Monday, June 12, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

नंदनने सुरु केलेल्या पुस्तकाची मांदियाळीच्या खेळात रजनीगंधाने मला आमंत्रित केले त्यावेळी दोन-तीन पुस्तकांचे वाचन सुरु होते, म्हणुन म्हटलं थोडसं थांबुन लिहावं. पुस्तकांच्या बाबतीत मी स्वतः ला बालपणापासुनच सुखी मानतो, कारण वाचनालयाचं सदस्यत्व पुरेपुर उपभोगायला मिळालं होतं. सानेगुरुजींच्या गोड गोष्टींपासुन मला वाटतं सुरुवात झाली आणि त्या प्रवासाने थांबायचं नावच घेतलं नाही. त्यावेळी फास्टर फेणे हातात पडला, आणि भा. रा. भागवतांच्या या मानसपुत्राने मला झपाटले, एकामागोमाग एक अशी त्यांची बरिच पुस्तके मी वाचुन काढली होती. पुढे चि. वि. जोशीं वाचायला मिळाले, गुंड्याभाउ हे पात्र तर आजही माझ्या आठवणीतुन जात नाही. जसजसे वय वाढले तसतसे पुस्तकाची आवडही वाढत आणि बदलत गेली. या प्रवासात पुढे अनेक रथी महारथी भेटले, व. पु. , पु. लं. सुद्धा भेटले ते याच काळात. ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं समजावुन घेण्याचा पहिला प्रयत्न केला तोही याच काळत. विनोद, कारुण्य, प्रेम, समाज सर्व सर्व विषयांवरिल वाचन, वाचन आपल्याला किती समृद्ध करु शकते, याचा प्रत्यय देउन गेले. आजही कुठल्याही वळणावर हीच पुस्तके सोबत करायला नकळत उभे राहीलेली जाणवतात.

१. नुकतेच वाचलेलं/विकत घेतलेलं पुस्तक -

माझा साक्षात्कारी ह्रदयरोग - अभय बंग

२. वाचले असल्यास त्याबद्दल थोडक्यात माहिती -
साधारणतः वैद्यकीय बाबींवर आधारलेली पुस्तके हे केवळ आकड्यांनी आणि वैद्यकीय संज्ञांनी भरलेले असते असा समज मोडुन काढण्याचे काम हे पुस्तक करत. लेखकाच्या जीवनात नकळत शिरलेला ह्रदयरोग पासुन या पुस्तकाची सुरुवात होते आणि त्यावर विजय मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाची माहिती देत हे पुस्तक संपते. सहज साध्या शब्दात या आजारावरची माहीती देतानांच, ध्यान, समाधी या सारख्या मार्गातील ठोकताळे सुद्धा त्यांनी सुदर पद्धतीने रेखाटले आहे. डॉक्टरी नजरेतुन पेशंटला अनेक वर्षे बघितल्यानंतर स्वतःच जेंव्हा पेशंटच्या बेड वर झोपुन अनुभव घेतला तेंव्हा मला त्याला होत असलेल्या वेदनांची जाणिव झाली असे बंग म्हणतात. क्षणस्थ आणि दर्शन ही या पुस्तकातील दोन प्रकरणे सर्वात जास्त भावतात. अत्यंत सोप्या मनाला शांत कसं ठेवावं, आणि जीवनातील ताणतणावाला दुर कसे सारता येउ शकेल हे या दोन प्रकरणातुन कळते. मुख्य म्हणजे हा कुणातरी व्यक्तीचा स्वानुभव असल्यामुळे लिखाणाची शैली केवळ कोरडे ज्ञान देण्याची नसुन त्या त्या गोष्टीं मधील त्या व्यक्तीच्या मनाची सफर घडवणारी आहे.

३. अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके:

१. मृत्युंजय - कुठल्याही क्षणी मनात उसळणाऱ्या अनेक प्रश्नांना कुठल्या ना कुठल्या स्वरुपात उत्तर देण्याचं सामर्थ्य ही कादंबरी बाळगते. प्रथम जेंव्हा ही वाचनात आली तेंव्हा एक अलौकीत शांती मिळाली होती, आणि तोच अनुभव जवळपास प्रत्येक वाचनानंतर आजही येतो. स्वगताचा एवढा प्रभावी वापर इतर कुठल्याही पुस्तकात आढळत नाही.

