Wednesday, May 30, 2007

या झोपडीत माझ्या

काही दिवसांपुर्वी एका मित्राने ही कविता तालासुरात म्हणुन दाखवली होती, तेंव्हा पासुन शब्दांच्या शोधात होतो, आता मिळाले. एक नितांत सुंदर कविता

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या ॥ १ ॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥ २ ॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥ ३ ॥

जाता तया महाला, "मज्जाव" शब्द आला
भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥ ४ ॥

महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥ ५ ॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥ ६ ॥

पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥ ७ ॥

- संत तुकडोजी महाराज

Monday, May 28, 2007

जयोस्तुते


भारतीय स्वातंत्रलढ्यातील द्रष्टा महापुरुष, आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा

Tuesday, May 22, 2007

'एक डाव भटाचा'

या रविवारी बर्‍याच दिवसांनी मोकळा वेळ कसा घालवावा असा प्रश्न पडला होता त्यामुळे आता मिळेल ते नाटक बघावे असे ठरवुन बालगंधर्व ला गेलो आणि 'एक डाव भटाचा' हे नाटक बघितले.

या नाटकाला म.टा. सन्मान पुरस्कार मिळाल्याचे ऐकले होते, तेंव्हा साहजिकच उत्सुकता होती. नाटक चांगले होते,पण तरिही अपेक्षेपेक्षा जरा कमीच. काही विनोद खळखळून हसवणारे होते, संवादातुन कोट्या आणि प्रासंगिक विनोद यांचा उत्तर वापर केला होता. पण तरिही द्वैअर्थी संवादाची लयलुट असल्याने नाटक मनातुन उतरत गेले. एकुणच अशा संवादा शिवाय विनोद निर्मिती होउच शकत नाही असा लेखकाचा गैरसमज दिसला. काही काही जागा मात्र हमखास हसवुन गेल्या. सर्वच कलाकारांचा अभिनय आवडला, विशेषतः 'बबन' नावाची व्यक्तिरेखा साकारणार्‍या तरुणात मस्त रंग भरला. दुसरिकडे तांत्रिक बाबतील काही चुका टाळता येउ शकल्या असत्या. दोन प्रवेशाच्या मध्ये विंगेतला मोठा दिवा सुरूच ठेवल्यामुळे रंगमंचावर केल्या जाणार्‍या गोष्टी प्रेक्षकांना दिसत होत्या. एकुणच नाटक 'ठीक' या सदरातील होते, पण पुरस्कार वैगरे मिळवण्यासारखे तर नक्किच नाही वाटले. सहकुटूंब वैगरे बघण्यासारखे नाही पण टाइमपास म्हणुन एकट्यानेमित्रांसोबत बघण्यासाठी बरे आहे.

(अर्थात मी एकटाच गेलो होतो !! :-)).

Monday, May 14, 2007

तेरेखोल ते विजयदुर्ग : सफर सिंधुदुर्ग किनार्‍याची

कोकणातील तीन दिवस केलेला हा ट्रेक चुकू नये अशी मनोमन इच्छा होती, आणि त्या दृष्टीने सर्व 'तयारी' करुन या भ्रमंतीमध्ये मी सामील झालो. प्रवासाला सुरुवात केल्यानंतर कोल्हापुरात एक थांबा घेउन पुढे जायचे असे ठरले होते, पण निघतांनाच उशीर झालेला असल्यामुळे कोल्हापुरातील थांबा रद्द करावा लागला. गगनबावडा हा बहुचर्चीत घाट उतरुन कोकणात शिरत असतांनाच कोकणच्या वैशिष्ट्यपुर्ण कोकण रेल्वेने आमचे जोरदार स्वागत केले. पुढे सागरेश्वराला पोहचल्यानंतर बराच उशीर झालेला होता तरिही समुद्राचा तो आवाज सर्वांनाच तिकडे खेचुन घेउन गेला.

