Sunday, August 07, 2022

दुपार - एक कविता


कधी कधी विचार करतांना जाणवतं, दुपार ही किती अनोखी गोष्ट आहे!

सकाळच्या ब्राह्ममुहूर्ता साठी असतात कविता अन  भूपाळ्या
कातरवेळ हा तर कवींचा आवडता विषय
आणि रात्र ही शृंगार किंवा करुण रसाने भरलेली कवितांमधून
पण दुपार!
दुपार नेहमीच अशी दुर्लक्षलेली

दुपारीकडे नसतो सकाळचा प्रसन्नपणा
ना कातरवेळेची हुरहूर
अन ना रात्रीचा रिक्तपणा
पण तरीही दुपार येते रोज, एक दुवा बनून

सकाळच्या धबडग्यातून जरा निवांत होण्याची हीच ती वेळ
आणि हीच वेळ जाणीव करून  देते,
सकाळ  मागे पडल्याची आणि कातरवेळ अजून दूर असण्याची देखील

सकाळच्या गेलेल्या क्षणांमधून काही क्षण लक्खपणे समोर येतात अशाच या दुपारी 
तशा घडलेल्या असतात खूप गोष्टी, पण दुपार जाणीव करून देते त्या चुकार काही क्षणांची

शेवटी आयुष्याची दुपार तरी काय निराळी असते?

कातरवेळेकडे लक्ष ठेवून मागे वळून बघतांना
येतात समोर ते काही निवडक  क्षण आयुष्याच्या या दुपारी,
आणि ते क्षण असतात सोनेरी रुपेरी
कारण ते असतात मित्र मैत्रीणींबरोबरचे काही मोजके क्षण

बळ देणाऱ्या या क्षणांना दिलेला उजाळा पुरेसा होऊन जातो
कातरवेळेत समाधानाने प्रवेश करण्यासाठी

- सुभाष 

Monday, February 22, 2010

आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार...

आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार...

आमची प्रेरणा

आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार , घरादाराच्या चिंधड्या होणार,
सरकार किती परदेशी गेले ते शोधणार, रिक्षावाले गेले याचा विसर पडलेला असणार ,
अमेरिका संध्याकाळी निषेध करणार , सकाळीच त्यांनी 'पाक' ला शस्त्रे विकलेली असणार ,
इकडे पाटील कपडे बदलणार, देशमुख चित्रपट काढणार ,
'बाबा' रात्रभर पार्टीत नाचणार, बाहेर जोड्यांसाठी मंत्री उभे असणार ,
पद्मभूषण मात्र शाहरुख च ठरणार , काय रे देवा !

आता पुन्हा दुष्काळ पडणार, विदर्भ मराठवाडा होरपळून निघणार,
आबा रडायला लागणार, शिंदे हसतच राहणार ,
चव्हाण-ठाकरे दिल्लीला जाऊन निर्णय घेणार ,
'हे' वाघावर तर 'ते' इंजिनावर स्वार होणार ,
आमटे , बंग वेड्यागत अनवाणीच धावणार ,
जाणते साहेब मात्र लवासात स्विमिंग पूल उभारणार , काय रे देवा !

आता पुन्हा निवडणुका होणार, काळा पैसा सगळा बाहेर पडणार,
यांना जिजाऊ तर त्यांना दादोजी आठवणार ,
मातोश्री गरजणार, कृष्णकुंज आदेश देणार,
बाई 'झंझावाती' रोड शो करणार, उनाड च्यानेल्स बोकाळणार ,
अण्णा उपोषण करणार, कुणा कुणाचा 'स्वाभिमान' जागा होणार,
निवडणुकीची सुट्टी म्हणून आम्ही मात्र खंडाळ्याला जाणार, काय रे देवा !

