Thursday, June 29, 2006

मेस

'मी कारल्याची भाजी खाणार नाही'
'अरे चांगलं असतं आरोग्याला, शाळेत शिकतोस ना तु हे ' आई
'ते काही असो पण मला कारल्याची भाजी आवडत नाही, मी खाणार नाही'
'आता करतोयस नाटकं, मेस मधे ताटात पडेल ते खावं लागेल तेंव्हा कळेल'

शेपुट फुटण्याचा काळातला हा संवाद दिवसाआड घरा घरातुन होतच असे. शाळेतले दिवस संपुन कॉलेजची ओढ लावणार्‍या अनेक गोष्टींपैकी मेस हि सुद्ध एक महत्वाची गोष्ट होती. अगोदर कॉलेजच्या निमित्तने आणि नंतर नोकरीच्या निमित्तने मेस या प्रकरणाशी सातत्याने संबध येत गेला. कॉलेजला प्रवेश मिळवणे, रहाण्यासाठी रुम शोधणे वैगरे प्रकार संपले की मग शोध सुरु व्ह्यायचा चांगल्या मेस साठी. कॉलेजचं होस्टेल आणि मेस उपलब्ध असेल तरिही बरीच मंडळि बाहेरच राहणं आणि खाणं पसंत करीत आणि याचं मुख्य कारण म्हणजे ज्या प्रोफेसरांसमोर दिवस घालवणच जीवावर येतं त्यांच्या समोर जेवण करणं किती जीवावर येत असेल. आज जसे दोन भिकारी किंवा दोन संगणक अभियंते समोरासमोर भेटल्यावर एकच प्रश्न करतात "कुठल्या platform वर काम करतोस" तसेच त्यावेळी मित्र समोरासमोर भेटल्यावर विचारले जाणारे प्रश्न दोनच, कुठे जेवतोस आणि कुठे राहतोस.

मेस या गोष्टिचा खाण्याशी जरी बराच जवळचा संबध असला तरी मेस शोधतांना इतर गोष्टींकडेच जास्त लक्ष दिल जात असे. कारण अत्यंत चांगलं जेवण देणारी मेस (एखाद दुसरा अपवाद वगळता) मिळणं अशक्य होतं. त्यामुळे प्रत्येकी दोन महिन्याला मेस बदलण हा नित्याचा उपक्रम असे. त्यातुन प्रत्येक मेस ची पाटी 'आमच्याकडे घरच्या सारखे जेवण मिळेल' अशी असल्याने त्या पाटीचा उपयोग फक्त 'इथे मेस आहे' हे समजण्यापुरताच होत असे. मेस मुख्यतः तिथे मिळणार्‍या खाण्या पेक्षा तिच्या मालकावरुन (विशेषतः मालकिणीवरुन) ओळखली जात असते. मालकिणीवरुन ओळखले जाण्याचे कारण म्हणजे स्वयंपाकाचे खाते त्यांच्याकडेच, आणि अशा बर्‍याच मेस मधुन हिशेब लावण्यापासुन भाजी आणण्यापर्यंत सगळी कामे काकुच करत, आणि काकांच काम फक्त चटई टाकणे आणि चटई उचलणे एवढेच असे.जेवण काय मिळते या पेक्षा ते कसे मिळते याकडेच सर्वांचे लक्ष जास्त. उदाहरण द्यायचे झाले तर, आम्ही रहात होतो त्या ठिकाणापासुन बराच दुर अंतरावर एक मेस होती, या मेस मधे गर्दी होत असे ती केवळ विशिष्ठ वेळेलाच, आणि ही विशिष्ठ वेळ म्हणजे क्रिकेटची मॅच. त्या काकांना क्रिकेटची एवढी आवड होती की मॅच असलेल्या दिवशी ते आतल्या खोलीतला TV आम्ही जेवायचो त्या हॉल मधे आणुन ठेवत, त्यावेळी Mobile score वैगर फारसे प्रचलीत नसल्यामुळे काकांची ही युक्ती फार काम करत असे, कारण प्रत्येकाला जेवणाच्या quality पेक्षा मॅच महत्वाची वाटत असे. त्यामुळे अधुन मधुन कुठल्या क्रिकेटरने अतिक्रिकेट बद्दल शब्द काढला तर काकांची फार चिडचिड होत असे, कारण याच अतिक्रिकेट मुळे त्यांची मेस जोरात चालत असे.