रविवारी सकाळी अगोदर आम्ही तेरेखोल किल्ल्यावर पोहोचलो, पण तिकडे मिळालेल्या माहीतीनुसार सकाळी ९ वाजेपर्यंत किल्ल्यात प्रवेश मिळणार नाही असे कळले. म्हणुन आम्ही आमचा मोर्चा यशवंतगडाकडे वळवला. पोहोचल्या बरोबर अमित नावाच्या एका व्यक्तीने स्वतःहुन किल्ला दाखवायला येतो असे सांगत आमच्या सोबत चालायला सुरुवात केली. किल्ला अपेक्षेपेक्षा फारच सुस्थितीत आहे. किल्ल्याची भव्यता आणि सध्याची स्थिती दर्शवणारे किल्याचे प्रवेशद्वार... किल्ल्यात शिरल्याबरोबर एकेकाळी या किल्ल्याने किती वैभव पाहिले असेल याची साक्ष मिळते. उंच उंच भिंती, त्यावरिल गवाक्ष, प्रशस्त खोल्या आणि मजबुत तटबंदी सगळे तसेच खिळवुन ठेवते. वर उल्लेख आल्याप्रमाणे झाडांची नक्षी हे सुद्धा वैशिष्ट्य्च. तटबंदीवरुन सागराचे दर्शन घेत आम्ही किनाऱ्याच्या दिशेने चालत गेलो. यशवंतगडाकडुन पुन्हा आम्ही तेरेखोल कडे प्रयाण केले. हा किल्ला थेट महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सीमेवर आहे. या किल्ल्याच्या जवळच तेरेखोल नदी समुद्राला मिळते. या किल्ल्याचे खाजगीकरण झाल्यामुळे तो फक्त FORT TRICOL या नावात असलेल्या fort या शब्दातच किल्ला असल्याचे जाणवते, बाकी किल्ल्यात शिरल्यानंतर याचा काहिही पत्ता लागत नाही. पण वरच्या बुरुजातुन समुद्राचे अप्रतिम दृश्य मात्र दिसते. या किल्ल्याचे हवाई दर्शन तेरेखोल या लिंक वर मिळेल. तेरेखोल कडुन परत आम्ही रेडीच्या जवळ पाषाणातील श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी निघालो, रस्त्याने मिठागरे सुद्धा बघायला मिळाली. वैशिष्ठ्यपुर्ण मुर्तीच्या दर्शनाने मन प्रसन्न होते, अर्थात आता रंगाचे मनसोक्त वापर केला गेल्यामुळे मुळ मुर्तीचे सौंदर्य नष्ट होते चालले आहे, पण तरिही छान दिसते. गणपती समोर असलेला उंदिरमामाही तितकाच मोहक.

पुढचे लक्ष होते किल्ले निवती. वाटेत मनसोक्त रानमेव्याचा आस्वाद लुटता आला. फार कमी ट्रेक मध्ये हे सुख नशिबात येतं, आणि या वेळी तर सर्वच प्रकारचा मेवा हाताने तोडुन खाता आला. पुढे किल्ले निवती कडे जाताना रस्ता चुकलो आणि निवतीच्या बीच वर येउन पोहोचलो. पुन्हा अनेक लोकांना विचारत, आणि शेवटी एका पोलीस स्टेशन मध्ये खात्री करुन घेत आम्ही एकदाचे किल्ले निवतीच्या पायथ्याशी येउन पोहोचलो. आता मात्र चालावे लागेल असा विचार मनात करत असतांनाच आम्ही किल्ल्यावर सुद्धा पोहोचलो. तुरळक ठिकाणी दिसणारी तटबंदी आणि संरक्षणार्थ बांधलेल खोल खंदक हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य. तसेच समोर समुद्रातुन उगवल्यासारखे दिसणारे खडक आणि शेजारचा नितळ शब्दाचा खराखुरा अर्थ सांगणारा भोगवेचा किनारा, तासन तास तिकडे बसुन रहावं असं ते दृश्य आम्ही डोळ्यात साठवत होतो. आलो नसतो तर हे सगळे miss झाले असते, म्हणुन आता आल्याबद्दल बरे वाटत होते आणि 'जे' येउ शकले नाहीत त्यांची हमखास आठवण आली. किल्ला बघुन झाल्यावर परतत असतांना लाल मुगळ्यांनी झाडाच्या कोवळ्या पानापासुन बनवलेली विशेष घरे बघायला मिळाली.

किल्ले निवती आणि परिसर या लिंक वर निवतीच्या किल्याचा प्रदेश बघता येइल त्यासोबतच उत्तरेकडील सुंदर किनारा सुद्धा न्याहाळता येईल.

पहिल्याच अर्ध्या दिवसातच डोळे खुष होउन गेले होते, पण पोटात मात्र जोरदार ओरड सुरु होती. मग मालवणात पोहोचल्यानंतर बऱ्याच लोकांना विचारुन चैतन्य नावाच्या हॉटेल मध्ये प्रवेश केला, छोट्याश्या त्या हॉटेल मधे अस्सल मालवणी जेवणावर आडवा हात मारला आणि समाधान वाटले. एवढ्याश्या त्या हॉटेल मधे एक छोटीशी विहिर सुद्धा आहे. एकुणच कोकणातल्या विहीरी एकदम छोट्या छोट्या असतात हे वाचले होते आता प्रत्यक्ष पाहिले. काही विहिरी तर मोठे ताट झाकण म्हणुन ठेवता येतील अश्या असतात.

आता लक्ष होते सिंधुदुर्ग. मालवणच्या जवळच कुरटे बेटाकडे महाराजांचे लक्ष गेले आणि सिंधुसागर धन्य झाला. समुद्रावर आपला वचक बसवण्यासाठी त्या भागात सागरी दुर्गाची गरज राजांनी जाणली, आणि गोड पाणी उपलब्ध असणाऱ्या कुरटे बेटावर किल्ला वसविण्याची त्यांनी आज्ञा दिली. शिसे, चुना आणि गुळ यांचा वापर करुन या गडाचा पाया भरण्यात आला. एकुण साडेतीन कि.मी. एवढ्या तटबंदीच्या आत या गडाचा पसारा सामवलेला आहे. भक्कम तटबंदी आजही सागराच्या रौद्र रुपाला सामर्थ्याने तोंड देत उभी आहे. वळणाकृती प्रवेश्द्वाराने आम्ही किल्ल्यात प्रवेश केला, आणि समोरच एक दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर दिसले. मारुतीच्या समोरच गडाचा मुख्य दरवाजा आहे. या दरवाज्यात वरच्या बाजुला काही रिकाम्या जागा दिसतात. शत्रु आत शिरण्याचा प्रयत्न करत असल्यास गरम तेल सोडण्यासाठी त्याचा उपयोग गेला जातो. गडावर काही खाजगी घरे आहेत, पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार परवानगी घेतल्याशिवाय गडावर मुक्कामाला रहाता येत नाही. प्रवेशद्वारापासुन एक सिमेंटचा रस्ता शिवाजी राजांच्या मंदिराकडे घेउन जातो. याच रस्त्यावर डाव्याबाजुला प्रसिद्ध दोन फांद्याचा माड आहे. पुढे शिवाजी राजांचे मंदिर आहे. कोल्हापुरच्या महाराजांकडुन या मंदिराची देखभाल करण्यात येते. आत कोळ्याच्या वेशात असलेल्या शिवप्रभुंची मुर्ती आहे. तसेच राजांची एक तलवार सुद्धा ठेवलेली आहे. दसऱ्याच्या दिवशी ही तलवार बाहेर काढली जाते. अशा मंगल वातावरणात छत्रपतींच्या नावाने गर्जना होणारच, या गर्जनेत पुजारी आणि इतर मंडळी सुद्धा सहभागी झाली. मंदिराच्या डाव्या बाजुने पुढे जावुन भवानी मातेचे दर्शन घेतले आणि मग तटबंदी वरुन चालायला सुरुवात केली. खाली समुद्र तटबंदीवर जोरदार लाटांनी प्रहार करत होता आणि त्या संगमातुन उसळणारे पाणी डोळे मिटू देत नव्हते. पुढे चालत गेल्यानंतर तटबंदीच्या बाहेरुन वाळुचा एक पट्टा दिसतो. हाच भाग राणीच्या वेळा म्हणुन प्रसिद्ध आहे. महाराणी ताराबाई यांच्या वेळी हा भाग वापरात आला.
सिंधुदुर्ग या लिंकवरुन सिंधुदुर्गाचे दर्शन घेता येईल.
याच लिंकवरुन एक आणखी गोष्ट लक्षात येईल. महाराजांनी किल्ला वसवण्याचा विचार करतांना एका गोष्टीने त्यांचा निर्णय पक्का केला होता. ती गोष्ट म्हणजे या बेटाचा आसपास भरपुर खडक आहेत, आणि या कारणामुळे कुठलेही मोठे जहाज गडाच्या थेट जवळ येउ शकत नाही आजही छोट्या यांत्रिक बोटी एक वळसा घेउनच आत आणतात. मात्र बेटावर उभे राहिले असता ही गोष्ट लगेच लक्षात येत नाही. या लिंकवरच्या चित्रात मात्र ते खडक स्पष्ट दिसतात.

परत फिरत असतांना तटंबदित जपुन ठेवलेल्या राजांच्या हाताच्या आणि पायाच्या ठश्यांचे दर्शन घेतले. एकुणच फार कमी गडांना राजांच्या प्रत्यक्ष सहवासाचा लाभ झाला त्यामुळे अशा ठिकांणाचे महत्त्व वाढते. एक तासाच्या या भ्रमंती नंतर आम्ही परतीचा मार्ग धरला. मग तारकर्लीला जाउन समुद्रावरची शांत रात्र अनुभवली. तिकडे पंधरा वीस कोळी मिळुन एकाच भल्यामोठ्या जाळ्याला ओढत होते. मागे एम.टीड़ीसी च्या रिसॉर्टवर चौकशी केल्यानंतर कळले की ऑनलाईन बुकिंग करुनच तिकडे रहायला मिळू शकते. मग एका छोट्याश्या हॉटेल मध्ये जाउन पथारी टाकली. पत्त्याचा एक डाव मांडुन आणि तो 'जिंकुन' दिवसाची सांगता केली.

सोमवारी सकाळी तारकर्लीमध्ये समुद्रस्नानाचा बेत होता. तारकर्लीच्या समुद्र एवढा नितळ आहे की सुर्यप्रकाश आणि हवामान या गोष्टी जुळून आल्यातर २० फुटापर्यंत समुद्राचा तळ दिसु शकतो. आम्ही मात्र अगदी सकाळी गेल्यामुळे आम्हाला तसे काही बघायला मिळाले नाही. पण तरिही स्वच्छ समुद्रात डुंबण्याचा मनसोक्त आनंद लुटता आला. मागे अलिबागच्या किनाऱ्यावरुन फिरतांनाचे दिवस आठवले, नुसता किनारा बघुनच समुद्रात जाण्याची इच्छा होत नव्हती. तारकर्लीला मात्र तो उपवास धरावा लागला नाही. समुद्र खवळलेला होता आणि आम्हाला मात्र मोठ्या मोठ्या लाटांवर स्वार व्हायला फारच मज्जा येत होती. तारकर्लीचा किनारा हा एकदम सुरक्षित मानला जातो. मध्येच समुद्रातुन बाहेर येउन उन्हात वाळुवर पडुन रहावे, वाळुमध्ये पाय रोवुन घर बांधण्याचा थेट लहानपणात घेउन जाणारा खेळ खेळावा आणि परत समुद्रात जावे, असा बराच वेळ खेळ सुरु होता. पुढच्या दिवसभराच्या कार्यक्रमाकडे लक्ष ठेवुन आम्ही समुद्राचा निरोप घेतला आणि 'अन्नपुर्णा' हॉटेल मध्ये परतलो. अंघोळी आणि न्याहारी उरकुन परत आम्ही मालवणात दाखल झालो. राजकोट आणि सर्जेकोट बघुन आम्ही पद्मदुर्गाकडे निघालो. पुर्वी पद्मदुर्गाकडे जाण्यासाठी वाळुच्या पट्ट्यावरुन जाता येत असे पण त्सुनामी नंतर मात्र तो पट्टा नष्ट झाला आणि आता बोटीशिवाय पर्याय नाही. पद्मदुर्ग या लिंकवर पद्मदुर्ग आणि त्याकडे जाणारा वाळूचा दांडा स्पष्ट दिसत आहे. बोटिने पद्मदुर्ग गाठल्यावर आत देवाचे दर्शन घेतले आणि बाहेर पडताच वाळूकडे नजर गेली. तिकडे विविध प्रकारच्या अत्यंत सुंदर शंख शिंपल्याचा सडाच पडला होता. भान हरपुन सगळे जण शिंपले गोळा करायला धावले. परत बोटीने बसतांना प्रत्येकाची झोळी भरुन निघाली होती.

मालवणात परतुन पुढे मसुरे गावच्या जवळ असलेल्या भरतगडाकडे आम्ही निघालो. भरतगडाची तटबंदी आणि बुरुज अजुन शिल्लक व्यवस्थीत शिल्लक आहे . आडबाजुच्या या अशा किल्ल्यांकडे कुणाचे विशेष लक्ष नसल्यामुळे अशा किल्ल्यावरुन आधुनिक 'शिल्पकरांची कला' बघायला मिळत नाही ही त्यातल्यात्यात एक आनंदाची गोष्ट ! आत आंब्याची झाडी आहेत आणि एक खोल विहीर आहे. विहिरीत उतरुन जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि पाणी सुद्धा व्यवस्थीत दिसते. विहीर बघुन आम्ही तटबंदिवरुन चालायला सुरुवात केली. एका बुरुजावर कसेबसे चढून दुरवर नजर टाकली, सर्वत्र निसर्गाच्या हिरवाईने परिसर नटलेला होता.

भरतगड उतरुन आम्ही गड नदिच्या किनाऱ्यावर आलो, या नदित समुद्राचे पाणी शिरुन तिचे खाडित रुपांतर झाले आहे. गाडीतुन उतरुन आम्ही किनाऱ्यावर आलो, आणि समोर दिसणाऱ्या दृश्याने सर्वांनाच खिळून ठेवले. दुरवर गेलेली खाडी, त्याच्या दोन्ही किनाऱ्यावर दाटीवाटीने उभी असलेली माडाची गर्दी, सुर्य परतीच्या प्रवासाला निघालेला, एकदम शांत वातावरण, त्या शांततेचा भंग करणारे पण मधुर असे विविध पक्ष्यांचे आवाज, आणि या सर्व वातावरणात शांतपणे खाडी पार करत असलेली तर. केवळ चित्रात किंवा चित्रपटात दिसणारे हे दृश्य भरभरुन अनुभवायला मिळत होते. 'तर' या बाजुला आली आणि थोडेसे अंतर पुढे जात आम्ही जाउन बसलो. ट्रेकिंगच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या वाहनांनी एकेकदा प्रवास घडतो आहे, त्यात या तर चा सुद्धा समावेश झाला. खाडी ओलांडुन त्या गच्च झाडीत प्रवेश केला. भगवंतगडाकडे चालत निघालो. एक छोटेसे वळण घेउन आपण गडावर प्रवेश करतो, गडावर जात असतांना सभोवतालचे नयनरम्य दृश्य दिसतच होते आणि आत याच्या जोडीला पायथ्याखालच्या गावात सुरु असलेल्या पं. भिमसेन जोशी यांच्या स्वरातील अभंगवाणीचे स्वर सुद्धा आमच्या पर्यंत पोहोचत होते. त्या वातावरणात ते स्वर एकदम प्रसन्न करुन गेले. भगवंत गडावर एका देउळ आणि तुळशी वृंदावनाचे अवशेष शिल्लक आहेत आणि दरवाज्याचे काही अवशेष दिसतात. संध्याकाळच्या वेळी वेगवेगळ्या पक्ष्यांचे आम्हाला दर्शन घडले. आणि मागे आम्ही पार केलेली खाडी दिसत होती. आम्ही गडावरुन परतलो आणि तर वाल्यांना धन्यवाद देउन पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. भरतगड आणि भगवंतगड भरतगड, भगवंत गड आणि आजुबाजुचा परिसर.

आचऱ्याच्या पुरातन रामेश्वराकडे जात असतांना मध्येच एक मोठे देउळ दिसले आणि आम्ही दर्शन घ्यायला उतरलो. कांदळगाव असे त्या गावाचे नाव होते आणि सिंधुदुर्ग किल्ला बांधला जात असतांना (कि पुर्वी ?) शिवाजी राजे कांदळगावाच्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. देवळाच्या अगदी समोर राजांनीच लावलेला वटवृक्ष जतन केलेला आहे, त्याच्या खाली आता महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. एकुणच देउळ खुप प्रशस्त आणि प्रसन्न वाटले. कोकणात फिरतांना तिकडील देवळे मला फारच आवडली, कुठल्याही छोट्याश्या गावात छान बांधलेले देउळ दिसत होते. कौलारु सभामंडप , आत प्रशस्त जागा , आणि स्वच्छ परिसर सर्वच देवळातुन आढळतो. अजुन एक मला जाणवलेली गोष्ट म्हणजे, देशावर महादेवाच्या समोर नंदी काही अंतरावर किंवा बऱ्याचदा बाहेर असतो, पण कोकणात मात्र नंदी अगदी महादेवाच्या जवळ असतो आणि त्यामुळे नंदीपासुन काही हात दुरुनच दर्शन घ्यावे लागते. नंतर आचऱ्याच्या रामेश्वराचे दर्शन घेतले आणि जेवण करुन कुणकेश्वराकडे निघालो. कुणकेश्वराकडे जातांना शेवटच्या वळणावर दुरुन मोहक दर्शन होते. कुणकेश्वराला भक्त निवासाची चांगली सोय केलेली आहे. त्या भक्त निवासाच्या दोन खोल्या घेतल्या, पुन्हा एकदा गप्पांच्या जोडीने पत्त्याचा डाव रंगला, आणि अस्मादिकांनी परत एकदा डाव जिंकला !!

सकाळी उठुन कुणकेश्वराचे दर्शन घेतले, थोडावेळ समुद्राकडे बघत बसलो आणि मग देवगडाच्या दिशेने निघालो. वाटेत जामसंडे नावाचे गाव लागले. देवगडचा हापुस इथेच खरेदी केला जातो. मनसोक्त आंब्याची खरेदी करुन देवगडाच्या किल्ल्यात प्रवेश केला. आत एक अलिकडच्या बांदणीचे देउळ आहे आणि दिपगृह आहे. फुरश्यांसाठी एकेकाळी हा किल्ला अतिप्रसिद्ध होता पण आता मात्र फुरसे आजिबातच आढळत नाही. देवगडाचा निरोप घेउन आम्ही विजयदुर्गाकडे प्रस्थान केले. विजयदुर्गात पोहोचल्या नंतर पहिल्या नजरेतच आपण त्याच्या प्रेमात पडतो. बहुपदरी तटबंदी बाहेरुन स्पष्ट दिसते आणि किल्ल्याच भक्कम भिंत सुद्धा एका बुरुजावरुन दिसणारा भला मोठा तिरंगा बघत आपण आत प्रवेश करतो. इतर किल्ल्याप्रमाणे इथे सुद्धा वळण घेउनच प्रवेश घ्यावा लागतो. आत शिरल्यानंतर एक मारुतीचे मंदिर आहे आणि समोर एक पोलिस स्टेशन सुद्धा आहे. बाहेरच तोफेच गोळे मांडुन ठेवलेले दिसतात. नंतर तटबंदीवरुन चालयला सुरुवात केल्यानंतर आपल्याला तिची वैशिष्ट्ये लक्षात यायला लागतात. अत्यंत सुरक्षित अशा पद्धतीची तिची बांधणी आहे.

