Saturday, April 29, 2006

माझे सरसगड दुर्गभ्रमण

माझे सरसगड दुर्गभ्रमण

३१ डिसेंबरची रात्र सह्याद्रीवर साजरी करण्याचा बेत आखला होता पण काही कारणास्तव तो बेत सिद्धीस जाउ शकला नव्हता. त्यामुळे २००६ चा पहीला रविवार तरी निदान सह्याद्रीसोबत घालवावा अशी इच्छा होती, त्यासाठी शनिवारी जी.एस. ला विचारले पण तो खुपच busy असल्यामुळे येउ शकणार नसल्याचं कळलं, पण माझं मन स्वस्थ बसु देईना. कुणी आलं नाही तर एकट्यानं का होईना पण या रविवारी कुठेतरी जायचचं असा निश्चय केला. आणि त्या दृष्टीने कुठे जाता येईल असा विचार सुरु केला असता सर्वात प्रथम सरसगडाचं नाव डोळ्यासमोर आलं. मागच्या वेळी आम्ही सरसगड सर करायला गेलो असतांना एक छोटासा अपघात घडल्यामुळे ट्रेक अर्धवट सोडुन परतावं लागलं होतं त्यामुळे एकट्याने जाउन हा ट्रेक करण्याकडे मन झुकले आणि मी सरसगडावर जाण्याचं नक्की केलं.
सकाळी साडेसात-आठच्या आसपास घराच्या अगदी बाजुला खोपोली नगरपरिषद परिवहनाची लोणावळा खोपोली ही बस पकडली आणि साधारण नऊ वाजता खोपोलीमधे पोहोचलो. सरसगड हा किल्ला अष्टविनायकापैकी एक असणाया पाली गावात आहे. त्यामुळे पाली गावात जाण्यासाठी खुप बस मिळतील अशी माझी समजुत होती. खोपोलीमधुन पाली गावात जाण्यासाठी बसची वाट पहात होतो पण खुप वेळ झाला तरी कुठलीच बस मिळेना पण शेवटी पुणे-रोहा पालीमार्गे अशी एक तुडंब भरलेली बस मिळाली. बरेच दिवस झाले एवढे अंतर बसमधुन उभे राहुन जाण्याचा प्रसंग आला नव्हता आता दुर्गभ्रमणामुळे ती वेळ आली होती. मग अत्यंत खराब अशा रस्त्यातुन पालीगावाकडे प्रवास सुरु झाला. अर्थात उभा राहणायांना बसणायापेक्षा कमी धक्के बसत होते. कशिबशी गाडी साडेअकराच्या आसपास पाली गावात पोहोचली. उतरल्याबरोबर भुकेची जाणीव झाली मग लगेचच एका हॊटेलमधे जाउन पोटपुजा करायला सुरुवात केली. बाजुच्याच टेबलवरची काही मंडळी होटेल मालकाला 'गडावर कसे जायचे?','पाण्याचं सोयं काय?' वैगरे प्रश्न विचारत होते. त्यावरुन ती ट्रेकर मंडळी आहेत हे मी ओळखले आणी पुढे होउन त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. गप्पांमधे कळले की त्यांचा सिंहगड ग्रुप नावाचा ग्रुप होता आणि नुकताच सरसगड उतरुन आता ते सुधागडावर निघाले होते. जवळपास पन्नास जण होते आणि निघतांना मला त्यांनी चला तुम्ही सुद्धा सुधागडावर आमच्या बरोबर असा आग्रह केला पण माझ्या मनात एकट्याने सरसगड सर करण्याचा निश्चय असल्यामुळे त्यांना नकार द्यावा लागला. मग त्यांना शुभेच्छा देउन मी निघालॊ.
