नेहमीप्रमाणे या रविवारी सुद्धा कुठेतरी दुर्गभ्रमणासाठी जायचे असे ठरवले होते. इतर सर्व मंडळी आपापल्या कामात खुपच व्यस्त असल्यामुळे या वेळी सुद्धा एकट्याने जावे लागेल असे लक्षात आले आणि पुन्हा एकदा जी.एस. चा सल्ला घेतला आणि पुरंदरला जावे असे ठरवले. सकाळी उन जास्त होण्याच्या अगोदर सुरुवात करावी असा विचार करुन पाच वाजता लोणावळ्यातुन निघण्याचा विचार होता पण दुर्दैवाने अगदी धावत पळत जाउन सुद्धा पाच वाजताची लोकल चुकली मग नाईलाजाने सहा वाजता सुरुवात करावी लागली. पुण्यातुन पुरंदरला जाण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत. पहिला म्हणजे पुण्यातुन दिवे घाट मार्गे सासवडला यावे आणि तिकडुन सासवड - नारायणपुर गाडी मिळवुन नारायणपुरला पोहोचावे. नारायणपुर हे पुरंदराच्या पायथ्याचे गाव, तेथील दत्तमंदिरासाठी प्रसिद्ध आहे. पुण्यातुन थेट नारायणपुरला जाण्यासाठी सुद्धा गाडी मिळते. पुरंदरासाठी दुसरा मार्ग म्हणजे पुणे बंगलोर हायवे वर कापुरहोळ नावाच्या गावात पोहोचावे, आणि तिकडुन नारायणपुरला येण्यासाठी गाडी पकडावी. मी पुण्यात पोहोचल्यानंतर सासवड मार्गे नारायणपुरला पोहोचलो. मी पोहोचलो तेंव्हा साधारण दहा वाजले होते. नारायणपुरमधुन पुरंदरला जाण्यासाठी एक मोठा रस्ता मिळतो. हा वळवळणाचा रस्ता थेट आपल्याला बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी घेउन जातो. या रस्त्याने गाडी घेउन सुद्धा जाता येते. मी मात्र गावातुन जाणारा दुसरा एक छोटा रस्ता निवडला होता. हा रस्ता जंगलातुन जातो आणि थेट दरवाजा जवळ गावातुन येणार्या रस्त्याला जावुन मिळतो. या रस्त्याने गेल्यास अवघ्या पाउण तासात बिनिदरवाजावर पोहोचता येते. मी या रस्त्यावरुन निघालो. गावातुन निघुन पुढे अर्धा रस्ता संपेपर्यंत उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवत होता. मागच्या वेळच्या अनुभवावरुन मी एकदम तयारी करुन गेलो होतो त्यामुळे उन्हापासुन चांगले संरक्षण झाले. पुढे मात्र दाट झाडी लागली, कडक उन्हातुन छान सावलीत आल्यानंतर खुप बरं वाटलं त्यामुळे पहिल्याच झाडाच्या सावली बराच वेळ बसलो. आता दरवाजा जवळच वर दिसत होता. झपाझप चालत जाउन दरवाजा गाठला, मागे वळुन बघितल्यावर दुरुन नारायणपुर मधुन येणारा वळणावळणाचा रस्ता दिसत होता. मधल्या रस्त्याने आल्यामुळे माझा वेळ आणि श्रम दोन्ही वाचल्याचं लक्षात आले.