याच्याही पुढे जाउन अलिकडेच लागलेल्या एका शोधाची माहिती आपल्याला स्तिमीत करते. इंग्रज काळात विजयदुर्ग जिंकण्यासाठी त्यांनी समुद्राच्या बाजुने हल्ला चढवण्याची योजना केली आणि या हल्ल्या साठी एक जहाज विजयदुर्गाकडे निघाले. पण विजयदुर्गापासुन काही अंतरावरच ते जहाज अत्यंत गुढ रित्या समुद्रात समाधिस्त झाले. या इतिहाचा पाठपुरावा करत काही लोकांनी पाणबुड्याच्या साह्याने विजयदुर्गाच्या आसपासचा सागर पिंजुन काढला आणि त्यांना सापडलेली माहिती आश्चर्यजनक होती. विजयदुर्गाच्या काही अंतर पुढे खोल समुद्रात एका खडकावर २० फुटापर्यंत तटबंदी बांधण्यात आलेली आहे आणि हे बांधकाम शिवकालीन आहे. या स्थ्यापत्यकले पुढे आणि कल्पकतेपुढे आपण नतमस्तक होतो आणि विजयदुर्ग हा 'विजय'दुर्ग होता ते लक्षात येते. विजयदुर्गावरचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे तिकडे साहेबाचे ओटे नावाचे काही ओटे आहे. यांची सुद्धा रंजक कहाणी आहे. स्वातंत्र्यपुर्वकाळात एक इंग्रज अधिकारी सुर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी विजयदुर्गावर आला होता. त्यावेळी मिळालेले स्पेक्ट्रोग्राफ घेउन तो मायदेशात परत गेला आणि पुढे शास्त्रज्ञांनी 'हेलियम' वायुचा शोध लावला तेंव्हा या सुर्यग्रहणाच्या अभ्यासाचा त्यांनी वापर केला होता.

तटबंदिवरुन चालत असतांना दुपारची वेळ असल्याने खाली समुद्राचा बराच खोलवर तळ दिसत होता. त्याच्याकडे लक्ष ठेउन चालत असतांनाच एक डॉल्फिन दिसला. आणि मग हळुहळू कळपच असल्याचे लक्षात आले. तिकडेच त्यांच्या लिला बघत बसलो असतांनाच एका जोडीने थेट चित्रातल्या सारखी सुळकी घेतली आणि डोळ्याचे पारणे फिटले. पुढे तटबंदितील एक भुयार पाहीले प्रचंड उंची असलेले हे भुयार आजही सुस्थितीत आहे. काहीश्या अतृप्त मनाने विजयदुर्गाचा निरोप घेतला आणि परतलो. वाटेत रामेश्वराच दर्शन घेतले, रामेश्वराच्या खोदिव वाट फारच छान आहे. परततांना गगनबावड्याच्या वर असलेल्या गगनगडाकडे गेलो. वरुन घाटातील शोभा आणि संपुर्ण कोकण परिसर सुरेख दिसत होता. गगन गडाच्या माथ्यावर सुर्यास्ताच्या वेळी तिरंगा उतरला जात होता. त्याच्या साक्षीने जयजयकार करुन गगनगड उतरलो.

तीन दिवस सर्व काही विसरुन मनसोक्त भटकता आले, आणि अविस्मरणीय अश्या अनेक गोष्टी बघता आल्या.

वरील सर्व आणि अजुन काही फोटो सागरभ्रमण या लिंकवर बघायला मिळु शकतील.