आता पुन्हा अप्रेझल होणार , जो तो बॉस ला शिव्या देणार
बॉस त्याच्या बॉस च्या नावाने खडे फोडत असणार
कंपनी मात्र कागदावर तोटाच दाखवत राहणार
किती टक्के हाच महत्वाचा प्रश्न होऊन राहणार
पंधरा नाही तर दहा तरी द्या असे लाचार स्वर निघणार
'थाळात' मात्र एक टन उस ९० लाच तुटणार, काय रे देवा !
- सुभाष डिके (कुल)

तळटीपा :
१. 'थाळ' - ऊस तोडणीचे स्थळ
२. तोडणी मजुराला ९० रुपये टन हा अगदी अलीकडचा खरा भाव आहे
३. घटना व पात्रे खरे आहेत - योगायोग नाही

Tuesday, January 13, 2009

तिळगूळ घ्या गोड गोड बोला

रस्त्यावर गर्दी आहे चिडचिड नको, कामवाली बाई आली नाहिये वैतागु नका, राग वैताग चिंता द्या आता फेकुन

आणि इतरांशी तर गोड बोलाच पण अंतरात्म्याशी पण गोडच बोला :) ...

{बस झाले तत्वज्ञान ... }

तिळगूळ घ्या गोड गोड बोला... मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा... (संक्रांत या शब्दाचा अर्थ संकट असा होतो म्हणतात.. मग संक्रांतीच्या शुभेच्छा कशा काय देत असतील कुणास ठाउक.. असो भावना पोहचण्याशी मतलब...) खुप खुप गोड बोला आणि गोड रहा..

Thursday, November 27, 2008

निषेध ! त्रिवार निषेध !!!

निषेध ! त्रिवार निषेध !!!

मुंबईत ज्या पद्धतीने भ्याड अतिरेकी हल्ला करण्यात आला त्याचा निषेध...

आणि सलाम त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना जे तळहातावर शीर घेउन लढले आपल्या मुंबईकरांसाठी..

आता जत्रा भरेल वृत्तवाहिन्यांवर .. कोणी निषेध करेल तर कोणी सरकारला धारेवर धरेल .. सगळेच सारखे.. या नेभळट राजकारणी लोकांमुळेच हा दिवस बघावा लागतोय..

या सगळ्या राजकारण्यांना समुद्रात बुडवून टाकले पाहिजे आणि त्या वृत्तवाहिन्यांच्या मालकांना तर भर चौकात उलटे टांगून धुरी द्यायला हवी. शेवटी काय थोडे दिवस हा प्रसंग चर्चिला जाणार.. पकडलेच अतिरेकी तर त्यांच्यावरून राजकारण होणार... सगळेच सारखे..

आता कुठे गेले स्वतःच्या नेत्याला संरक्षण देणारे , मुंबईचं संरक्षण का नाही केलं म्हणावं..

आणि तोडफोड करणारे , नारे लगावणारे.. तुम्ही तरी अतिरेक्यांची डोकेफोड का नाही केली??

आता कुठे गेले उठसूठ निषेध करणारे आणि संप करणारे.. त्यांना तर आनंदच होत असेल अर्थव्यवस्था डळमळीत होते आहे म्हणून..

स्व्यंयंशिस्तवाले कुठे आहेत.. आता सुपात आहेत म्हणून बोलतील चार शब्द, उद्या जात्यात आल्यावर ते पण नाचणार या सर्वांच राजकारण करून

आणि ते.. जे खऱ्या अर्थाने या सर्व गोष्टी रोखू शकतात त्यांना तर बोलण्यातच अर्थ नाहि.. कारण जनते पेक्षा त्यांना 'जनपथा'ची काळजी अधिक..

या कुणाकडून अपेक्षा ठेवणेच व्यर्थ आहे हे माहितच होते आता खात्री पटली

नागरिकांनो एक व्हा.. एकत्र रहा..

Saturday, October 18, 2008

माझा बाप मरतो तेंव्हा ...

ही कविता सकाळच्या मुक्तपीठ या पुरवणीत प्रसिद्ध झाली असुन ती ईसकाळ वर http://esakal.com/esakal/10212008/MUKTAPITHED14349D32.htm या ठिकाणी वाचता येईल


