Wednesday, May 30, 2007

या झोपडीत माझ्या

काही दिवसांपुर्वी एका मित्राने ही कविता तालासुरात म्हणुन दाखवली होती, तेंव्हा पासुन शब्दांच्या शोधात होतो, आता मिळाले. एक नितांत सुंदर कविता

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या ॥ १ ॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥ २ ॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥ ३ ॥

जाता तया महाला, "मज्जाव" शब्द आला
भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥ ४ ॥

महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥ ५ ॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥ ६ ॥

पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥ ७ ॥

- संत तुकडोजी महाराज

1 comment:

Meenakshi Hardikar said...

माझी अगदी आवडती कविता आहे.. मस्तय..