Saturday, April 29, 2006

Covalent Bond


Covalent Bond


"Covalent Bond : Any atom of a molecule forms a bond with another atom to complete its octate, this bond is known as Covalent Bond"

मी दहावीच्या वर्गात विज्ञान शिकवत होते. नुकतीच मी या छोट्याश्या शहरातील शाळेत विज्ञान शिक्षिका म्हणुन रुजु झाले होते आणि मला दहावीचा वर्ग मिळाला होता. हळुहळु विद्यार्थ्यांशी ओळख व्हायला सुरुवात झाली होती.

"तर अशा प्रकारे हा धडा संपला. कुणाला काही प्रश्न विचारायचे असल्यास विचारु शकता. उद्या येतांना व्यवस्थीत अभ्यास करुन या. मी एक छोटीशी चाचणी घेणार आहे. "

वर्ग संपवुन मी बाहेर आले आणि दुसर्‍या वर्गात निघाले तेवढ्यात मॅडम अशी हाक ऐकु आली. मी वळुन बघितले तर मृण्मयी मला बोलावत होती.

" मॅडम, मला काहीतरी विचारायच आहे तुम्हाला "
" काय गं मनु, काय प्रोब्लेम आहे. विचार ना "
" मॅडम मला जरा नेत्रदान कसे करतात त्याविषयी माहीती हवी होती. "

मी कौतुक मिश्रीत आश्चर्याने तिच्याकडे बघितलं.

" माहीती सांगते मी तुला पण मला एक सांग, तुझ्या मनात कसा काय आला हा विचार आणि तुला जरा जास्तच विचार करावा लागेल कारण तु अजुन खुप लहान आहेस "

" खरं म्हणजे मी माझ्या डोळ्यासाठी नाही विचारत, पण मला केवळ माहीती पाहिजे. माझ्या आईचे डोळे दान करायचे आहेत. "
" मग त्यासाठी तुझ्या आईची समती हवी, तु एक काम कर तुझ्या आईला किंवा बाबांना माझ्याकडे पाठवुन दे मग मी स्वतःच देईन त्यांना हवी ती माहीती. "

" नाही मॅडम तुम्ही मलाच सांगा. माझे बाबा माझ्या लहानपणीच वारले आणि आईला मी स्वतःच सांगणार आहे. " तिच्या या वागणुकी बद्दल मला काहीच समजेना पण नाईलाजाने मी तिला सर्व माहीती सांगितली धन्यवाद म्हणुन ती पळाली. मी सुद्धा लगेचच पुढच्या वर्गावर जाण्यासाठी निघाले. आणि माझ्या व्यस्त कार्यक्रमात मी पुन्हा अडकले. तिचा हा प्रश्न मी विसरुन सुद्धा गेले होते तर एक दिवस अचानक ती परत माझ्याकडे आली.

"मॅडम मला जरा किडनी कशी दान करतात ते सांगाल काय.. " आता मात्र मी उडालेच, " काय किडनी दान, अगं वेडी बिडी झालीस काय तु, तु अजुन दहावीतच आहेस आणि कशाला हवी गं तुला ही सर्व माहीती. "
" मॅडम माझ्या आईची एक किडनी दान करावयाची आहे. "
" तसं पहाता ही खुप चांगली गोष्ट आहे पण किडनी दान करण्याचा निर्णय तुझ्या आईने का व कशासाठी घेतला ते सांगु शकशील काय. "
" मॅडम तुम्ही फक्त मला माहीती सांगा. "
" ते काही नाही. तु मला अगोदर सांगितलेच पाहीजे कशासाठी माहीती विचारतेयस ते. "
" मडम तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला माहीती सांगा. " मी तीला परत सर्व माहीती सांगितली पण या वेळी माझं मन मला स्वस्थ बसु देईना. मी तिच्या आईची भेट घेण्याचं ठरवलं. पण विशेष गोष्ट म्हणजे हुशार आणि लोकप्रिय असलेल्या मृण्मयीचं घर मात्र कुणालाही ठावुक नव्हतं. मुलींच म्हणण होतं की तिने कधीही कुणाला तिच्या घराविषयी काही सुद्धा सांगितलं नव्हतं. शेवटी मी शाळेच्या रजिस्टर मधे तिचा पता शोधायला घेतला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. मृण्मयीच्या नावापुढे स्थानीक पालक म्हणुन दुसर्‍याच कुणाचं तरी नाव नोदवण्यात आलं होत. मला काहिच कळेना, मनु आपले वडिल वारले असं काय सांगतेय विचित्र प्रश्न काय विचारतेय. नुसता गोंधळ उडाला होता. त्या पत्त्यावर मी जाउन पोहोचले.