माझा बाप मरतो तेंव्हा ...
सारखं वाढणारं व्याज बघून, बाप बसला चेहरा पाडून

सावकाराचा पडण्या अगोदर घाला, फाशी घेतो बोलून गेला ॥

माझ्या काळजावर झाला आघात , आईचे अश्रू मावेना डोळ्यात

म्हटलं बघावं तरी जाउन, कोणी मदत करेल का हे ऐकून ॥

पहिले भेटले एक पुढारी, चालले होते सांभाळत ढेरी,

म्हटलं साहेब बाप मरतोय, 'कसं होणार'? म्हणून आत्महत्या करतोय ॥

साहेब म्हणाले जात सांग, किती मतदान घरात सांग,

विचारून घेइन एकदा मॅडमला, नाहितर येउच शेवटी सांत्वनाला ॥

मरू नकोस सांग त्याला, एक नोट देइन मी एका मताला,

त्याला म्हणाव भागव त्यात, स्वप्न सुद्धा पाहवित की रे आपल्या आवाक्यात.. ॥

मग भेटले उद्योगपती, बसायला गाडी आणि मोबाईल हाती

म्हणालो साहेब! वाचवा बापाला, खुप खुप धन्यवाद मिळतिल बघा तुम्हाला ॥

साहेबः "सेझ ला जमीन देणार का विचार, करंजा तरी लाव म्हणावं मिळतील हजार"

हजार लाख कोटी फक्त, दिसतच नाही फाशी आणि रक्त ॥

सावकाराला देण्यापेक्षा मला जमीन दिली असती,

बापाला घर आणि तुला नोकरी मिळून गेली असती ॥

पुढे भेटला मित्र पत्रकार, वाटलं बघावा देतो का आधार,

म्हणाला माझा बाप वाचव, अन्यायाविरुद्ध रान माजव ॥

मित्र म्हणाला, तुझा बाप खाईल काय रे तीन चार साप?

तरच मी ते छापू शकतो, जाहिरातदारांना कापू शकतो ॥

मल हवे तीन पायाचे अस्वल किंवा एखादी नटी नखरेल,

किंवा चालेल एखादा मुलगा आणि तो बुडेल अशी बोअरवेल ॥

गेला मरून बाप तर करूया बातमी सनसनखेज,

तीन चार शो लाइव्ह करू आणि नंतर स्पेशल कव्हरेज ॥

शेवटी भेटले श्री हनुमान, कष्टी दुःखी हरपून भान

म्हणाला देवा तुमचाच सहारा, तुम्हीच वाचवा माझा म्हातारा ॥

मारुती हसला म्हटला बेटा, मलाच माझी पडली चिंता

रामाचेच अस्तित्व नाकारताहेत, तिथे हनुमानाची काय बात ॥

तुझ्या बापाची क्षमा मागतो, यमराजांशी चर्चा करतो,

मरणार तर तो आहेच, स्वर्ग तेवढा मिळतो का ते पाहतो ॥

निघालो घराकडे होउन पुर्ण हताश, डोक्यात होते प्रश्नचिन्ह मन होते निराश

घरी बाप फाशी घेउन गेला होता, बाळांना वाली कुणी सुद्धा उरला नव्हता ॥

लग्नात नटायचं स्वप्न, ताईच्या मनात विरून गेलं

"मेरा भारत महान", हे मात्र चांगलच मनात ठसलं ..

-- सुभाष डिके

Friday, September 05, 2008

तंत्रज्ञान आणि मी

सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा... गणपती बाप्पा मोरया...

माझ्या या अनुदिनीवरून मी माझ्या दुसऱ्या एका अनुदिनीची ओळख करून देत आहे.

आपणास विनंती आहे की आपण माझ्या http://coolsubhash-tech.blogspot.com या तंत्रज्ञान विषयक अनुदिनीला अवश्य भेट द्यावी व सुचना/प्रतिक्रिया कळवाव्यात..

आपला,

सुभाष

Monday, August 18, 2008

वेल प्लेड अखिल !!

वेल प्लेड अखिल !!
दचकला असाल कदाचित.. कारण आत्ताच अखिल बॉक्सिंगच्या ५४ किलो गटातील उपउपांत्यफेरीतून बाहेर पडला..
आता आपला मेंदू बाजूला काढुन ठेवणार्‍या वृत्तवाहिन्यांवर या सर्व गोष्टींचा उहापोस सुरु झाला सुद्धा असेल..
असे असतांना त्याला वेल प्लेड कशासाठी...


कारण..


