कधी कधी विचार करतांना जाणवतं, दुपार ही किती अनोखी गोष्ट आहे!
सकाळच्या ब्राह्ममुहूर्ता साठी असतात कविता अन भूपाळ्या
कातरवेळ हा तर कवींचा आवडता विषय
आणि रात्र ही शृंगार किंवा करुण रसाने भरलेली कवितांमधून
पण दुपार!
दुपार नेहमीच अशी दुर्लक्षलेली
दुपारीकडे नसतो सकाळचा प्रसन्नपणा
ना कातरवेळेची हुरहूर
अन ना रात्रीचा रिक्तपणा
पण तरीही दुपार येते रोज, एक दुवा बनून
सकाळच्या धबडग्यातून जरा निवांत होण्याची हीच ती वेळ
आणि हीच वेळ जाणीव करून देते,
सकाळ मागे पडल्याची आणि कातरवेळ अजून दूर असण्याची देखील
सकाळच्या गेलेल्या क्षणांमधून काही क्षण लक्खपणे समोर येतात अशाच या दुपारी
तशा घडलेल्या असतात खूप गोष्टी, पण दुपार जाणीव करून देते त्या चुकार काही क्षणांची
शेवटी आयुष्याची दुपार तरी काय निराळी असते?
कातरवेळेकडे लक्ष ठेवून मागे वळून बघतांना
येतात समोर ते काही निवडक क्षण आयुष्याच्या या दुपारी,
आणि ते क्षण असतात सोनेरी रुपेरी
कारण ते असतात मित्र मैत्रीणींबरोबरचे काही मोजके क्षण
बळ देणाऱ्या या क्षणांना दिलेला उजाळा पुरेसा होऊन जातो
कातरवेळेत समाधानाने प्रवेश करण्यासाठी
- सुभाष
साहिल के सुकून से हमे इन्कार नही, लेकिन तूफानों से कश्ती निकालने का मजा ही कुछ और है..
Sunday, August 07, 2022
दुपार - एक कविता
Subscribe to:
Posts (Atom)