Sunday, August 07, 2022

दुपार - एक कविता


कधी कधी विचार करतांना जाणवतं, दुपार ही किती अनोखी गोष्ट आहे!

सकाळच्या ब्राह्ममुहूर्ता साठी असतात कविता अन  भूपाळ्या
कातरवेळ हा तर कवींचा आवडता विषय
आणि रात्र ही शृंगार किंवा करुण रसाने भरलेली कवितांमधून
पण दुपार!
दुपार नेहमीच अशी दुर्लक्षलेली

दुपारीकडे नसतो सकाळचा प्रसन्नपणा
ना कातरवेळेची हुरहूर
अन ना रात्रीचा रिक्तपणा
पण तरीही दुपार येते रोज, एक दुवा बनून

सकाळच्या धबडग्यातून जरा निवांत होण्याची हीच ती वेळ
आणि हीच वेळ जाणीव करून  देते,
सकाळ  मागे पडल्याची आणि कातरवेळ अजून दूर असण्याची देखील

सकाळच्या गेलेल्या क्षणांमधून काही क्षण लक्खपणे समोर येतात अशाच या दुपारी 
तशा घडलेल्या असतात खूप गोष्टी, पण दुपार जाणीव करून देते त्या चुकार काही क्षणांची

शेवटी आयुष्याची दुपार तरी काय निराळी असते?

कातरवेळेकडे लक्ष ठेवून मागे वळून बघतांना
येतात समोर ते काही निवडक  क्षण आयुष्याच्या या दुपारी,
आणि ते क्षण असतात सोनेरी रुपेरी
कारण ते असतात मित्र मैत्रीणींबरोबरचे काही मोजके क्षण

बळ देणाऱ्या या क्षणांना दिलेला उजाळा पुरेसा होऊन जातो
कातरवेळेत समाधानाने प्रवेश करण्यासाठी

- सुभाष 

Monday, February 22, 2010

आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार...

आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार...

आमची प्रेरणा

आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार , घरादाराच्या चिंधड्या होणार,
सरकार किती परदेशी गेले ते शोधणार, रिक्षावाले गेले याचा विसर पडलेला असणार ,
अमेरिका संध्याकाळी निषेध करणार , सकाळीच त्यांनी 'पाक' ला शस्त्रे विकलेली असणार ,
इकडे पाटील कपडे बदलणार, देशमुख चित्रपट काढणार ,
'बाबा' रात्रभर पार्टीत नाचणार, बाहेर जोड्यांसाठी मंत्री उभे असणार ,
पद्मभूषण मात्र शाहरुख च ठरणार , काय रे देवा !

आता पुन्हा दुष्काळ पडणार, विदर्भ मराठवाडा होरपळून निघणार,
आबा रडायला लागणार, शिंदे हसतच राहणार ,
चव्हाण-ठाकरे दिल्लीला जाऊन निर्णय घेणार ,
'हे' वाघावर तर 'ते' इंजिनावर स्वार होणार ,
आमटे , बंग वेड्यागत अनवाणीच धावणार ,
जाणते साहेब मात्र लवासात स्विमिंग पूल उभारणार , काय रे देवा !

आता पुन्हा निवडणुका होणार, काळा पैसा सगळा बाहेर पडणार,
यांना जिजाऊ तर त्यांना दादोजी आठवणार ,
मातोश्री गरजणार, कृष्णकुंज आदेश देणार,
बाई 'झंझावाती' रोड शो करणार, उनाड च्यानेल्स बोकाळणार ,
अण्णा उपोषण करणार, कुणा कुणाचा 'स्वाभिमान' जागा होणार,
निवडणुकीची सुट्टी म्हणून आम्ही मात्र खंडाळ्याला जाणार, काय रे देवा !

आता पुन्हा अप्रेझल होणार , जो तो बॉस ला शिव्या देणार
बॉस त्याच्या बॉस च्या नावाने खडे फोडत असणार
कंपनी मात्र कागदावर तोटाच दाखवत राहणार
किती टक्के हाच महत्वाचा प्रश्न होऊन राहणार
पंधरा नाही तर दहा तरी द्या असे लाचार स्वर निघणार
'थाळात' मात्र एक टन उस ९० लाच तुटणार, काय रे देवा !
- सुभाष डिके (कुल)

तळटीपा :
१. 'थाळ' - ऊस तोडणीचे स्थळ
२. तोडणी मजुराला ९० रुपये टन हा अगदी अलीकडचा खरा भाव आहे
३. घटना व पात्रे खरे आहेत - योगायोग नाही

Tuesday, January 13, 2009

तिळगूळ घ्या गोड गोड बोला

रस्त्यावर गर्दी आहे चिडचिड नको, कामवाली बाई आली नाहिये वैतागु नका, राग वैताग चिंता द्या आता फेकुन

आणि इतरांशी तर गोड बोलाच पण अंतरात्म्याशी पण गोडच बोला :) ...