अर्थात सगळ्याच मेस काही खराब जेवण देत नसत, मला कॉलेजच्या दुसर्‍या वर्षी लाभलेली एक मेस फारच उत्तम जेवण देणार्‍यांपैकी होती. त्या काकु अगदी अगत्याने स्वागत करुन मायेने जेवु वैगरे घालत असत. मात्र त्यांच्या याच अगत्यशीलतेचा फायदा घेउन बर्‍याच लोकांनी त्यांचे पैसे बुडवले आणि त्यांना मेस बंद करण्यावाचुन इलाज उरला नाही. काही काही मेस वाले तर फारच बेरकी होते, म्हणजे काय की पहिल्या दिवशी जेवयाला गेलो त्यांच्याकडे की अत्यंत उत्तम पद्धतीचे जेवण देणार, आणि चांगले जेवण मिळते म्हणुन तुम्ही पैसे भरलेत की मग त्यांचा खरा रंग दाखवायला सुरुवात. त्यामुळे अशा अनेक मेस एक दोन महिन्यातुनच बदलाव्या लागत. त्या काळात weekends ची आम्ही जेव्हढी वाट पहायचो तेव्हढी आज नाही बघत, याचं मुख्य कारण म्हणजे शनिवारी घरी जायला मिळायचे. आणि घरी गेल्यावर आई ने किंवा आज्जीने जवळ घेउन 'फारच चेहरा उतरला हो आमच्या सोनुचा' एवढं म्हटलं की लगेच आपण जेवणाची ऑर्डर सोडायला मोकळे. पुढे दोन दिवस मात्र आवर्जुन आपल्या आवडत्या भाज्या बनविल्या जायच्या.

मेस मधुन दोन प्रकारांनी जेवण मिळत असे. एक म्हणजे त्यांच्याच घरी जायचे, आणि दुसरे म्हणजे त्यांच्या कडुन डब्बा घेउन आपापल्या रुम वर जावुन जेवायचे. आमची सहसा पसंती दुसर्‍या प्रकाराला असायची, कारण सुज्ञपणाने प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी मेस लावलेली असे, त्यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळे पदार्थ एकत्र येउन त्याचा गोपाळकाला तयार होई. त्यात भर घालत आमचे स्थानीक मित्र, सर्वांनी एकत्र रहायचे या धोरणाला अनुसरुन प्रत्येक जण आपापल्या घरुन जेवणासाठी काहीतरी घेउन येत असे. मग कॉलेजचे सर्व दोस्त, वेगवेगळ्या चवीचे जेवण आणि सोबतीला गप्पा असा सामुदायीक जेवणाचा एक सोहळा साजरा होत असे. अशा अनेक सोहळ्याच्या जन्माला पुरतील एवढ्या आठवणी आहेत. दुसर्‍या प्रकाराने म्हणजे प्रत्यक्षात मेसवर जावुन जेवणे हा विकल्प काही विशीष्ठ परिस्थीत निवडला जाई. या विशीष्ठ परिस्थीतीचंच एक उदाहरण सांगयच झालं तर, एकदा एका मेसकडे अचानक गर्दी वाढली आणि सर्वांनीच थेट मेस मधेच जेवणाचा आग्रह सुरु केला, पुढे जाउन याचे कारण लक्षात आले की त्याच मेसला लेडिज हॉस्टेल ची अधिकृत मेस म्हणुन मान्यता मिळाली होती. बाग, कॉलेजचे वाचनालय, वर्ग याच बरोबर मेस हे सुद्धा अनेक प्रेमिकांचे भेटण्याचे ठिकाण होते, आणि त्यातच नविन नविन एकमेकांना जेवतांना डोळे भरुन पाहणे हा त्यांचा आवडता छंद असे.

मेसचे नियम हा तर एक फार मोठा संशोधनाचा विषय होउ शकेन. पुणेरी पाट्या आपण बर्‍याच ठिकाणी वाचतो, पण कुठलीही पाटी न लावता मेस मधुन नियम ठरवले जात असत. आमच्या एका मेस मधे नियम होत (आणि तो ही लिखीत) 'तुमच्या नातेवाईकांचे तुमच्यावर फारच प्रेम आहे हे आम्ही जाणतो, पण तरिही पुर्वपरवानगी शिवाय नातेवाईकांना जेवायला आणु नये'. दिवस मोजतांना होणारा गोंधळ तर फारच कॉमन होता. काही ठिकाणी एकुण जेवणावर पैसे, तर काही ठिकाणी
दिवसांप्रमाणे. काही ठिकाणि अगोदर न सांगता जेवण न केल्यास पैसे कट, तर काही ठिकानी सोबत guest आणल्यास पैसे कट. प्रत्येक रविवारी Feast नामक एक वैताग बर्‍याच मेस मधुन असायचा. ही Feast म्हणजे सकाळी काही तरी (म्हणजे दोन तेलकट आणी एक गोड पदार्थ) खायचे आणि संध्याकाळी मेसला सक्तीची सुट्टी. कॉलेजच्या काळात घरुन मीळणारे पुर्ण पैसे ऑडिट करुन मिळत असल्यामुळे, संध्याकाळी बाहेर जेवायला जाणे सर्वच जण टाळायचे आणि या वेळी परत मदत घेतली जायची स्थानिक मित्रांची.