आता समोर बिनि दरवाजा दिसत होता. दरवाजातुन आत गेल्याबरोबर डाव्या बाजुला एक छान जुने चर्च दिसले. उजव्या बाजुला थोडेसे मागे आल्यानंतर मुरारबाजीचा लढाईच्या आवेशातील पुतळा दिसला. पुतळ्याकडे बघुन खरोखर अंगावर रोमांच उभे राहतात. दोन सैनिक त्या पुतळ्याच्या आजुबाजुला आधुनिक चित्रकलांचे नमुने स्वच्छ करण्याचं काम करत होते. पुन्हा चर्चजवळ येउन पुढे निघालो. तेवढ्यात तिकडे आलेल्या एका कुटुंबाकडे माझे लक्ष गेले. त्या काकांनी लगेचच मला कुठुन आलास, एकटाच का आलास वैगरे प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग चला बरोबरच जाउ असा विचार त्यांनी मांडला, सोबत मिळते आहे हे लक्षात घेउन मी सुद्धा होकार दिला. पुढे गेल्यावर उजव्या बाजुला पुरंदरेश्वराचं मंदिर आहे, मंदिराची बांधणी खुपच सुबक अशी आहे, आणि परिसरातील भरगच्च झाडांनी एकुणच शोभा वाढलेली आहे. मंदिरात दर्शन घेतल्यावर त्या सोबत आलेल्या काकांबरोबर झालेल्या चर्चेतुन त्यांची ओळख झाली आणि त्यांची सोबत लाभलेचा मला खुपच आनंद झाला. कारण ते स्वतः एका माध्यमिक शाळेत शिक्षक असुन १९८२ सालापासुन नियमीत दुर्गभ्रमण करत आहेत. एकट्याने, कुटुंबाबरोबर, ग्रुपबरोबर अश्या सर्वप्रकारांनी त्यांनी किल्याच्या भ्रमंती केलेली आहे. आजवर त्यांनी अनेक किल्ले अनेक वेळेला बघितले होते. राजगड, रायगड हे किल्ले तर सर्व मोसमात, सर्व वेळात, सर्व बाजुंनी असे पुर्ण केलेले आहेत. स्वतः शिवाजी चरित्रावर अभ्यास करत असुन, याच विषयावर त्यांनी व्याख्यान सुद्धा केलेली आहेत, त्याच बरोबर आध्यात्मिक प्रवचन सुद्धा करतात. या वेळी पुरंदरवर येण्याची सातवी - आठवी वेळ होती आणि प्रयोजन म्हणजे आपल्या कन्येचा अठरावा वाढदिवस इतिहासाच्या साक्षीने साजरा करण्यासाठी त्यांनी ही पुरंदरवारी केली होती. विशेष म्हणजे त्यांचं पुर्ण कुटूंबीय सुद्धा अगदी उत्साहात त्यांच्या सोबत आलेले दिसत होते. वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करण्याचं मला विशेष कौतुक वाटलं आणि अशा माणसाची संगत मिळणे म्हणजे पर्वणीच. मग त्यांच्यासोबत गप्पा मारत बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. पुरंदरेश्वराच्या उजव्या बाजुने एक वाट थेट बालेकिल्ल्यावर घेउन जाते. त्या वाटेने चालत थोड्याच वेळात आम्ही बालेकिल्ल्यावर पोहोचलो. समोर एक छोटेसे देवीचे मंदिर आहे, आणि वळण घेतल्यावर लगेचच दिल्ली दरवाजा दिसतो. दरवाजाच्या अगदी समोर बुरुजात एक मारुतीची मुर्ती आहे. वर गेल्यावरोबर दिल्ली दरवाजात बसुन काकांच्या खणखणीत आवाजात शिवचरित्रातील काही भाग ऐकणे हा पुर्ण दिवसातील परमोच्च भाग होता. तिकडुन पुढे निघाल्यावर अत्यंत उत्साहात पुरंदराची कथा सांगत होते. त्यांच्या इतर ट्रेक च्या आठवणी, वैद्य सर नावाचे त्यांचे सहकारी यांच्या आठवणी, अनेक किल्ल्यांवर आलेले अनुभव या सर्व गोष्टी अगदी तन्मयतेने सांगत होते. दिल्ली दरवाजातुन पुढे गेल्यावर सरळ केदारेश्वराच्या मंदिराकडे जाता येते. मी एकटा असतो तर कदाचित याच वाटेने गेलो असतो, पण काका मला खाली केदार दरवाजा बघुन येउ असा आग्रह करत तिकडे घेउन गेले.
