदर्शन वर हा कार्यक्रम लागत असे. अर्थात त्यावेळी त्यातील चर्चा आणि संबंधित गोष्टींमध्ये विशेष रस नसायचा. तरी तुळशीला पाणी घालणारी माउली, शेत नांगरणारे शेतकरी (अगदी मागे उडणाऱ्या बगळ्यासहित) , दूध काढतानाचे शेतकरी या सगळ्या आसपास नेहमी दिसणाऱ्या गोष्टी टी. व्ही. च्या पडद्यावर बघताना पाहुन विशेष आनंद होत असे. या सर्वाच्या सोबतीला "ही काळी आई, धनधान्य देई, जोडती मनाची नाती, आमची माती, आमची माणसं!." हे मस्त शिर्षकगीत अजूनच मोहिनी टाकत असे. या कार्यक्रमातून तज्ञांच्या मुलाखती सोबतच एखादा वेगळा प्रयोग केलेला शेतकरी मुलाखत देऊन जाई. अशा मुलाखती तर आम्ही हरखून पाहत असू.

आता या सर्वांचा विचार करताना असे वाटून जाते, की काय होते या कार्यक्रमात विशेष आवडावे असे, काहीही नाही. भरजरी साड्या आणि लक्झरी गाड्या नव्हत्या, मोठमोठ्या बिझनेस हाउस मधील भांडण नव्हती, विवाह बाह्य संबंध नव्हते की आचरट विनोद नव्हते. 'सो कॉल्ड' रियालिटी शो मधील एस.एम.एस. नव्हते की एकजात सारख्याच दिसणाऱ्या सिक्कीम मधील मुलीने तोडक्यामोडक्या हिंदीत बोलून खोलेलेले 'सुपर लोटो किस्मत के पिटारे नव्हते'. पण तरीही हा कार्यक्रम का लक्षात राहावा बरं?

ह्म्म !! त्याच्या नावातच या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं. 'आमची माती आमची माणसं' या दोनच गोष्टीत जीवनाचं सारं आहे, आपल्याला सर्वात जास्त सुखावणाऱ्या, आनंद देणाऱ्या आणि अभिमान वाटाव्या अशा या दोनच गोष्टी 'आमची माती आमची माणसं' !!

Thursday, June 21, 2007

दिसामाजी काहीतरी

गेल्या काही दिवसात काहीतरी चांगले वाचायला मिळाले. स्वतःला पुनर्प्रत्ययाचा आनंद आणि वाचकांना इथे आल्याचा आनंद (;-)) मिळावा म्हणून

१. जिद्दीच्या संदर्भातील सुंदर शेर
फलक को चाह है जहा बिजलिया गिराने की,
हममे भी ज़िद है, वही आशियां बनायेंगे । (फलक: आकाश)
****************************
२. दोन खळखळून हसवून गेलेले विनोद:

पहिला पुणेरी(दुसर्‍याला फोन करून) : 'देशपांडे' आहेत का?

दुसरा पुणेरी(चिडून): नाही पावनखिंडीत लढायला गेलेत, काही काम होतं का?

प.पू.:काही नाही त्यांना सांगा राजे गडावर पोहोचले आता मरायला हरकत नाही !!

****************************
पुण्यातील DSK विश्वच्या जाहिरातीतील 'घराला घरपण देणारी माणसं' हे वाक्य बघुन एका वखारवाल्याने आपल्या दुकानावर 'घराला सरपण देणारी माणसं' असा बोर्ड लावला

****************************
३. वसंत बापटांची सह्याद्रीवरील कविता
भव्य हिमालय तुमचा अमुचा , केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा
तुमच्या अमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिंवरथडी
प्यारा मला हे कभिन्न कातळ ,प्यारा मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यारा मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते ,तुकयाचा आधार मला

४. एका वाक्यातील हास्य
@ पोट पाठी लागतं, म्हणून तर येवढी धावपळ
@ मनावर ताण कमी करायचाय, 'ताणून' द्या
@ अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, 'लिप्ट' ने जा
@ काळजी करण्यापेक्षा काळजी 'घेणं' चांगलं
@ शब्द शोधावे लागणं हा कवीचा पराभव, आणि अर्थ शोधावे लागणं हा काव्याचा
@ दारू पिऊन गाडी चालवायला मनाई असते ना, मग बार बाहेर पार्किंगची जागा कशाला
@आयुष्य हे नदी सारखं आहे, थांबलं की डबकं

Tuesday, June 19, 2007

आज उतनी भी नही बची

"आज उतनी भी नही बची ..."