{बस झाले तत्वज्ञान ... }

तिळगूळ घ्या गोड गोड बोला... मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा... (संक्रांत या शब्दाचा अर्थ संकट असा होतो म्हणतात.. मग संक्रांतीच्या शुभेच्छा कशा काय देत असतील कुणास ठाउक.. असो भावना पोहचण्याशी मतलब...) खुप खुप गोड बोला आणि गोड रहा..

Thursday, November 27, 2008

निषेध ! त्रिवार निषेध !!!

निषेध ! त्रिवार निषेध !!!

मुंबईत ज्या पद्धतीने भ्याड अतिरेकी हल्ला करण्यात आला त्याचा निषेध...

आणि सलाम त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना जे तळहातावर शीर घेउन लढले आपल्या मुंबईकरांसाठी..

आता जत्रा भरेल वृत्तवाहिन्यांवर .. कोणी निषेध करेल तर कोणी सरकारला धारेवर धरेल .. सगळेच सारखे.. या नेभळट राजकारणी लोकांमुळेच हा दिवस बघावा लागतोय..

या सगळ्या राजकारण्यांना समुद्रात बुडवून टाकले पाहिजे आणि त्या वृत्तवाहिन्यांच्या मालकांना तर भर चौकात उलटे टांगून धुरी द्यायला हवी. शेवटी काय थोडे दिवस हा प्रसंग चर्चिला जाणार.. पकडलेच अतिरेकी तर त्यांच्यावरून राजकारण होणार... सगळेच सारखे..

आता कुठे गेले स्वतःच्या नेत्याला संरक्षण देणारे , मुंबईचं संरक्षण का नाही केलं म्हणावं..

आणि तोडफोड करणारे , नारे लगावणारे.. तुम्ही तरी अतिरेक्यांची डोकेफोड का नाही केली??

आता कुठे गेले उठसूठ निषेध करणारे आणि संप करणारे.. त्यांना तर आनंदच होत असेल अर्थव्यवस्था डळमळीत होते आहे म्हणून..

स्व्यंयंशिस्तवाले कुठे आहेत.. आता सुपात आहेत म्हणून बोलतील चार शब्द, उद्या जात्यात आल्यावर ते पण नाचणार या सर्वांच राजकारण करून

आणि ते.. जे खऱ्या अर्थाने या सर्व गोष्टी रोखू शकतात त्यांना तर बोलण्यातच अर्थ नाहि.. कारण जनते पेक्षा त्यांना 'जनपथा'ची काळजी अधिक..

या कुणाकडून अपेक्षा ठेवणेच व्यर्थ आहे हे माहितच होते आता खात्री पटली

नागरिकांनो एक व्हा.. एकत्र रहा..

Saturday, October 18, 2008

माझा बाप मरतो तेंव्हा ...

ही कविता सकाळच्या मुक्तपीठ या पुरवणीत प्रसिद्ध झाली असुन ती ईसकाळ वर http://esakal.com/esakal/10212008/MUKTAPITHED14349D32.htm या ठिकाणी वाचता येईल


माझा बाप मरतो तेंव्हा ...
सारखं वाढणारं व्याज बघून, बाप बसला चेहरा पाडून

सावकाराचा पडण्या अगोदर घाला, फाशी घेतो बोलून गेला ॥

माझ्या काळजावर झाला आघात , आईचे अश्रू मावेना डोळ्यात

म्हटलं बघावं तरी जाउन, कोणी मदत करेल का हे ऐकून ॥

पहिले भेटले एक पुढारी, चालले होते सांभाळत ढेरी,

म्हटलं साहेब बाप मरतोय, 'कसं होणार'? म्हणून आत्महत्या करतोय ॥

साहेब म्हणाले जात सांग, किती मतदान घरात सांग,

विचारून घेइन एकदा मॅडमला, नाहितर येउच शेवटी सांत्वनाला ॥

मरू नकोस सांग त्याला, एक नोट देइन मी एका मताला,

त्याला म्हणाव भागव त्यात, स्वप्न सुद्धा पाहवित की रे आपल्या आवाक्यात.. ॥

मग भेटले उद्योगपती, बसायला गाडी आणि मोबाईल हाती

म्हणालो साहेब! वाचवा बापाला, खुप खुप धन्यवाद मिळतिल बघा तुम्हाला ॥

साहेबः "सेझ ला जमीन देणार का विचार, करंजा तरी लाव म्हणावं मिळतील हजार"

हजार लाख कोटी फक्त, दिसतच नाही फाशी आणि रक्त ॥

सावकाराला देण्यापेक्षा मला जमीन दिली असती,

बापाला घर आणि तुला नोकरी मिळून गेली असती ॥

पुढे भेटला मित्र पत्रकार, वाटलं बघावा देतो का आधार,

म्हणाला माझा बाप वाचव, अन्यायाविरुद्ध रान माजव ॥

मित्र म्हणाला, तुझा बाप खाईल काय रे तीन चार साप?