२. Alchemist : खरं म्हणजे इथे इंग्रजी पुस्तकाविषयी लिहावे की नाही याबद्दल नक्की कल्पना नाही पण तरिही प्रभाव पाडणाऱ्या पुस्तकाविषयी लिहायचं असल्यामुळे या पुस्तकाशिवाय पुढे जाणचं शक्य नाही. एका मेंढपाळाची, त्याच्या स्वप्नपुर्तीची, आणि स्वप्नपुर्तीपर्यंतच्या प्रवासाची ही कहाणी. छोट्या छोट्या प्रसंगातुन कथा पुढे सरकते आणी प्रत्येक वळणावर आपल्याला विचार करायला भाग पाडते. खुपच सुंदर, आशावादी पण त्याच बरोबर वास्तववादी विचार या पुस्तकातुन मिळुन जातो.

३. ज्ञानेश्वरी - हा ग्रंथ समजावुन देण्यासाठी तितक्याच ताकदीची व्यक्ती पाहीजे. अनेक वेळा अनेक अधिकारी व्यक्तींकडुन मी या ग्रंथाविषयी माहिती घेतली, आणि प्रत्येक वेळी अवीट गोडी चाखायला मिळाली. हा ग्रंथ खरोखरच अमृताचा ठेवा आहे, माझे शब्द कमी पडतील एवढी मोठी याची महती. यातुन मिळणारे ज्ञान पहाता आपली झोळीच कमी पडते यात शंका नाही. भगवद्गीतेवर एवढे रसाळ निरुपण कोवळ्या वयात करु शकणाऱ्या ज्ञानेश्वरांची सुद्धा ओळख आपल्याला घडते. अवघं आयुष्य केवळ इतरजनांकडुन त्रास सहन करुन 'जो जे वांछील तो ते लाहो' असं विश्वेश्वराकडे मागणं हा तर या सगळ्याचा खऱ्या अर्थाने कळस.

४. श्रीमान योगी - ज्यांच्या केवळ नामस्मरणाने स्फुरण चढावे, असे स्वराज्याचे छत्रपती. त्यांच्या चरित्राने प्रत्येकाच्या जीवनावर प्रभाव पडतो यात काही नवल नाही. आणि असेच त्यांचे चरित्र रेखाटले आहे या पुस्तकात.

५. महानायक - इतिहासातील काही मोजक्या आवडणाऱ्या व्यक्तींपैकी एक सुभाष चंद्र बोस, आणि त्यांच्या जीवनावर विश्वास पाटील यांनी लिहिलेलं हे पुस्तक.

अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके

१. समग्र सावरकर
२. छावा
३. लंपनची पुस्तके
४. समिधा-साधना आमटे
५. स्मृतिचित्रे-

एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -
व्यक्ती आणि वल्ली : पु लं च्या एकुणच लिखाण शैली बद्दल वेगळं काही लिहिण्याच्या गरजच नाही. प्रत्येक पुस्तकातुन, प्रत्येक प्रसंगातुन पु लं थेट मनाला जावुन भिडतात. एकांतात पु लं ची कुठलीशी ओळ आठवुन खळखळुन हसायला झालं नाही असं होणंच शक्य नाही . पण त्यातल्या त्यात हे पुस्तक जास्त आवडुन जातं, आणि वाचता वाचता आपण पु लं च्या विलक्षण निरिक्षणाला सलाम करुन जातो. या पुस्तकात लिहिलेल्या एक एक वल्ली आपल्याला कुठेना कुठे भेटतातच. पु लं चा 'नारायण' तर मला अनेक लग्न समारंभातुन भेटतो, तीच गोष्ट अंतु बर्वा याची. ''सखाराम गटणे' तर हमखास भेटणार. अशा अनेकविध वल्लींना विनोदाच्या स्वरुपात फार सुंदर पद्धतींनी पु लं नी सादर केले आहे.

या शिवाय अनेक अनेक पुस्तके आहेत ज्याविषयी बरच काही लिहिता येईल. आचार्य अत्रे, जी ए, द मा मिरासदार, प्रविण दवणे व इतर अनेक लेखक मंडळी, कुसुमाग्रज, शांता शेळके, गदिमा यांच्या सारखा अनेक वंदनीय कवींच्या प्रतिभेने भरुन वहात असलेले अनेक कविता संग्रह, काही अप्रकाशीत परंतु चांगल्या लेखकांचे लेख, कथा, कविता आणि इतर बरच साहित्य.

शेवटी काय पुस्तकाचे हे ऋण न फिटण्यासारखेच आहे.

No comments: