"आज उतनी भी नही बची ..."
हातात प्रिंट आउट घेऊन समोरच्या बोर्डाकडे बघत असतानाच विचारांची रेल्वे मनातून धावून गेली. प्रिंट समोरच्या बोर्डावर लावावी म्हणून ड्रॉवर उघडला, आणि नेहमी हव्या तेवढ्या पिन्स उपलब्ध असणाऱ्या ड्रॉवर मध्ये एकही पिन नव्हती. का कुणास ठाऊक पण चटकन मनात हाच शेर आला,
आज उतनी भी नही बची हमारे पैमाने मे,
जितनी कभी छोड दिया करते थे मैखाने मे ।
आमचे फिजिक्स चे सर एकदा वर्गात हा शेर म्हणाले होते. नेहमी खडू हवे तेवढे उपलब्ध असताना ऐनवेळी, एकही खडू गवसला नाही म्हणून त्यांनी हा शेर म्हणून दाखवला होता. फारच मजेशीर व्यक्तिमत्त्व !!, शुक्रवारी लेक्चर संपत असतानाच न बोलता फळ्यावर काहीतरी खरडून निघून जायचे, ते गेल्यावर कळायचे की आज रात्री दूरदर्शन वर दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटाचे नाव, त्यातील कलाकारांचे नावे असे सगळे लिहिलेले असायचे फळ्यावर. त्यांचा विषय फिजिक्स असला तरी त्यांना शेती आणि बागकामात विशेष रस होता, त्यामुळे बाजारच्या दिवशी ते नियमीतपणे बाजारात दिसत काहीतरी विकताना. सर्व चुकार मुलेही त्यांच्या लेक्चरला आवर्जून हजर असायची, त्यांच्या या विशिष्ट पद्धतीमुळे.
त्यांच्याच प्रमाणे आमच्या प्राथमिक शाळेतील एका सरांची एक विशिष्ट सवय होती, ती म्हणजे मारताना हातातील घड्याळ काढायची. म्हणजे तसे ते काही फार मुलांना मारत नसत, क्वचितच, पण जेव्हा कधी मारायचे तेव्हा हातातील घड्याळ खिशात ठेवूनच. त्यांची ही सवय सर्वांना एवढी परिचित होती, की नंतर नंतर त्यांनी फक्त घड्याळाला हात लावला की मुले शांत होत असत.
असे अनेक शिक्षक अनेक सवयी, त्या सोबत येणाऱ्या कडू गोड (म्हणजे त्या त्या वेळी कितीही कडू वाटल्या असल्या तरी आता गोड वाटणाऱ्या) आठवणी, सरकून गेल्या नजरेसमोरून.
खूप खूप लिहिता येईल,
..पण पुन्हा केव्हा तरी,
तूर्तास मात्र हातात कागद आहे आणि दुसरीकडे पिन शोधतो आहे ,
त्या न सापडणाऱ्या पिन ने सुद्धा टोचण्याचा धर्म पाळला हे मात्र नक्की...
आह !!
1 comment:
sher mast aahe. to aaThavaNyaamaagach kaaraN vaachoon maja vaaTali. Tula aaThavaNaarya shixakanchya savayivishayi lihi nakki.
Post a Comment