मागच्या वेळी मी येउन गेलेला असल्यामुळे मला गडावर जाण्याचा रस्ता ठाउक होता पण तरी खात्री करावी म्हणुन मी एका गावकयाला रस्ता विचारुन घेतला. आणि त्याने सांगितलेल्या वाटेवरुन पुढे निघालो. सरसगडावर जाण्यासाठी दोन मुख्य वाटा आहेत. पहिल्या वाटेवरुन जाण्यासाठी पाली गावात यावे लागते. गणपतीच्या मागच्या बाजुने जाणाया रस्त्यावरुन डाव्या बाजुला वळावे आणि समोर एक वाट सोंडेवर जातांना दिसते ती सरळ बुरुजाच्या पायथ्याशी घेउन जाते. दुसरा रस्ता म्हणजे पाली च्या साधारण १ कि.मी. अलिकडे तळई नावाचे एक गाव लागते त्या गावातुन सुद्धा गडाच्या सोंडेवर चढता येते. पाली गावातुन जाणाया रस्त्याने गेल्यास बुरुजावर जाण्यासाठी पायया लागतात आणि त्या पायया ओलांडुन गेल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. तळई मधुन जाणाया रस्त्याने गेल्यास मात्र बुरुजावर जाण्यासाठी बांधलेल्या पायया नाहीत पण कातळात काही खोबणी आहेत त्यामधुन चढावे लागते. मी पाली गावातल्या रत्याने निघालो आणि मुख्य सोंडेवर येउन पोहोचलो. आता खाली पाली गाव दिसत होते आणि समोर सरसगडाचे बुरुज. सरसगडावर झाडांची संख्या खुपच कमी आहे आणि जी थोडेसे झाडे आहेत ती सुद्धा खुरटे. आणि होते नव्हते तेवढे गवत सुद्धा जाळून टाकलेले दिसत होते. त्यामुळे सावली साठी कुठे थांबण्याची सुद्धा सोय नव्हती आणि उन्हाचा मात्र जबरदस्त तडाखा होता. भर दुपारी बारा वाजताच्या सुमारास कडक उन्हात चढणे अतिशय अवघड जात होते. थकल्यानंतर खाली सुद्धा बसता येत नव्हते आणि तशाच परिस्थीत पुढे चालावे लागत होते.
मी माझ्याबरोबर पाण्याचा चार बाटल्या घेउन जात होतो पैकी एक बाटली केंव्हाच संपली होती. थोडेसे पुढे गेल्यावर एक थोडेस बरे वाटावे असे झाड दिसले मग झपाट्याने ते झाड गाठले. त्याच्या सावलीत जाई पर्यंत एवढा थकवा जाणवत होता की पोहोचल्याबरोबर स॔क फेकुन देउन आडवा झालो. बराच वेळ त्याच स्थितीत राहिल्यानंतर अजुन पुढे जायचे आहे ही जाणिव झाली मग पुन्हा निघालो तेवढ्यात 'गडावर चाललात की काय?, थांबा मी पण येतो' असा एक प्रश्न ऐकु आला वळुन बघितले तर एक गावकरी हातात एक प्लास्टीक पिशवी घेउन येत होता. त्याच्याशी बोलतांना कळले की गडावरील दर्गा आणि मंदिर यांची पुजा करण्याचं काम त्याच्याकडे होतं आणी त्यासाठी तो निघाला होता. मग आम्ही दोघे निघालो. एकट्याने जाण्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही असा विचार माझ्या मनात सुरु असतांनाच लगेच मला तो बरोबर असल्याबद्दल बरं वाटलं कारण पुढच्याच वळणावर एका बोरीच्या झाडाकडे तो मला घेउन गेला. काय गोड बोरं होती, वा, त्या रानमेव्याचा मनसोक्त आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा आम्ही पुढे चालायला लागलो. पण थोड्याच वेळात माझा स्पीड बघुन तो वैतागला असणार कारण मी पुढे जातो तुम्ही या हळुहळु असं म्हणून तो झपाझप चालत निघुन गेला आता मी बुरुजाच्या पायथ्याशी येउन पोहोचलो होतो.