काही मेस मात्र आवर्जुन लक्षात रहाव्यात अश्या, म्हणजे आपल्याकडे येणार्‍या विद्यार्थ्यांना आपल्या सुख दुखआत सामील करुन घेत. घरी सत्य नारायण असेल तर आवर्जुन सर्वांना जेवण देत (अर्थात पैसे न घेता), स्वयंपाक अगोदर उरकला असेल तर त्या काकु, दळण दळता दळता आपल्या लेकीच्या संसारातील अडचणी आम्हाला सांगत बसायच्या. कुणि विद्यार्थी आजरी असेल तर त्याला पथ्याचं खाण पिणं सुद्धा मिळायच त्यांच्यकडेच. शक्य तेव्हढ्या लोकांच्या आवडीनिवडी जपत भाजी ठरवली जायची. मात्र या सगळ्यात व्यावसायीकता कुठेही नसल्याने जास्त दिवस चालवणे अशक्य होउन बसे.

नोकरीच्या निमित्ताने बाहेर रहाणे होत असल्यास एखाद्या दिवशी जेवण आवडले नाही तर बाहेर जाउन जेवता येत पण कॉलेजच्या वेळी असे काही शक्य नव्हते. कॉलेजच्या आठवणित अनेक गोष्टिंचा समावेश होतो, पण मेस ही त्यातील महत्वाची आठवण. अन्न हे पुर्णब्रह्म शिकवणारी ही मेस, आईच्या हाताची चवीची खरी ओळख करुन देणारी ही मेस, घरापासुन दुर गेल्यावर झालेल्या सैरभैर मनाशी थेट नाते जोडणारी ही मेस.

आजही आठवतात जेवतांना मारलेल्या गप्पा, गोपाळकाला, काकुंनी मधेच येउन पोळीवर वाढलेलं तुप, feast , आणि हो 'फारच चेहरा उतरलाय माझ्या सोनुचा' हे वाक्य.

सुभाष डिके

Monday, June 26, 2006

'जादु तेरी नजर'

शनिवारी प्रशांत दामलेचं 'जादु तेरी नजर' बघण्याचा योग जुळुन आला. अगोदरच या नाटकाविषयी बरचं ऐकुन होतो, त्या सर्व अपेक्षांवर हे नाटक पुर्ण पणे उतरते. प्रशांत दामलेच्या अभिनयाच्या बाबतीत तर बोलायलाच नको, पण सर्वात जास्त पसंती मिळते ती सतीश तारे ला. सुरुवाती पासुन शेवट पर्यंत प्रत्येक प्रवेशाला हास्याचे कल्लोळ निर्माण करतो हा माणुस. यातच प्रशांत दामलेच्या बहिणिचे काम केले आहे (त्या मुलिचे नाव लक्शात नाही आता) त्या अभिनेत्रीचे काम खुपच आवडले, प्रेमासाठी आतुर तरुणी फार सुंदर रेखाटली आहे तिने. नाटकात बरिच गाणी आहेत, एक-दोन गाणी सोडली तर बाकी सर्व गाणी संगित, शब्द आणि प्रसंग सगळ्याच बाबतीत चांगली आहेत.

खुप खुप हसवणारी एक Romantic comedy , अवश्य पहावे असे नाटक..