एकेकाळी क्रिकेट हा एकमेव खेळ मानला जात होता आणि इतर खेळ केवळ दुरदर्शनच्या बातम्यामधुन दिसायचे... अशा परिस्थितीत अभिनव पाठोपाठ ऑलिंपिक पदकाची आशा भारतीयांच्या मनात उमटवली हेच या खेळाडूंच मोठं यश म्हणता येईल.


अखिलने जर पदक मिळवले असतेच.. तर बिजिंग मध्ये तिरंगा वर जातांना बघुन नक्कीच अभिमान वाटला असता.. पण या स्पर्धेत उतरण्यापुर्वी संभाव्य पदक विजेत्यांमधे फारसा उल्लेख नसलेल्या या खेळाडूंनी आजवर केलेली कामगिरी नक्कीच प्रेरणादायी ठरेल...


आज नाही विजय मिळाला पण हरकत नाही.. निदान या खेळांकडे बघण्याचा दृष्टीकोन तरी बदलेल... आणि हाच अखिल आणखी अनेक जणांसोबत पुढच्या ऑलिंपिक मध्ये निर्विवाद विजय सुद्ध मिळवेल.. अर्थात हा सर्व आशावाद वाटत असेलही .. पण आशेवरच जग चालते नाही का !!!


सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा... आणि सरकारला प्रार्थना की निदान आतातरी या सगळ्या खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल अशी तरतूद करावी...

Wednesday, August 13, 2008

अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!

बिजिंग ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून तिरंग्याची शान वाढविल्याबद्दल अभिनव बिंद्राचे मनापासून अभिनंदन

Saturday, May 17, 2008

शुभेच्छा !

आज सकाळीच म. टा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3047200.cms मध्ये ही बातमी वाचली आणि बरं वाटलं.. अशा कामांबद्दल सरकारचे अभिनंदन आणि श्रीधर ला पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा !

Saturday, January 19, 2008

हार्दिक अभिनंदन

ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमीत जाउन पराभव करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन !!!

Saturday, December 22, 2007

कोकण - पुन्हा एकदा !!

गेल्या शनिवारी कोकणात भटकण्यासाठी जाण्याची संधी मिळाली. मे महिन्यात सिंधुदुर्गाच्या सफरीचा बेत यशस्वी झाल्यानंतर या वेळी रत्नागिरीची सफर योजीली होती. प्रचंड धमाल करत हेदवी, हर्णे, आंजर्ले, केळशी, दाभोळ, दिवेआगर, दिघी, जंजिरा इत्यादी ठिकाणे मनसोक्त फिरून झाली. कोकणातील जेवण, उकडीचे मोदक, फेरीबोटीचा प्रवास अशा कितीतरी गोष्टींमुळे ही सफर अविस्मरणीय ठरली. अशा ठिकाणी भटकायला मिळाल्यामुळे आमचा भटकता आत्मा तृप्त झाला. यातील काही आठवणी चित्ररुपात खाली देत आहे.





Thursday, November 08, 2007

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !! बऱ्याच दिवसांपासून इथे कुठलाही नवीन लेख लिहायला वेळ मिळाला नव्हता आता दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा सुरुवात होणार आहे

ही दिवाळी आपणा सर्वांना सुखासमाधानाची, आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच शुभेच्छा

Friday, August 24, 2007

आनंदी आनंद गडे

जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे !

हिमालयातुन परतलो, सोबत खुप काय काय घेउन . नवा जोश, उर्मी, उस्ताह भरभरुन वाहतोय. ह्म्म्म्म, सगळं कसं शांत निवांत प्रसन्न वाटतंय. खुप काही आहे लिहिण्यासारखं. लिहिणं सुरु आहे, लवकरच पुर्ण होईल ...

Wednesday, August 08, 2007

हिमालयाकडे ...

सह्याद्रीच्या कुशीतुन फिरत असतांनाच बदल म्हणुन हिमालयाच्या कुशीत जाण्याचे ठरवले आहे. या वर्षी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स चा बेत असुन पुढे जाउन गंगोत्री, तपोवन, आणि एवरेस्ट बेस कॅंप (बेडकाची उडी कुंपणापर्यंत :)) अशा योजना आहेत . परवा हिमालयाच्या दिशेने कूच करणार असुन पुढचे दहा दिवस हिमालयाच्या सानिद्ध्यातच घालवणार आहोत .. तेव्हा भेटूया ...

Thursday, July 26, 2007

पुरंदर - पुन्हा एकदा !!

काही दिवसांपुर्वी पुरंदरला पुन्हा एकदा भेट देण्याचा योग आला. त्यावेळचे काही क्षण



दिवे घाट

नभ उतरु आलं
वीर मुरारबाजी देशपांडे

पुरंदर आणि मागे वज्रगड

आषाढस्य प्रथम दिवसे

Monday, July 09, 2007

कोडे : सुटकेचा अजब मार्ग

चला , आज एक कोडे घालतो...

एका आटपाट नगरात एकदा चार दरोडेखोरांनी मिळून दरोडा घातला. त्या नगराचे गृहमंत्री आपल्या आर. आर. आबांसारखेच कर्तव्यतत्पर होते, त्यामुळे त्यांच्या खात्याने तीच तत्परता दाखवून त्या चोरांना पकडले आणि न्यायालयासमोर उभे केले. न्यायाधीश महाराज आपल्या मुंबई बाँबस्फोट, मुंद्राक घोटाळा या सारख्या निवडक खटल्यांमध्ये अडकले होते. आणि तशीही या चोराकडून दंड म्हणून २५० वैगरे कोटी मिळणार नाहीत याची त्यांना खात्री होती. म्हणून त्यांनी सरळ या चोरांना सोडून द्यायचे ठरवले. पण तसे केले असते तर वृत्तवाहिन्यांनी आठवडाभर भंडावुन सोडले असते, असा विचार करून न्यायाधीशांनी त्या चोरांना एक कोडे घातले. जर त्या चोरांनी कोडे सोडवले तर त्यांना सोडून देण्यात येईल (आणि मिडियाला सुद्धा आडवे करता येईल, इतकी हुशार मंडळी तुरुंगात का ठेवायची असे म्हणून) आणि जर त्यांनी कोडे सोडवले नाही तर मात्र त्यांना पकडून तिहारला पाठवण्यात येईल अशी घोषणा झाली.

ते कोडे खालील प्रमाणे होते. सोबतच्या चित्रात दाखवल्या प्रमाणे चार कैद्यांना उभे करण्यात आले.

ते सर्वजण एकाच दिशेला बघत होते. त्यांना अशा पद्धतीने उभे करण्यात आले होते की

पहिला चोर, दुसऱ्या आणि तिसऱ्याला बघू शकतो
दुसरा चोर, तिसऱ्याला बघू शकतो
तिसरा आणि चौथा मात्र कुणालाही बघू शकत नाहीत.
प्रत्येकाच्या डोक्यावर एक एक टोपी ठेवण्यात आली होती. त्यांना सांगण्यात आले होते की एकूण दोन पांढऱ्या आणि दोन काळ्या टोप्या आहेत. प्रत्येक जणाला तो स्वतः कुठल्या रंगाची टोपी घालत आहे हे माहिती नाही. आणि त्यांना शिक्षेपासून वाचवण्यासाठी एकच गोष्ट करायची होती, ती म्हणजे आपल्या डोक्यावर कुठल्या रंगाची टोपी आहे ते ओरडून सांगायचे. कुणाही एकाने असे अचूक ओरडले तरी सर्वांची सुटका होणार. अर्थात या साठी नेहमीचे नियम लागू होतेच ते म्हणजे

कुणीही वळून बघायचे नाही किंवा हालचाल करायची नाही
एकमेकांशी बोलायचे नाही
डोक्यातून टोपी काढायची नाही

आता आपल्या सारख्या विद्वत जनांना प्रश्न असा आहे की कोण आपल्या डोक्यावरील टोपीचा रंग कुठल्या क्रमांकाचा कैदी अगोदर ओळखेल आणि का ?























उत्तर प्रतिसादात मिळेल :-)

Monday, July 02, 2007

साद सह्याद्रीची !

