Thursday, April 19, 2007

मी हसतो - माझ्यावर

काही दिवसांपुर्वी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील एका हॉटेल मध्ये मित्र मैत्रिणींसोबत जेवायला गेलो होतो. बऱ्याच दिवसांनी सर्वजण भेटत असल्यामुळे जेवणाच्या साथीने गप्पा रंगत गेल्या. प्रत्येक जण आपापल्या ऑफिस मधुनच तिकडे येउन पोहोचला होता. जेवण झाल्यावर सगळे बाहेर आले, आणि मी सर्वात शेवटी निघालो. निघतांना टेबलावर एक फाईल दिसली, आणि आपल्यातल्याच कुणाची तरी फाईल विसरुन राहिली असे वाटल्यामुळे ती फाईल घेउन मी बाहेर आलो. बाहेर येताच एका मैत्रिणीला, "काय गं, काय हा वेंधळेपणा? असे काम करतात का? फाईल इथेच विसरुन चालली होतीस ना ?", असे विचारुन ती फाईल पुढे केली. माझे वाक्य संपत असतांनाच सर्वांनी माझ्याकडे पाहिले, काही क्षण सगळे स्तब्ध झाले आणि दुसऱ्याच क्षणी हास्याचा कल्लोळ उडाला. मला मात्र काय घडले याची काहीच कल्पना न आल्याने मी बावरुन त्यांच्याकडे बघत होतो. हळूच लक्ष हातातल्या फाईल कडे गेले, मी फाईल उघडुन बघितली आणि आता मात्र त्याच फाईल मागे डोके लपवण्याची वेळ आली होती. झाले काय होते की, फाईल समजुन मी हॉटेलातील भले मोठे मेन्यु कार्डच उचलुन आणले होते !! सर्व वेटर्स ची नजर चुकवत हळूच जाउन परत ती 'फाईल' ठेवुन आलो. आजही त्या हॉटेल समोरुन जातांना त्या 'फाईल'ची आठवण आल्याशिवाय रहात नाही.
*****************************************************
असाच एक दिवस साखर झोपेत असतांनाच मोबाईल गुरगुरला. ऍप्लिकेशन मध्ये एक गोंधळ झाला असुन तो त्वरित ठिक करणे भाग आहे, हे सांगणाऱ्या बॉस चा फोन होता. नाइलाजाने उठलो, आवरले आणि खाली येउन स्टॉपवर कॅबची वाट पहात उभा राहिलो. सकाळच्या प्रसन्न वेळी बरेचसे लोक पायी फिरायला जात होते. जातांना प्रत्येक जण माझ्याकडे पहात होता. सिनेमातील नायका प्रमाणे आपण काही तरी विसरुन तर नाही ना आलो या भीतीने मी स्वतःकडे अनेक वेळा बघितले पण काही कळायला मार्ग नव्हता. खरोखरचं आपल्यामध्ये काहितरी पाहण्यासारखे आहे हे जगाला पटलेले दिसते या आनंदाने मी खुललो. पण त्यांची 'विचित्र नजर' मला अस्वस्थ करत होती. आता मात्र मी त्याचा विचार करणे थांबवले आणि जरा इकडे तिकडे बघु लागलो. हळुच माझी नजर माझ्या सावली कडे गेली. आणि मला 'त्या' हरणाची गोष्ट आठवली ज्याला आपल्या पायाचे प्रतिबिंब बघुन वाईट वाटले होते पण शिंगाचे सौंदर्य बघुन त्यांचा अभिमान वाटला होता. 'पण शेवटी पायानेच वाचवले ना' असा विचार करत असतांना माझी नजर माझ्या शिंगाकडे (अर्थात डोक्याच्या सावली कडे) गेली, आणि क्षणार्धात मला लोकांच्या त्या विचित्र नजरेचे कारण कळले. घाईने बाहेर पडत असतांना मी छोटासा कंगवा वापरुन भांग पाडत होतो आणि घराला कुलुप लावतांना तो कंगवा केसात तसाच राहिला होता. याचाच अर्थ मी गेले काही मिनिटे अर्थवट पींजारलेले केस आणि त्यात अडकलेला कंगवा अश्या परिस्थितीत स्टॉपवर उभा होतो. त्या तश्या अवस्थेत मी कसा दिसत असेन हे आठवले की हसुन हसुन पुरेवाट होते....
******************************************
वरचे सगळे लिहुन झाल्यावर एकटाच हसत होतो तर ऑफिसात बसलेली मोजकीच टाळकी माझ्याकडे बघायला लागली. रात्रीच्या २.३० वाजता ऑफिसात कंटाळा आला असतांना आपल्याच वेंधळेपणाचे किस्से आठवुन हसण्यात काय मजा आहे त्यांना कसे कळणार !!

3 comments:

Nandan said...

:D. shevaTache vakya mast.

अनु said...

Mast. Menucard cha kissa avadala.

said...

हा हा.. फारच छान...!