तरच मी ते छापू शकतो, जाहिरातदारांना कापू शकतो ॥

मल हवे तीन पायाचे अस्वल किंवा एखादी नटी नखरेल,

किंवा चालेल एखादा मुलगा आणि तो बुडेल अशी बोअरवेल ॥

गेला मरून बाप तर करूया बातमी सनसनखेज,

तीन चार शो लाइव्ह करू आणि नंतर स्पेशल कव्हरेज ॥

शेवटी भेटले श्री हनुमान, कष्टी दुःखी हरपून भान

म्हणाला देवा तुमचाच सहारा, तुम्हीच वाचवा माझा म्हातारा ॥

मारुती हसला म्हटला बेटा, मलाच माझी पडली चिंता

रामाचेच अस्तित्व नाकारताहेत, तिथे हनुमानाची काय बात ॥

तुझ्या बापाची क्षमा मागतो, यमराजांशी चर्चा करतो,

मरणार तर तो आहेच, स्वर्ग तेवढा मिळतो का ते पाहतो ॥

निघालो घराकडे होउन पुर्ण हताश, डोक्यात होते प्रश्नचिन्ह मन होते निराश

घरी बाप फाशी घेउन गेला होता, बाळांना वाली कुणी सुद्धा उरला नव्हता ॥

लग्नात नटायचं स्वप्न, ताईच्या मनात विरून गेलं

"मेरा भारत महान", हे मात्र चांगलच मनात ठसलं ..

-- सुभाष डिके

Friday, September 05, 2008

तंत्रज्ञान आणि मी

सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा... गणपती बाप्पा मोरया...

माझ्या या अनुदिनीवरून मी माझ्या दुसऱ्या एका अनुदिनीची ओळख करून देत आहे.

आपणास विनंती आहे की आपण माझ्या http://coolsubhash-tech.blogspot.com या तंत्रज्ञान विषयक अनुदिनीला अवश्य भेट द्यावी व सुचना/प्रतिक्रिया कळवाव्यात..

आपला,

सुभाष

Monday, August 18, 2008

वेल प्लेड अखिल !!

वेल प्लेड अखिल !!
दचकला असाल कदाचित.. कारण आत्ताच अखिल बॉक्सिंगच्या ५४ किलो गटातील उपउपांत्यफेरीतून बाहेर पडला..
आता आपला मेंदू बाजूला काढुन ठेवणार्‍या वृत्तवाहिन्यांवर या सर्व गोष्टींचा उहापोस सुरु झाला सुद्धा असेल..
असे असतांना त्याला वेल प्लेड कशासाठी...


कारण..


एकेकाळी क्रिकेट हा एकमेव खेळ मानला जात होता आणि इतर खेळ केवळ दुरदर्शनच्या बातम्यामधुन दिसायचे... अशा परिस्थितीत अभिनव पाठोपाठ ऑलिंपिक पदकाची आशा भारतीयांच्या मनात उमटवली हेच या खेळाडूंच मोठं यश म्हणता येईल.


अखिलने जर पदक मिळवले असतेच.. तर बिजिंग मध्ये तिरंगा वर जातांना बघुन नक्कीच अभिमान वाटला असता.. पण या स्पर्धेत उतरण्यापुर्वी संभाव्य पदक विजेत्यांमधे फारसा उल्लेख नसलेल्या या खेळाडूंनी आजवर केलेली कामगिरी नक्कीच प्रेरणादायी ठरेल...


आज नाही विजय मिळाला पण हरकत नाही.. निदान या खेळांकडे बघण्याचा दृष्टीकोन तरी बदलेल... आणि हाच अखिल आणखी अनेक जणांसोबत पुढच्या ऑलिंपिक मध्ये निर्विवाद विजय सुद्ध मिळवेल.. अर्थात हा सर्व आशावाद वाटत असेलही .. पण आशेवरच जग चालते नाही का !!!


सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा... आणि सरकारला प्रार्थना की निदान आतातरी या सगळ्या खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल अशी तरतूद करावी...