तटबंदिच्या बाजुने जात आम्ही केदार दरवाजावर पोहोचलो. वाटेत आम्हाला सातारा येथुन आलेला 'रानवाटा' नावाचा पंधरा वीस जणांचा एक ग्रुप भेटला. त्यांच्याशी सुद्धा काकांची ओळख होती. पुढे चालत जाउन आम्ही केदार दरवाजावर पोहोचलो. दरवाजा एकेकाळी बंद करुन ठेवल्यासारखा दिसत होता. दोन्ही बाजुने माती ढासळलेली होती. केदार दरवाजा मधुन बाहेर निघुन बघितले. समोर एक सुंदर पठार दिसत होते. पुर्ण पुरंदराच्या बाजुने जीप जाईल एवढी मोठा प्रदक्षिणा मार्ग आहे, मिलिटरीच्या ताब्यात पुरंदर असतांना या सर्व व्यवस्था केल्याचं कळलं. मग पुन्हा केदारेश्वराच्या मंदिराकडे निघालो. केदारेश्वराच्या मंदिराकडे जातांना काही पायया लागतात. त्या चढुन जातांना तुला पांडवांच्या स्वर्गारोहणाचा अनुभव येईल असं मला काकांनी सांगितलं, त्याचा मला काही अर्थ कळला नाही. मात्र त्या पायर्या चालु लागताच मला त्याचा अर्थ कळून आला. पाययाच्या दोन्ही बाजुने उंच भिंती आहेत त्यामुळे त्यांच्यामधुन चालतांना दोन्ही बाजुचे काहिही दिसत नाही, आणि समोर सुद्धा काही दिसत नाही वर फक्त आकाश दिसते. त्यांची ही उपमा मला खुपच आवडली. केदारेश्वराच्या मंदिरात पोहोचलो. हे पुरंदरावरील सर्वोच्च ठिकाण आहे. दर्शन घेतल्यावर मंदिराच्या मागच्या बाजुला गेल्याबरोबर समोर सिंहगड, राजगड, आणि तोरणा अगदी चटकन ओळखु येत होते. पुरंदराचा शेंदरया बुरुज, खंदकडा हा सर्व भाग दिसत होता. हे सर्व बघितल्यानंतर मंदिराच्या सावलीतच जेवणाला सुरुवात केली. एवढा वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत केल्यामुळे मला वेगळे जेवण करु देणे शक्यच नव्हते. जेवण केल्यानंतर आम्ही तिकडुन निघालो. आता पुन्हा दिल्ली दरवाजा जवळ आल्याबरोबर परत राजगादी बघण्यासाठी मागे निघालो. राजगादी ही जागा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ. तिकडे पोहोचल्यावर मात्र थोडासा भ्रमनिरास झाला आणि वाईट सुद्धा वाटलं. छत्रपतींच्या प्रथम पुत्र, स्वराज्याचे युवराज, धर्मवीर संभाजी राजांच्या जन्मस्थळाची ही अवस्था. आज तिकडे फक्त तटबंदी शिल्लक आहे. तिकडुन माघारी फिरल्यानंतर पुन्हा दिल्ली दरवाजावर पोहोचलो. आता बालेकिल्ला उतरुन निघायला सुरुवात केली. खाली उतरल्यावर वज्रगडावर जाण्याची अत्यंत इच्छा होती पण वेळ शिल्लक नसल्याने आता माघारी परतावे लागणार होते. मग परत आम्ही बीनी दरवाजावर पोहोचलो. परत एकदा मुरारबाजीचा पुतळा बघितला आणि दरवाजातुन मागे परतायला सुरुवात केली. संपुर्ण दिवस अगदी मनासारखा गेल्याने उतरतांना खुप समाधान जाणवत होते. पायथ्याशी आल्यावर दत्तमंदिर आणि शिवमंदिर बघितले. मग पुण्याकडे जाण्याअगोदर जवळच असलेल्या बालाजीचं दर्शन घेतले आणि संध्याकाळी पुण्यात येउन पोहोचलो. संपुर्ण दिवसभराच्या श्रमाचा काहीही परिणाम जाणवत नव्हता. आणखी एक रविवार अतिव आनंद आणि समाधान देउन संपत होता.
2 comments:
chaan post...apalya bhramantiche posts asech karat raha....amhala june divas atahvtat...
Hey, really good
Post a Comment