Monday, June 12, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

नंदनने सुरु केलेल्या पुस्तकाची मांदियाळीच्या खेळात रजनीगंधाने मला आमंत्रित केले त्यावेळी दोन-तीन पुस्तकांचे वाचन सुरु होते, म्हणुन म्हटलं थोडसं थांबुन लिहावं. पुस्तकांच्या बाबतीत मी स्वतः ला बालपणापासुनच सुखी मानतो, कारण वाचनालयाचं सदस्यत्व पुरेपुर उपभोगायला मिळालं होतं. सानेगुरुजींच्या गोड गोष्टींपासुन मला वाटतं सुरुवात झाली आणि त्या प्रवासाने थांबायचं नावच घेतलं नाही. त्यावेळी फास्टर फेणे हातात पडला, आणि भा. रा. भागवतांच्या या मानसपुत्राने मला झपाटले, एकामागोमाग एक अशी त्यांची बरिच पुस्तके मी वाचुन काढली होती. पुढे चि. वि. जोशीं वाचायला मिळाले, गुंड्याभाउ हे पात्र तर आजही माझ्या आठवणीतुन जात नाही. जसजसे वय वाढले तसतसे पुस्तकाची आवडही वाढत आणि बदलत गेली. या प्रवासात पुढे अनेक रथी महारथी भेटले, व. पु. , पु. लं. सुद्धा भेटले ते याच काळात. ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं समजावुन घेण्याचा पहिला प्रयत्न केला तोही याच काळत. विनोद, कारुण्य, प्रेम, समाज सर्व सर्व विषयांवरिल वाचन, वाचन आपल्याला किती समृद्ध करु शकते, याचा प्रत्यय देउन गेले. आजही कुठल्याही वळणावर हीच पुस्तके सोबत करायला नकळत उभे राहीलेली जाणवतात.

१. नुकतेच वाचलेलं/विकत घेतलेलं पुस्तक -

माझा साक्षात्कारी ह्रदयरोग - अभय बंग

२. वाचले असल्यास त्याबद्दल थोडक्यात माहिती -
साधारणतः वैद्यकीय बाबींवर आधारलेली पुस्तके हे केवळ आकड्यांनी आणि वैद्यकीय संज्ञांनी भरलेले असते असा समज मोडुन काढण्याचे काम हे पुस्तक करत. लेखकाच्या जीवनात नकळत शिरलेला ह्रदयरोग पासुन या पुस्तकाची सुरुवात होते आणि त्यावर विजय मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाची माहिती देत हे पुस्तक संपते. सहज साध्या शब्दात या आजारावरची माहीती देतानांच, ध्यान, समाधी या सारख्या मार्गातील ठोकताळे सुद्धा त्यांनी सुदर पद्धतीने रेखाटले आहे. डॉक्टरी नजरेतुन पेशंटला अनेक वर्षे बघितल्यानंतर स्वतःच जेंव्हा पेशंटच्या बेड वर झोपुन अनुभव घेतला तेंव्हा मला त्याला होत असलेल्या वेदनांची जाणिव झाली असे बंग म्हणतात. क्षणस्थ आणि दर्शन ही या पुस्तकातील दोन प्रकरणे सर्वात जास्त भावतात. अत्यंत सोप्या मनाला शांत कसं ठेवावं, आणि जीवनातील ताणतणावाला दुर कसे सारता येउ शकेल हे या दोन प्रकरणातुन कळते. मुख्य म्हणजे हा कुणातरी व्यक्तीचा स्वानुभव असल्यामुळे लिखाणाची शैली केवळ कोरडे ज्ञान देण्याची नसुन त्या त्या गोष्टीं मधील त्या व्यक्तीच्या मनाची सफर घडवणारी आहे.

३. अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके:

१. मृत्युंजय - कुठल्याही क्षणी मनात उसळणाऱ्या अनेक प्रश्नांना कुठल्या ना कुठल्या स्वरुपात उत्तर देण्याचं सामर्थ्य ही कादंबरी बाळगते. प्रथम जेंव्हा ही वाचनात आली तेंव्हा एक अलौकीत शांती मिळाली होती, आणि तोच अनुभव जवळपास प्रत्येक वाचनानंतर आजही येतो. स्वगताचा एवढा प्रभावी वापर इतर कुठल्याही पुस्तकात आढळत नाही.

२. Alchemist : खरं म्हणजे इथे इंग्रजी पुस्तकाविषयी लिहावे की नाही याबद्दल नक्की कल्पना नाही पण तरिही प्रभाव पाडणाऱ्या पुस्तकाविषयी लिहायचं असल्यामुळे या पुस्तकाशिवाय पुढे जाणचं शक्य नाही. एका मेंढपाळाची, त्याच्या स्वप्नपुर्तीची, आणि स्वप्नपुर्तीपर्यंतच्या प्रवासाची ही कहाणी. छोट्या छोट्या प्रसंगातुन कथा पुढे सरकते आणी प्रत्येक वळणावर आपल्याला विचार करायला भाग पाडते. खुपच सुंदर, आशावादी पण त्याच बरोबर वास्तववादी विचार या पुस्तकातुन मिळुन जातो.