शनिवारी राजाशिवाजी.कॉम या संस्थेतर्फे भरविण्यात आलेल्या किल्ल्यांच्या छायाचित्र प्रदर्शनाला जाण्याचा योग आला. प्रदर्शनातून फिरताना तीन-चार तास कसे गेले ते सुद्धा कळले नाही. फार मेहनत करून हा खजिना आपल्यासाठी खुला करण्यात आला होता. याच प्रदर्शनाच्या वेळी ऋषितुल्य श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे सुद्धा दर्शन घडले.

अनेक किल्ल्यांनी आता छायाचित्रामधून साद घातली आहे.. बघूया कधी कधी कुठे कुठे जायला जमतेय ते !!

Saturday, June 23, 2007

'आमची माती, आमची माणसं'

आज कुठेतरी वाचनात 'आमची माती, आमची माणसं' या दूरदर्शन वरच्या कार्यक्रमाचा उल्लेख आला, आणि दुरवरुन 'ती' धून ऐकू येते आहे असे वाटून गेले क्षणभर.

संध्याकाळी साडेसहा वाजता दूरदर्शन वर हा कार्यक्रम लागत असे. अर्थात त्यावेळी त्यातील चर्चा आणि संबंधित गोष्टींमध्ये विशेष रस नसायचा. तरी तुळशीला पाणी घालणारी माउली, शेत नांगरणारे शेतकरी (अगदी मागे उडणाऱ्या बगळ्यासहित) , दूध काढतानाचे शेतकरी या सगळ्या आसपास नेहमी दिसणाऱ्या गोष्टी टी. व्ही. च्या पडद्यावर बघताना पाहुन विशेष आनंद होत असे. या सर्वाच्या सोबतीला "ही काळी आई, धनधान्य देई, जोडती मनाची नाती, आमची माती, आमची माणसं!." हे मस्त शिर्षकगीत अजूनच मोहिनी टाकत असे. या कार्यक्रमातून तज्ञांच्या मुलाखती सोबतच एखादा वेगळा प्रयोग केलेला शेतकरी मुलाखत देऊन जाई. अशा मुलाखती तर आम्ही हरखून पाहत असू.

आता या सर्वांचा विचार करताना असे वाटून जाते, की काय होते या कार्यक्रमात विशेष आवडावे असे, काहीही नाही. भरजरी साड्या आणि लक्झरी गाड्या नव्हत्या, मोठमोठ्या बिझनेस हाउस मधील भांडण नव्हती, विवाह बाह्य संबंध नव्हते की आचरट विनोद नव्हते. 'सो कॉल्ड' रियालिटी शो मधील एस.एम.एस. नव्हते की एकजात सारख्याच दिसणाऱ्या सिक्कीम मधील मुलीने तोडक्यामोडक्या हिंदीत बोलून खोलेलेले 'सुपर लोटो किस्मत के पिटारे नव्हते'. पण तरीही हा कार्यक्रम का लक्षात राहावा बरं?

ह्म्म !! त्याच्या नावातच या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं. 'आमची माती आमची माणसं' या दोनच गोष्टीत जीवनाचं सारं आहे, आपल्याला सर्वात जास्त सुखावणाऱ्या, आनंद देणाऱ्या आणि अभिमान वाटाव्या अशा या दोनच गोष्टी 'आमची माती आमची माणसं' !!

Thursday, June 21, 2007

दिसामाजी काहीतरी

गेल्या काही दिवसात काहीतरी चांगले वाचायला मिळाले. स्वतःला पुनर्प्रत्ययाचा आनंद आणि वाचकांना इथे आल्याचा आनंद (;-)) मिळावा म्हणून

१. जिद्दीच्या संदर्भातील सुंदर शेर
फलक को चाह है जहा बिजलिया गिराने की,
हममे भी ज़िद है, वही आशियां बनायेंगे । (फलक: आकाश)
****************************
२. दोन खळखळून हसवून गेलेले विनोद:

पहिला पुणेरी(दुसर्‍याला फोन करून) : 'देशपांडे' आहेत का?

दुसरा पुणेरी(चिडून): नाही पावनखिंडीत लढायला गेलेत, काही काम होतं का?

प.पू.:काही नाही त्यांना सांगा राजे गडावर पोहोचले आता मरायला हरकत नाही !!

