Wednesday, April 25, 2007

विडंबन - केव्हा तरी पहाटे

नुकत्याच झालेल्या बहुचर्चित अभिषेक-ऐश्वर्या विवाहामुळे अनेकांच्या मनात अनेक भाव दाटुन गेले. असेच काही भाव टिपण्याचा हा एक प्रयत्न . मुळ कविता या दुव्यावर बघायला मिळेल

जेव्हा घरी जयाच्या ....

(विवेक आणि सलमान) :
जेव्हा घरी जयाच्या , सजवुन कार गेली
सुजले रडुन डोळे, पलटून नार गेली ॥१॥

(सलमान :)
मारू आता कुणाला, सय दाटते कुणाची
हसवुन मिडियाला, फसवुन नार गेली ॥२॥

(सलमान विवेकला:)
जळलो तुझ्यावरी मी, उरल्या खुणा मनाशी
जळलो तुझ्यावरी मी, जळवुन नार गेली ॥३॥

(विवेक:)
फिरले क्षणात माझे, ग्रह एक त्या नभाचे
इमले स्वकल्पनाचे, उधळुन नार गेली ॥४॥

(राणी - अभिषेकशी लग्न करण्याची इच्छा अपुर्णच राहिली) :
उरली मनात आता, नशिबा कटू कहाणी
युवराज हा जयाचा, गटवुन नार गेली ॥५॥

--- सुभाष डिके (कुल)

Thursday, April 19, 2007

मी हसतो - माझ्यावर

काही दिवसांपुर्वी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील एका हॉटेल मध्ये मित्र मैत्रिणींसोबत जेवायला गेलो होतो. बऱ्याच दिवसांनी सर्वजण भेटत असल्यामुळे जेवणाच्या साथीने गप्पा रंगत गेल्या. प्रत्येक जण आपापल्या ऑफिस मधुनच तिकडे येउन पोहोचला होता. जेवण झाल्यावर सगळे बाहेर आले, आणि मी सर्वात शेवटी निघालो. निघतांना टेबलावर एक फाईल दिसली, आणि आपल्यातल्याच कुणाची तरी फाईल विसरुन राहिली असे वाटल्यामुळे ती फाईल घेउन मी बाहेर आलो. बाहेर येताच एका मैत्रिणीला, "काय गं, काय हा वेंधळेपणा? असे काम करतात का? फाईल इथेच विसरुन चालली होतीस ना ?", असे विचारुन ती फाईल पुढे केली. माझे वाक्य संपत असतांनाच सर्वांनी माझ्याकडे पाहिले, काही क्षण सगळे स्तब्ध झाले आणि दुसऱ्याच क्षणी हास्याचा कल्लोळ उडाला. मला मात्र काय घडले याची काहीच कल्पना न आल्याने मी बावरुन त्यांच्याकडे बघत होतो. हळूच लक्ष हातातल्या फाईल कडे गेले, मी फाईल उघडुन बघितली आणि आता मात्र त्याच फाईल मागे डोके लपवण्याची वेळ आली होती. झाले काय होते की, फाईल समजुन मी हॉटेलातील भले मोठे मेन्यु कार्डच उचलुन आणले होते !! सर्व वेटर्स ची नजर चुकवत हळूच जाउन परत ती 'फाईल' ठेवुन आलो. आजही त्या हॉटेल समोरुन जातांना त्या 'फाईल'ची आठवण आल्याशिवाय रहात नाही.
*****************************************************
असाच एक दिवस साखर झोपेत असतांनाच मोबाईल गुरगुरला. ऍप्लिकेशन मध्ये एक गोंधळ झाला असुन तो त्वरित ठिक करणे भाग आहे, हे सांगणाऱ्या बॉस चा फोन होता. नाइलाजाने उठलो, आवरले आणि खाली येउन स्टॉपवर कॅबची वाट पहात उभा राहिलो. सकाळच्या प्रसन्न वेळी बरेचसे लोक पायी फिरायला जात होते. जातांना प्रत्येक जण माझ्याकडे पहात होता. सिनेमातील नायका प्रमाणे आपण काही तरी विसरुन तर नाही ना आलो या भीतीने मी स्वतःकडे अनेक वेळा बघितले पण काही कळायला मार्ग नव्हता. खरोखरचं आपल्यामध्ये काहितरी पाहण्यासारखे आहे हे जगाला पटलेले दिसते या आनंदाने मी खुललो. पण त्यांची 'विचित्र नजर' मला अस्वस्थ करत होती. आता मात्र मी त्याचा विचार करणे थांबवले आणि जरा इकडे तिकडे बघु लागलो. हळुच माझी नजर माझ्या सावली कडे गेली. आणि मला 'त्या' हरणाची गोष्ट आठवली ज्याला आपल्या पायाचे प्रतिबिंब बघुन वाईट वाटले होते पण शिंगाचे सौंदर्य बघुन त्यांचा अभिमान वाटला होता. 'पण शेवटी पायानेच वाचवले ना' असा विचार करत असतांना माझी नजर माझ्या शिंगाकडे (अर्थात डोक्याच्या सावली कडे) गेली, आणि क्षणार्धात मला लोकांच्या त्या विचित्र नजरेचे कारण कळले. घाईने बाहेर पडत असतांना मी छोटासा कंगवा वापरुन भांग पाडत होतो आणि घराला कुलुप लावतांना तो कंगवा केसात तसाच राहिला होता. याचाच अर्थ मी गेले काही मिनिटे अर्थवट पींजारलेले केस आणि त्यात अडकलेला कंगवा अश्या परिस्थितीत स्टॉपवर उभा होतो. त्या तश्या अवस्थेत मी कसा दिसत असेन हे आठवले की हसुन हसुन पुरेवाट होते....
******************************************
वरचे सगळे लिहुन झाल्यावर एकटाच हसत होतो तर ऑफिसात बसलेली मोजकीच टाळकी माझ्याकडे बघायला लागली. रात्रीच्या २.३० वाजता ऑफिसात कंटाळा आला असतांना आपल्याच वेंधळेपणाचे किस्से आठवुन हसण्यात काय मजा आहे त्यांना कसे कळणार !!