हातात प्रिंट आउट घेऊन समोरच्या बोर्डाकडे बघत असतानाच विचारांची रेल्वे मनातून धावून गेली. प्रिंट समोरच्या बोर्डावर लावावी म्हणून ड्रॉवर उघडला, आणि नेहमी हव्या तेवढ्या पिन्स उपलब्ध असणाऱ्या ड्रॉवर मध्ये एकही पिन नव्हती. का कुणास ठाऊक पण चटकन मनात हाच शेर आला,

आज उतनी भी नही बची हमारे पैमाने मे,
जितनी कभी छोड दिया करते थे मैखाने मे ।

आमचे फिजिक्स चे सर एकदा वर्गात हा शेर म्हणाले होते. नेहमी खडू हवे तेवढे उपलब्ध असताना ऐनवेळी, एकही खडू गवसला नाही म्हणून त्यांनी हा शेर म्हणून दाखवला होता. फारच मजेशीर व्यक्तिमत्त्व !!, शुक्रवारी लेक्चर संपत असतानाच न बोलता फळ्यावर काहीतरी खरडून निघून जायचे, ते गेल्यावर कळायचे की आज रात्री दूरदर्शन वर दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटाचे नाव, त्यातील कलाकारांचे नावे असे सगळे लिहिलेले असायचे फळ्यावर. त्यांचा विषय फिजिक्स असला तरी त्यांना शेती आणि बागकामात विशेष रस होता, त्यामुळे बाजारच्या दिवशी ते नियमीतपणे बाजारात दिसत काहीतरी विकताना. सर्व चुकार मुलेही त्यांच्या लेक्चरला आवर्जून हजर असायची, त्यांच्या या विशिष्ट पद्धतीमुळे.

त्यांच्याच प्रमाणे आमच्या प्राथमिक शाळेतील एका सरांची एक विशिष्ट सवय होती, ती म्हणजे मारताना हातातील घड्याळ काढायची. म्हणजे तसे ते काही फार मुलांना मारत नसत, क्वचितच, पण जेव्हा कधी मारायचे तेव्हा हातातील घड्याळ खिशात ठेवूनच. त्यांची ही सवय सर्वांना एवढी परिचित होती, की नंतर नंतर त्यांनी फक्त घड्याळाला हात लावला की मुले शांत होत असत.

असे अनेक शिक्षक अनेक सवयी, त्या सोबत येणाऱ्या कडू गोड (म्हणजे त्या त्या वेळी कितीही कडू वाटल्या असल्या तरी आता गोड वाटणाऱ्या) आठवणी, सरकून गेल्या नजरेसमोरून.

खूप खूप लिहिता येईल,
..पण पुन्हा केव्हा तरी,

तूर्तास मात्र हातात कागद आहे आणि दुसरीकडे पिन शोधतो आहे ,
त्या न सापडणाऱ्या पिन ने सुद्धा टोचण्याचा धर्म पाळला हे मात्र नक्की...
आह !!

Tuesday, June 12, 2007

विडंबन - या बायडीस माझ्या

खरं तर 'या झोपडीत माझ्या' ही मूळ कविता माझी खूप आवडती आहे, पण विडंबन सुचत गेले आणि धैर्य गोळा करून पोस्ट करतो आहे. या विडंबना बद्दल तुकडोजी महाराजांची मनोमन क्षमा मागतो आहे. मूळ कविता 'या झोपडीत माझ्या' या दुव्यावर वाचता येऊ शकेल.