३. ज्ञानेश्वरी - हा ग्रंथ समजावुन देण्यासाठी तितक्याच ताकदीची व्यक्ती पाहीजे. अनेक वेळा अनेक अधिकारी व्यक्तींकडुन मी या ग्रंथाविषयी माहिती घेतली, आणि प्रत्येक वेळी अवीट गोडी चाखायला मिळाली. हा ग्रंथ खरोखरच अमृताचा ठेवा आहे, माझे शब्द कमी पडतील एवढी मोठी याची महती. यातुन मिळणारे ज्ञान पहाता आपली झोळीच कमी पडते यात शंका नाही. भगवद्गीतेवर एवढे रसाळ निरुपण कोवळ्या वयात करु शकणाऱ्या ज्ञानेश्वरांची सुद्धा ओळख आपल्याला घडते. अवघं आयुष्य केवळ इतरजनांकडुन त्रास सहन करुन 'जो जे वांछील तो ते लाहो' असं विश्वेश्वराकडे मागणं हा तर या सगळ्याचा खऱ्या अर्थाने कळस.

४. श्रीमान योगी - ज्यांच्या केवळ नामस्मरणाने स्फुरण चढावे, असे स्वराज्याचे छत्रपती. त्यांच्या चरित्राने प्रत्येकाच्या जीवनावर प्रभाव पडतो यात काही नवल नाही. आणि असेच त्यांचे चरित्र रेखाटले आहे या पुस्तकात.

५. महानायक - इतिहासातील काही मोजक्या आवडणाऱ्या व्यक्तींपैकी एक सुभाष चंद्र बोस, आणि त्यांच्या जीवनावर विश्वास पाटील यांनी लिहिलेलं हे पुस्तक.

अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके

१. समग्र सावरकर
२. छावा
३. लंपनची पुस्तके
४. समिधा-साधना आमटे
५. स्मृतिचित्रे-

एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -
व्यक्ती आणि वल्ली : पु लं च्या एकुणच लिखाण शैली बद्दल वेगळं काही लिहिण्याच्या गरजच नाही. प्रत्येक पुस्तकातुन, प्रत्येक प्रसंगातुन पु लं थेट मनाला जावुन भिडतात. एकांतात पु लं ची कुठलीशी ओळ आठवुन खळखळुन हसायला झालं नाही असं होणंच शक्य नाही . पण त्यातल्या त्यात हे पुस्तक जास्त आवडुन जातं, आणि वाचता वाचता आपण पु लं च्या विलक्षण निरिक्षणाला सलाम करुन जातो. या पुस्तकात लिहिलेल्या एक एक वल्ली आपल्याला कुठेना कुठे भेटतातच. पु लं चा 'नारायण' तर मला अनेक लग्न समारंभातुन भेटतो, तीच गोष्ट अंतु बर्वा याची. ''सखाराम गटणे' तर हमखास भेटणार. अशा अनेकविध वल्लींना विनोदाच्या स्वरुपात फार सुंदर पद्धतींनी पु लं नी सादर केले आहे.

या शिवाय अनेक अनेक पुस्तके आहेत ज्याविषयी बरच काही लिहिता येईल. आचार्य अत्रे, जी ए, द मा मिरासदार, प्रविण दवणे व इतर अनेक लेखक मंडळी, कुसुमाग्रज, शांता शेळके, गदिमा यांच्या सारखा अनेक वंदनीय कवींच्या प्रतिभेने भरुन वहात असलेले अनेक कविता संग्रह, काही अप्रकाशीत परंतु चांगल्या लेखकांचे लेख, कथा, कविता आणि इतर बरच साहित्य.

शेवटी काय पुस्तकाचे हे ऋण न फिटण्यासारखेच आहे.

Wednesday, June 07, 2006

विडंबन - कदाचीत

या विडंबनासाठीची प्रेरणा असलेली कविता 'कदाचीत' या दुव्यावर वाचावयास मिळेल
(सासर कडच्या मंडळींना वैतागलेल्या नवर्‍याचं मनोगत...)

कदाचित

लक्षात नसेल राहीलं तुझ्या कदाचीत

तु पाळलेला ताईचा नवरा
घेउन आला होता, 'पहिल्या धारेची'
'लवंग'ही चघळले तरी मुखाला
'नवटाकेचा' गन्ध येत होता

लक्षात नसेल राहीलं तुझ्या कदाचीत

गल्लिबोळातुन पोरी सोरींमागे
शिट्ट्या फुंकीत तुझा भाउ भटकला
उचलला पोलिसांनी जेंव्हा
मामला मीच निस्तरला होता

लक्षात नसेल राहीलं तुझ्या कदाचीत

मला टाकुन, तरीही तु पळालीस
मी काय करील हे बघण्यासाठी वळालीस
'साली आधी घरवाली' चा अर्थ
तेंव्हाच मजला उमगला होता


(केवळ निरिक्षणातुनच )