Monday, April 16, 2007

ट्रेकींगच्या आठवणी (मोबाईलच्या साह्याने)

माहुलीच्या पायथ्याशी शंभुमहादेवाचे प्रसन्न देउळ


वासोट्याच्या पायथ्याशी
















माहुलीवरुन उतरतांना टळटळीत उन्हात नजरेला सुखावणारी रंगाची उधळण


















जुन्या वासोट्याच्या बाजुला असलेला बाबुकडा














माहुली - डावीकडे भंडारगड, मध्ये चंदेरी सुळका आणि उजवीकडे माहुली















खांदेरी - समुद्रात खंबीरपणे उभा असलेला
















कनकेश्वराच्या मंदिरावरिल कलाकुसर


















जंगली जयगडाहुन दिसणारी घाटातली वाट













वासोटा - नागेश्वराकडे जाणारी वाट














वासोट्याहुन परततांना













- सुभाष डिके

Thursday, April 12, 2007

अविस्मरणीय जंगली जयगड !!

खुपच सुंदर झाला हा ट्रेक. 'घनदाट' जंगल हे या ट्रेक चे वैशिष्ठ्य. प्रत्येक बाण्याच्या खुणेपाशी नजर पुढच्या खुणेचा शोध घेण्यासाठी भिरभिरत होती आणि त्याचवेळी मन त्या अनामिक गिरीप्रेमींना धन्यवाद देत होते. आणि 'त्या' माचीवरुन दिसणारे दृश्य तर केवळ अप्रतीम, खाली दिसणारे गच्च जंगल, त्यामधुन धावणारी नागमोडी घाटातली वाट, या सगळ्यांचे शब्दात वर्णन करणे अशक्य. इतर ट्रेक मधे कुठेतरी रस्त्याने मानवी अस्तित्वाच्या काही तरी खुणा जाणवत राहतात पण या जंगलात शिरल्यानंतर अशा काहीही खुणा दिसत नव्हत्या. काही क्षण स्तब्ध बसल्यानंतर पक्ष्यांच्या विविध आवाज मन प्रसन्न करुन टाकते. स्वतः चे अस्तित्व विसरायला लावण्याचे कसब या परिसरात नक्कीच आहे. वसंतगडावरचे पक्षीदर्शन, चाफळच्या राममंदीरातील प्रसन्न वातावरण, तिकडे मनसोक्त अनुभवलेल्या पक्ष्यांच्या लीला, आणि रात्रीच्या जेवणातला 'शेंगदाण्याचा महाद्या' , किती किती लिहावे काय काय आठवावे. हे सगळे सगळे दिर्घकाळ स्मरणात राहणार यात शंका नाही.. जयगडाच्या संदर्भातील एक लिन्क http://www.wikimapia.org/#y=17454951&x=73698939&z=17&l=0&m=a&v=2 उजविकडे दुरवर पसरलेले जंगल सगळे काही सांगुन जाईल .. सुभाष(कुल)