समोर त्याच त्या पायया दिसत होत्या ज्यांनी आमचा मागचा ट्रेक पुर्ण करु दिला नव्हता. पुन्हा एकदा उन्हाने त्रास होऊ लागला.यावेळी मात्र खुप जास्त त्रास जाणवत होता. पायया चढायला सुरुवात केली खरी पण त्यावर हात टेकवताच चटका बसत असे आणि खाली सुद्धा बसवत नव्हते साधारण पाच दहा पायया चढुन गेल्यावर मात्र शरिराने लढा पुकारला आणि मस्तकात एक जोरदार सणक भरली. पुढच्या पायरीवर ब॔ग फेकुन देउन मी त्याच परिस्थीत एका पायरीवर आडवा झालो. दोन क्षण काहीच कळेना झटकन ब॔गेतुन एक पाण्याची बाटली काढुन डोक्यावर ओतली. त्याच अवस्थेत काही वेळ पडुन राहिलो पण जास्त वेळ बसणे शक्य नव्हते कारण मी अजुनही उन्हात होतो. मग उरलेले पाणी रुमालावर टाकुन तो रुमाल डोक्याला घट्ट बांधला टोपी चढवली आणी सावकाश एक एक पायरी चढत कसाबसा वरच्या पायरी पर्यंत पोहोचलो पुढे दरवाज्याच्या बाजुला पहारेकयांच्या देवड्या आहेत त्याच्या सावलीत जाउन शांत बसलो. बराच वेळ तेथे थांबल्यानंतर जरा आराम वाटला मग पुढे निघाल्यानंतर लगेचच आलात का म्हणुन एक हाक एकु आली बघतो तर थोड्यावेळापुर्वी भेटलेला गावकरी वर दर्गाच्या बाजुला बसला होता. मग मी बुरुजाला वळसा घालुन उजव्या बाजुने निघालो. आता मी बरोबर बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी आलो होतो. समोर एक छोटीशी गुहा होती त्याच्या उजव्या बाजुला पाण्याचे एक टाके होते. त्या गुहेत एक पीराचे थडगे होते. जेमतेम एक व्यक्ती बसु शकेल एवढेच उंची होती त्या गुहेची. मी शांत अशा त्या गुहेत जाउन बसलो. नुकतीच त्याने पुजा केलेली असल्याने अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता बाजुच्या पाण्यामुळे ती गुहा जास्तच थंड होती त्यामुळे एकंदरीत खुपच शांतता लाभली होती त्या क्षणी. त्या जादुई क्षणात काही काळ बसल्यानंतर पुढे निघालो. बालेकिल्ल्याच्या खालुन उजव्या बाजुने वळसा घालुन पुढे जात असतांना डाव्या बाजुला एक खोल अशी गुहा आढळली, एखाद्या थिएटरची बेसमेंट पार्किंग शोभावी अशी ती गुहा होती. तिन उंच दगडी खांब आणि दोन भागात विभागणी. पैकी एका भागात एक मोठी दगडी चुल सुद्धा होती.
पुढे वळसा पुर्ण झाल्यावर तळई गावातुन येणायावाटेच्या बरोबर वर येउन पोहोचलो. बुरुजावरुन ती वाट दिसत होती आणि मला चढतांना खुप त्रास झाल्यामुळे ही वाट त्याप्रमाणात सोपी वाटत होती. बुरुजाच्या बरोबर बाजुला एक पाण्याचे टाके आहेत गडावरील अनेक पाण्याच्या टाक्यापैकी एवढे एकच टाके पिण्याच्या पाण्याचे आहे. एकदम थंड पाण्याने सर्व थकवा निघुन गेला. तिकडुन पुढे निघाल्यानंतर बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता दिसतो. त्यावरुन बालेकिल्ल्यावर जायला सुरुवात केली. बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी अनेक झाडे आहेत.