Monday, July 24, 2006

वैराटगड

२२-२३ जुलै ला हरिश्चंद्रगड करायचा असे सर्वानुमते (एकमताने नव्हे) ठरले होते, मात्र मर्फीच्या नियमाला अनुसरुन ठरवल्याप्रमाणे होउ शकले नाही आणि अगदी शेवटच्या क्षणी तो बेत टाळावा लागला (यात विदेशी शक्तींचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही). पण तरी सुद्धा निदान एक दिवस तरी सत्कारणी लागावा असा विचार करुन शनिवारी वैराटगडावर जाण्याचे ठरले (हे मात्र एकमताने). सकाळी सहा वाजता स्वारगेट स्थनकावर सर्वांनी यायचे असे ठरले होते, त्याप्रमाणे आरती, भक्ती, मिहिर आणि कूल असे चार जण जमले. मात्र त्यातच सकाळी सहा वाजता जी.एस. ने फोन करुन आपल्याला बेदम 'ताप' आलेला आहे असे कळवले (येथे ताप शब्दावर श्लेष असावा का ?). मग जमलेल्या मंडळींनी वैराटगड की चंदन वंदन या मधुन वैराटगडाला पसंती दिली. आणि कर्नाटक सरकारची सातार्‍याला जाणारी बस पकडली. जोरदार पाउस सुरु होता, आणि वाटेत कात्रज घाटापासुनच आम्हाला निसर्गाची आमच्या वर कृपा होणार हे लक्षात आले. वाटेत तुडुंब भरुन वाहणार्‍या नीरा नदिच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले.

वाईपासुन जवळच असलेले शंकरनगर हे गाव वैराटगडाच्या पायथ्याशी आहे. तिथे जाण्यासाठी पुणे-सातारा मार्गावरील कुठलिही गाडी पकडुन भुईंज च्या थोडेसे पुढे पाचवड नावाच्या गावाला उतरावे, तिथुन आसले किंवा शंकरनगर ला जाण्यासाठी बस, खासगी वाहने असे पर्याय उपलब्ध आहेत (बस भाडे रुपये ४). आम्ही बस हा पर्याय निवडला. या बसचे कंडक्टर फारच सौजन्यशील निघाले, आम्ही कुठे जाणार आहोत याची चौकशी करुन लगेच बस मधे असलेल्या एका मुलाला आम्हाला रस्ता दाखवुन देण्याची सुचना केली. पाचवड वरुन साधारण पाच्-सात मिनिटातच आम्ही आसले गावी उतरलो, कंडक्टर ने सांगितल्याप्रमाणे तो मुलगा आम्हस्ला रस्ता दाखवुन देण्यासाठी थोडेसे पुढे आला. खरं म्हणजे शंकरनगरला उतरुन डावीकडे जाणारी मोठी वाट पकडली तर थेट गडापर्यंत कुठेही न चुकता जाणे होते, पण नेहमी वाट चुकणे असा अलिखित नियम असल्यामुळे आम्ही आसले गावातील मंदिराच्या बाजुने निघालो आणि रस्ता चुकलो. एका कॅनल च्या बाजुने बराच वेळ चालत गेल्यानंतर तो ओलांडुन आम्ही गडाच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला. आता गडाच्या पायथ्याशी पोचल्यनंतर मात्र पुढे वाट दिसेना म्हणुन मग दुरवर दिसणार्‍या एका घराकडे जावुन रस्ता विचारावा आणि पुढे जावे असे (सर्वानुमते) ठरले. त्या घरी पोचताच तिथल्या दोन तिन कुत्र्यांनी आमचे जोरदार स्वागत केले, आणि त्या आवाजाने बाहेर घरमालकीणीने आम्हाला रस्ता दाखवला. त्यांनी दाखवलेल्या रत्यावरुन आम्ही मार्गाक्रमण सुरु केले. आता पावसाचा जोर थोडासा ओसरला होता पण आम्ही अगोदरच ओलेचिंब झालो होतो त्यामुळे त्याचे विशेष काही वाटले नाही. आता समोर बर्‍यापैकी उंच वैराटगड दिवस्त होता. त्याची एक सोंड अगदी काटकोण त्रिकोणाच्या कर्णासारखी तिरकी होत गेलेली होती दुसर्‍या बाजुने आम्ही चढायला सुरुवात केली, दोन टेकड्या पार करुन आम्हाला तिथे पोचायचे होते. साधारण तासाभरात आम्ही दुसर्‍याटेकडिवर येउन पोचलो आता आम्हाला डावीकडे आणी उजवीकडे सुरेख दृश्य दिसत होते. रिमझिम पाउस थांबला होता आणि दुरवर धंगाचे विविध खेळ सुरु होते. खाली दिसणारी शेते हिरवाईने नटलेली दिसत होती. ज्या पठारावर आम्ही उभे होते ते तर भान हरपुन टाकत होते. स्वच्छ वातावरण, मोकळी हवा, डोळे भरुन पहावे असे सौंदर्य, शब्दात पकडने कठीनच. आमचा इथवरच चढणं सार्थ करणारा ते एकुन वाटावरण होते. अशा सगळ्या वातावरणात आम्हई थोडा वेळ रेंगाळलो.आणि मग पुढे वाटचालिस सुरुवात केली, काही ठिकाणि निसरड्या दगडांपासुन रस्ता मिळवत आम्ही गडाच्या मोठ्या कातळाच्या समोर उभे राहिलो. त्याच्या उजव्य बाजुने परिक्रमाकरत गडात प्रवेश करावा लागतो. वाटेत दोन्-तीन पाण्याचे टाके दिसले. गडाच्या शेवटच्या पायर्‍या चढुन गडात प्रवेश केला. या गडाला दरवाजा सदृश्या काहीही दिसले नाही.

