चला , आज एक कोडे घालतो...
एका आटपाट नगरात एकदा चार दरोडेखोरांनी मिळून दरोडा घातला. त्या नगराचे गृहमंत्री आपल्या आर. आर. आबांसारखेच कर्तव्यतत्पर होते, त्यामुळे त्यांच्या खात्याने तीच तत्परता दाखवून त्या चोरांना पकडले आणि न्यायालयासमोर उभे केले. न्यायाधीश महाराज आपल्या मुंबई बाँबस्फोट, मुंद्राक घोटाळा या सारख्या निवडक खटल्यांमध्ये अडकले होते. आणि तशीही या चोराकडून दंड म्हणून २५० वैगरे कोटी मिळणार नाहीत याची त्यांना खात्री होती. म्हणून त्यांनी सरळ या चोरांना सोडून द्यायचे ठरवले. पण तसे केले असते तर वृत्तवाहिन्यांनी आठवडाभर भंडावुन सोडले असते, असा विचार करून न्यायाधीशांनी त्या चोरांना एक कोडे घातले. जर त्या चोरांनी कोडे सोडवले तर त्यांना सोडून देण्यात येईल (आणि मिडियाला सुद्धा आडवे करता येईल, इतकी हुशार मंडळी तुरुंगात का ठेवायची असे म्हणून) आणि जर त्यांनी कोडे सोडवले नाही तर मात्र त्यांना पकडून तिहारला पाठवण्यात येईल अशी घोषणा झाली.
ते कोडे खालील प्रमाणे होते. सोबतच्या चित्रात दाखवल्या प्रमाणे चार कैद्यांना उभे करण्यात आले.
ते सर्वजण एकाच दिशेला बघत होते. त्यांना अशा पद्धतीने उभे करण्यात आले होते की
पहिला चोर, दुसऱ्या आणि तिसऱ्याला बघू शकतो
दुसरा चोर, तिसऱ्याला बघू शकतो
तिसरा आणि चौथा मात्र कुणालाही बघू शकत नाहीत.
प्रत्येकाच्या डोक्यावर एक एक टोपी ठेवण्यात आली होती. त्यांना सांगण्यात आले होते की एकूण दोन पांढऱ्या आणि दोन काळ्या टोप्या आहेत. प्रत्येक जणाला तो स्वतः कुठल्या रंगाची टोपी घालत आहे हे माहिती नाही. आणि त्यांना शिक्षेपासून वाचवण्यासाठी एकच गोष्ट करायची होती, ती म्हणजे आपल्या डोक्यावर कुठल्या रंगाची टोपी आहे ते ओरडून सांगायचे. कुणाही एकाने असे अचूक ओरडले तरी सर्वांची सुटका होणार. अर्थात या साठी नेहमीचे नियम लागू होतेच ते म्हणजे
कुणीही वळून बघायचे नाही किंवा हालचाल करायची नाही
एकमेकांशी बोलायचे नाही
डोक्यातून टोपी काढायची नाही
आता आपल्या सारख्या विद्वत जनांना प्रश्न असा आहे की कोण आपल्या डोक्यावरील टोपीचा रंग कुठल्या क्रमांकाचा कैदी अगोदर ओळखेल आणि का ?
उत्तर प्रतिसादात मिळेल :-)
2 comments:
नमस्कार सुभाष,
तू मागे टाकलेले एक कोडे, "जीवनाची आणि मृत्यूची गुहा", ते मला फार आवडले होते.
ह्याचे उत्तर : क्र. २ चा कैदी.
स्पष्टीकरण लिहीतो मग. :)
फक्त एकच आहे, की ते चार कैदी माफक बुद्धीमान आहेत आणि ही गोष्ट चौघानाही माहीत आहे असेही हवे ना ? (कारण २ थांबणार आहे थोडा वेळ :) ) (चला, आता मलाही कोडे टाकण्याची सुरसुरी आली :) ) ..
प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
जवळपास सर्वांचे उत्तर बरोबर आहेच
अर्थात उत्तर आहे, कैदी क्रमांक २ हा सर्वात अगोदर ओरडून रंग सांगेल. कारण क्रमांक ३ व ४ हे कधीही टोपीचा रंग सांगू शकणार नाहीत. आता उरले दोन कैदी, १ आणि २. तार्किकदृष्ट्या क्रमांक १ चा कैदी सर्वात अगोदर ओळखू शकतो, आणि जर त्याच्या समोरच्या दोन्ही कैद्यांनी सारख्याच रंगाच्या टोप्या घातल्या असत्या तर लगेच तो ओरडला असता. पण तो ओरडला नाही याचा अर्थ क्रमांक २ ला कळून चुकेल की माझ्या आणि क्रमांक ३ च्या डोक्यावर वेगवेगळ्या रंगाच्या टोप्या आहेत. मग तो लगेचच क्र. ३ च्या टोपीचा रंग बघून त्याच्या विरोधातील रंग ओरडून सांगेल..
अर्थात सर्वांची सुटका केली जाईल, आता ते सगळे कैदी राजकारणात जायला तयार...
प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद
Post a Comment