त्यांच्या सावलीतुन चालत बालेकिल्ल्यावर पोहोचलो. समोर लगेचच एक आधुनिक बांधणीचा दर्गा नजरेस पडतो. दर्ग्याच्या उजव्या बाजुला एक छान तळे आहे आणी त्या तळ्याच्या बाजुला एक शंकराचे मंदिर आहे. या तळयत एवढे कमळ फुलले होते की त्या कमळांना बघताच चढाईचे सार्थक झाल्यासारखे वाटते. मग गडावर फेरी मारायला सुरुवात केली. गडमाथा एकदम आटोपशीर आहे. एक मंदिर एक दर्गा. मंदिराच्या बाजुला उभे राहुन बघितले की एका बाजुला पाली गाव, अंबा नदी, जांभुळ्पाडा, आणि कुठेलेसे एक धरण दिसते. दुसया बाजुला सह्याद्रीच्या रांगा छान दर्शन देउन जातात. दुरवर दिसणार्या अनेक रांगामधुन मला फक्त तेलबैला त्याच्या वैशिष्ट्यपुर्ण रचनेमुळे ओळखता आला. पुन्हा मंदिराच्या बाजुला एका झाड्याच्या सावलीत तळ्यातल्या पाण्यात पाय टाकुन विसावलो. सोबत आणलेला खाउचा आस्वाद घेत असतांनाच लहान मुलांचा आवाज ऐकु आला. समोरुन दहा बारा लहान मुले येत होती. त्यांच्या मागुन एक गृहस्थ आले. चौकशी नंतर कळले की ते स्वतः IDBI मधे असुन ती सर्व मुले एका तायक्वांदो क्लासेसचे विद्यार्थी होते. मग त्यांच्या बाललीला बघण्यात बराच वेळ घालवला आणी मग परतायला सुरुवात केली. उतरांना मात्र फार त्रास झाला नाही. बालेकिल्ला उतरल्यानंतर पुन्हा खालच्या पाण्याच्या हौदातुन पाणी भरुन घेतले आणी उतरायला सुरुवात केली. पुन्हा बुरुजावर पोहोचल्यानंतर पाययावर बसलो. आता मात्र त्या पायया खुपच मोहक वाटत होत्या. आणि त्यांच्या भव्यतेची खात्री पटत होती. समोर खुपच छान दृश्य दिसत होते. ते दृश्य डोळ्यात साठवत एक एक पायरी उतरलो आणि डोंगर उतरावरुन पळत सुटलो.
खाली सोंडेच्या पायथ्याशी पोहोचलो तेंव्हा मागे वळुन बघितले. डोळे भरुन सरसगड बघितला. मनातील भावना शब्दांच्या पलिकडे गेलेल्या होत्या. आनंद, समाधान यांच्या पुढे थकवा काहीच नाही हे जाणवत होते. स्वर्गीय सुखाचा आनंद भरभरुन उपभोगायला मिळाला. गावात उतरल्याबरोबर हातपाय धुवुन बल्लालेश्वराच्या दर्शनासाठी गेलो. दर्शन घेउन सभामंडपात बराच वेळ बसलो. त्या संपुर्ण दिवसाचा तो कळस होता. उठावेसे वाटत नसतांना सुद्धा पोटाची मागणी झाल्यामुळे उठावे लागले. बाजुच्याच सुखसागर नावाच्या होटेल मधे जाउन जेवणावर आडवा हात मारला आणि पाली-खोपोली बस पकडुन खोपोलीत पोहोचलो. खोपोलीतुन लोणावळ्यात पोहोचण्यासाठी असणारी शेवटची बस मात्र चुकली होती त्यामुळे पुन्हा बराच वेळ प्रतिक्षा करावी लागली आणी शेवटी रात्री नऊ वाजता लोणावळ्यात येउन पोहोचलो. घरात शिरल्याबरोबर हर्षातिरेकाने उडी मारली. सकाळी घरातुन निघतांना अनेक प्रश्न मनात होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवुन पोहोचलो होतो. सरसगड पुर्ण केल्याचा आनंद, सरसगड एकट्याने पुर्ण केल्याचा आनंद, मागच्या वेळी अर्थवट सोडलेला सरसगड पुर्ण केल्याचा आनंद, अशा अनेक गोष्टी मला मिळाल्या होत्या. आणि कदाचित म्हणुनच सरसगडाचा फोटो wallpaper म्हणुन केंव्हाच set झालाय जो मला नेहमी माझ्या या आनंदयात्रेची आठवण देत राहील.

1 comment:

Unknown said...

nice...this is called passion