****************************
पुण्यातील DSK विश्वच्या जाहिरातीतील 'घराला घरपण देणारी माणसं' हे वाक्य बघुन एका वखारवाल्याने आपल्या दुकानावर 'घराला सरपण देणारी माणसं' असा बोर्ड लावला

****************************
३. वसंत बापटांची सह्याद्रीवरील कविता
भव्य हिमालय तुमचा अमुचा , केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा
तुमच्या अमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिंवरथडी
प्यारा मला हे कभिन्न कातळ ,प्यारा मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यारा मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते ,तुकयाचा आधार मला

४. एका वाक्यातील हास्य
@ पोट पाठी लागतं, म्हणून तर येवढी धावपळ
@ मनावर ताण कमी करायचाय, 'ताणून' द्या
@ अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, 'लिप्ट' ने जा
@ काळजी करण्यापेक्षा काळजी 'घेणं' चांगलं
@ शब्द शोधावे लागणं हा कवीचा पराभव, आणि अर्थ शोधावे लागणं हा काव्याचा
@ दारू पिऊन गाडी चालवायला मनाई असते ना, मग बार बाहेर पार्किंगची जागा कशाला
@आयुष्य हे नदी सारखं आहे, थांबलं की डबकं

Tuesday, June 19, 2007

आज उतनी भी नही बची

"आज उतनी भी नही बची ..."

हातात प्रिंट आउट घेऊन समोरच्या बोर्डाकडे बघत असतानाच विचारांची रेल्वे मनातून धावून गेली. प्रिंट समोरच्या बोर्डावर लावावी म्हणून ड्रॉवर उघडला, आणि नेहमी हव्या तेवढ्या पिन्स उपलब्ध असणाऱ्या ड्रॉवर मध्ये एकही पिन नव्हती. का कुणास ठाऊक पण चटकन मनात हाच शेर आला,

आज उतनी भी नही बची हमारे पैमाने मे,
जितनी कभी छोड दिया करते थे मैखाने मे ।

आमचे फिजिक्स चे सर एकदा वर्गात हा शेर म्हणाले होते. नेहमी खडू हवे तेवढे उपलब्ध असताना ऐनवेळी, एकही खडू गवसला नाही म्हणून त्यांनी हा शेर म्हणून दाखवला होता. फारच मजेशीर व्यक्तिमत्त्व !!, शुक्रवारी लेक्चर संपत असतानाच न बोलता फळ्यावर काहीतरी खरडून निघून जायचे, ते गेल्यावर कळायचे की आज रात्री दूरदर्शन वर दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटाचे नाव, त्यातील कलाकारांचे नावे असे सगळे लिहिलेले असायचे फळ्यावर. त्यांचा विषय फिजिक्स असला तरी त्यांना शेती आणि बागकामात विशेष रस होता, त्यामुळे बाजारच्या दिवशी ते नियमीतपणे बाजारात दिसत काहीतरी विकताना. सर्व चुकार मुलेही त्यांच्या लेक्चरला आवर्जून हजर असायची, त्यांच्या या विशिष्ट पद्धतीमुळे.

त्यांच्याच प्रमाणे आमच्या प्राथमिक शाळेतील एका सरांची एक विशिष्ट सवय होती, ती म्हणजे मारताना हातातील घड्याळ काढायची. म्हणजे तसे ते काही फार मुलांना मारत नसत, क्वचितच, पण जेव्हा कधी मारायचे तेव्हा हातातील घड्याळ खिशात ठेवूनच. त्यांची ही सवय सर्वांना एवढी परिचित होती, की नंतर नंतर त्यांनी फक्त घड्याळाला हात लावला की मुले शांत होत असत.

असे अनेक शिक्षक अनेक सवयी, त्या सोबत येणाऱ्या कडू गोड (म्हणजे त्या त्या वेळी कितीही कडू वाटल्या असल्या तरी आता गोड वाटणाऱ्या) आठवणी, सरकून गेल्या नजरेसमोरून.

खूप खूप लिहिता येईल,
..पण पुन्हा केव्हा तरी,

तूर्तास मात्र हातात कागद आहे आणि दुसरीकडे पिन शोधतो आहे ,
त्या न सापडणाऱ्या पिन ने सुद्धा टोचण्याचा धर्म पाळला हे मात्र नक्की...
आह !!