गड आटोपशिर आहे दोन पाण्याचे तळी, एकुण तीन देवळे. दोन हनुमानचे आणि एक वैराटेश्वराचे. पैकी वैराटेश्वराच्या देवळातच आम्ही थांबण्याचे ठरवले होते. इतर गडावर तत्पुरत्या स्वरुपाची झाडे आढळतात पण या गडावर मात्र वड पिंपळ अशी दिर्घायुषी झाडे होती. पाउस थांबुन आता जोराचा वारा सुरु झाला होत आणि तो जास्तच झोंबत होता. म्हणुन पटकन मंदिरात जावुन जेवणाची तयारी केली. भक्तीने बरेच जण येणार अशी शक्यता असल्यामुळे पहाटे लवकर उठुन स्वयंपाक बनवुन आणला होता. या कष्टाळुपणाबद्दल तिचे सर्वांनी कौतुक केले (अर्थातच मिहीरचे सुद्धा), आरतीने सुद्धा मस्त स्वयंपाकाची तयारी ठेवली होती. एकुण सदस्य संख्या चारच असुनही जास्त स्वयंपाक उरणार नाही अशी सर्वांची (का कुणास ठावुक) खात्री होती. उसळ, पराठे, बटाट्याची भाजी, चटनी असा मस्त मेन्यु होता, त्यावर सर्वांनीच आडवा हात मारला. जेवण संपत आलेले असतांनाच एक आस्चर्य घडले. शंभु महादेवाची पिंड आम्ही जेवायला बसलो तेंव्हा कोरडी होती त्याच्या भोवताली पाणी गोळा होण्यास सुरुवात झाली होती. पाणी येण्याच्या कुठलाही मार्ग नसल्याने हे पाणी कुठुन येत असावे यबद्दल आस्चर्य वाटत होते. देवाचा कोप असावा की जीवंत झरा याबद्दल थोडीशी चर्चा देखील झाली. बराच वेळ निरिक्षण केल्यावर आढळले की महादेवाच्या पिंडीच्या बाजुला एक फरशी फुठलेली असुन त्यामधुन पाणी येत होते. जेवण संपवल्या नंतर गडाची परिक्रमा करायला सुरुवात केली. थंडगार हवेतुन गडाच्या तटबंदीवरुन चालायला आम्ही सुरुवात केली. आजुबाजुला दिसणारे दृश किती किती साठवावे असा प्रश्न पडत होता. हिरवळीने गच्च भरलेले डोंगर, त्यावरुन वर्‍यात डोलणारी झाडे, पाण्याने भरलेली शेते, काही ठिकाणची काळी माती, रंगाची नुसती उधळण झाली होती. सोबतीला मोराचे आवाज, पक्षयांचे आवज सर्वच केवळ अविस्मरणिय. वातावरण मोकळे झाल्यमुळे आम्ही आजुबाजुचे गड ओळखण्याचे प्रयत्न केले, त्यात आम्हाला फक्त चंदन्-वंदन ओळखता आले (इथे सर्वांना परत एकदा जी.एस. ची कमी भासली). तटबंदीवरुनच आम्ही गडाच्या मुख्य वाटेकडे पोचलो आणि गड उतरायला सुरुवात केली. उतरतांना मजेत खेळत, वातावरणचा आनंद लुटत तासाभरत गडाच्या पायथ्याशी शंकर नगरला येउन पोचलो. पाचवडा कसे जावे या विचारत असतांनाच एक त्रक्टर येतांना दिसला आणि त्यानेच पाचवड पर्यंत जायचे ठरले. रत्याने जातांना सर्व बाजुने गडाचे सुरेख दर्शन घडले. पाचवड ला पोचल्या बरोबर पुण्याला जाणारी गाडी मिळवुन साडे सहा पर्यंत पुण्यात परत आलो.

मनाला ताजंतवानं करणारा हा अजुन एक ट्रेक अतीव समाधान देउन गेला.