खादाड एका घरची , वारस शोभे त्यांची
पेहराव बारा इंची, या बायडीस माझ्या ॥१॥

खाटेवरी पडावे, 'बाई'स ओरडावे,
अन वेड नित्य खावे, या बायडीस माझ्या ॥२॥

खानावळीत जाई, चाखून सर्व पाही,
पैशाची पर्वा नाही, या बायडीस माझ्या ॥३॥

खर्चाने आली गरिबी, हे रत्न माझ्या नशिबी,
गांजून गेले धोबी, या बायडीस माझ्या ॥४॥

पोटात आणि ओठात, आजार नाही शरीरात,
सगळेच घास पचतात, या बायडीस माझ्या ॥५॥

खचले पलंग सोफे, खुर्ची दमून झोपे,
पाहता शिंपी कापे, या बायडीस माझ्या ॥६॥

खाण्याचे असू दे काम, मज वाटतसे प्रेम,
जपणार साती जन्म, या बायडीस माझ्या ॥७॥

- सुभाष डिके (कुल)

Tuesday, June 05, 2007

आईचे डोळे

आईचे डोळे [लेखक: प्रविण दवणे (धन्यवाद स्नेहा :-))]

आत्ताच एका मेल मधुन हा लेख मिळाला, आणि सहजच वाचायला सुरुवात केली. लेख वाचुन कधी संपला कळले नाही आणि संपला तेंव्हा शब्द निघाला नाही मुखातून. असा खुपंच सुरेख लेख सर्वांपर्यंत पोहचावा या विचाराने हा लेख इथे देतोय .





Saturday, June 02, 2007

कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

१ जानेवारी २००७ ला आलेली संदिपची ही कविता मला फार आवडली होती

कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
उगाचच रातभर जागायला हवे!
सुखासिन जगण्याची पुरे झाली जळमटे
जगणेच सारे पुरे झाडायला हवे !! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
गारठ्यात फेकुनिया शाल, कानटोपी
कधीतरी थंडीलाच वाजायला हवे
छोटे मोठे दिवे फुंकरीने मालवून
कधीतरी सूर्यावर जळायला हवे ! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
खोट्या खोट्या शृंगाराची लाली रंगवून
कशासाठी सजायचे चापुन चोपून?
वाऱ्यावर उडवत पदर जिण्याचा
गाणे गुलछबू कधी म्हणायला हवे ! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
भांड्यावर भांडे कधी भिडायला हवे उगाचच सखीवर चिडायला हवे
मुखातून तिच्यावर पाखडत आग
एकीकडे प्रेमगीत लिहायला हवे ! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
विळिपरी कधी एक चंद्रकोर घ्यावी
हिरवीशी स्वप्ने धारेधारेने चिरावी !
कोर कोर चंद्र चंद्र हारता हारता
मनातून पुर्णबिंब तगायला हवे ! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
मनातल्या माकडाशी हात मिळवून
आचरावे कधीतरी विचारावाचून
झाडापास झोंबुनीय हाती येता फळ
सहजपणाने ते ही फेकायला हवे! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
कधी राती लावुनिया नयनांचे दिवे
पुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे
शोधुनिया प्राणातले दुमडले पान
मग त्याने आपल्याला चाळायला हवे!! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
ढगळसा कोट, छडी, विजार तोकडी
भटक्याची चाल दैवासारखी फेगडी!
जगण्याला यावी अशी विनोदाची जाण
हसताना पापण्यांनी भिजायला हवे! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
स्वतःला विकून काय घेशील विकत?
खरी खरी सुखे राजा, मिळती फुकट
हपापून बाजारात मागशील किती?
स्वतःच नवे काहीतरी शोधायला हवे! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
तेच तेच पाणी तीच तीच हवा
आणि तुला बदलही कशासाठी हवा?
जुनेच अजून आहे, रियाजावाचून!
गिळलेले आधी सारे पचायला हवे ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
नको बघू पाठीमागे, येईल कळून
कितीतरी करायचे गेले राहून
नको करू त्रागा असा उद्याच्या दारात
स्वतःलाही कधी माफ करायला हवे! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

-संदिप खरे !!!