आज कुठेतरी वाचनात 'आमची माती, आमची माणसं' या दूरदर्शन वरच्या कार्यक्रमाचा उल्लेख आला, आणि दुरवरुन 'ती' धून ऐकू येते आहे असे वाटून गेले क्षणभर.
संध्याकाळी साडेसहा वाजता दूरदर्शन वर हा कार्यक्रम लागत असे. अर्थात त्यावेळी त्यातील चर्चा आणि संबंधित गोष्टींमध्ये विशेष रस नसायचा. तरी तुळशीला पाणी घालणारी माउली, शेत नांगरणारे शेतकरी (अगदी मागे उडणाऱ्या बगळ्यासहित) , दूध काढतानाचे शेतकरी या सगळ्या आसपास नेहमी दिसणाऱ्या गोष्टी टी. व्ही. च्या पडद्यावर बघताना पाहुन विशेष आनंद होत असे. या सर्वाच्या सोबतीला "ही काळी आई, धनधान्य देई, जोडती मनाची नाती, आमची माती, आमची माणसं!." हे मस्त शिर्षकगीत अजूनच मोहिनी टाकत असे. या कार्यक्रमातून तज्ञांच्या मुलाखती सोबतच एखादा वेगळा प्रयोग केलेला शेतकरी मुलाखत देऊन जाई. अशा मुलाखती तर आम्ही हरखून पाहत असू.
आता या सर्वांचा विचार करताना असे वाटून जाते, की काय होते या कार्यक्रमात विशेष आवडावे असे, काहीही नाही. भरजरी साड्या आणि लक्झरी गाड्या नव्हत्या, मोठमोठ्या बिझनेस हाउस मधील भांडण नव्हती, विवाह बाह्य संबंध नव्हते की आचरट विनोद नव्हते. 'सो कॉल्ड' रियालिटी शो मधील एस.एम.एस. नव्हते की एकजात सारख्याच दिसणाऱ्या सिक्कीम मधील मुलीने तोडक्यामोडक्या हिंदीत बोलून खोलेलेले 'सुपर लोटो किस्मत के पिटारे नव्हते'. पण तरीही हा कार्यक्रम का लक्षात राहावा बरं?
ह्म्म !! त्याच्या नावातच या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं. 'आमची माती आमची माणसं' या दोनच गोष्टीत जीवनाचं सारं आहे, आपल्याला सर्वात जास्त सुखावणाऱ्या, आनंद देणाऱ्या आणि अभिमान वाटाव्या अशा या दोनच गोष्टी 'आमची माती आमची माणसं' !!
No comments:
Post a Comment