मोठं प्रशस्त घर होत. मी जाताच एक चाळिशीतले गृहस्थ माझ्यासमोर आले. त्यांच नाव ऐकल्यावर मला कळलं की मनुचे स्थानिक पालक ते हेच.

" नमस्कार तुमच्या मुलीची विज्ञान शिक्षिका. मला जरा तुम्हाला काहिसे प्रश्न विचारायचे होते. "
" मडम मी प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो की मनु माझी मुलगी आहे पण ती माझी मुलगी नाही.
गोधळलात ना. निट सांगतो म्हणजे कळेल. मनु माझ्या मित्राची मुलगी. माझ्या जिवलग मित्र अजय आणि त्याची बायको यांची एकच आवड होती ती म्हणजे समाज सेवा. आणि याच आवडीपायी बाळंतपण शहरात करायचे सोडुन ती दोघे एका खेड्यातील वृद्धाश्रमात गेले. अपुर्‍या वैद्यकीय सोयीमुळे मनुच्या जन्माच्या वेळी तिची आई हे जग सोडुन गेली, पुढे अजय तिला घेउन परत आला. आणि एकाच वर्षात तो सुद्धा गेला. दैवाचा खेळ बघा मरे पर्यंत समाजासाठी काम करणार्‍या अजय च्या मुलीसाठी कुणीही नातेवाईक पुढे न आल्याने शेवटी मी तिला घेउन आलो, मनुच्या नावापुढे मी अजयच नाव ठेवलं. मनुला मी घेउन आलो तेंव्हा ती एक वर्षाची होती आणि माझं लग्न सुद्धा झालं नव्हतं म्हणुन मी ऑफिसला जातांना मनुला बाजुच्या एका आश्रमात सोडुन जात असे. मनु आई बाबांप्रमाणे त्यांच्यात रमली. आजही ती घरात फक्त काही वेळच असते आणि इतर सर्व वेळ ती आश्रमातच असते. "

मनुचं मला कौतुक वाटल.

" पण मी तुमच्या कडे आले ते एका वेगळ्या संदर्भाने. मनु मला काहीसे विचित्र प्रश्न विचारत असते. एत्रदान, किडनीदान वैगरे.. "

" तुम्ही जरा माझ्या बरोबर चला.. म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. "

मी त्यांच्यामागुन निघाले. बाजुलाच एक आश्रम होता. तिथेच एका खोलीच्या दरवाज्याजवळ आम्ही दोघे थांबलो. खिडकीतुन आत डोकावले तर दिसले की मनु एका वृद्धेला मांडिवर घेउन काहीतरी समजावीत होती.

" आजी तु घाबरु नकोस अगं उलट तुला आनंद व्ह्यायला हवा, आज तुझ्या मुळे कुणाला तरी जीवन दान मिळणार आहे, तुला आठवतं की डॉक्टरांनी तुझ्या किडनीचं ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं होत ते ऑपरेशन यशस्वी झालंय आणि तुझी एक किडनी काढुन दान करण्यात आली. किडनी दान म्हणजे.... " मनु मी सांगितलेला एक एक शब्द बोलत होती,

" बघितलंत मडम, मागे असेच एकदा एका आजोबांचा एक डोळा अचानक निकामी झाला, तर मनुने त्यांना नेत्रदाना विषयी माहीती सांगितली आणि त्यांच्या दुःखावर एक फुंकर मारली, कारण गेलेला डोळा परत तर मिळणार नव्हताच उलट आपण कुणाच्या तरी कामी येउ शकलो अशी त्यांची भावना झाली आणि त्यांना परत त्यांच्या जिवनातला आनंद मिळाला. कदाचित मनुचं खोटं बोलण तुम्हाला खटकत असेल पण त्या बोलण्या मागे दुसर्‍यांना निखळ आनंद देण एवढा एकच उद्देश असतो. आपण अगदिच निकामी आहोत ही भावना त्यांच्या मनात निर्माणंच न होउ देण, मला वाटतं हेच खरं मनुच्या कामात फलीत. "

आतुन दोघींच्या हसण्याचा आवाज आला आणि माझ्या डोळे नकळत पाणावले, Covalent Bond चा खरा अर्थ मला समजत होता. आपल्या जीवनातील हिस्सा मनुने अशा प्रकारे दुसर्‍याबरोबर वाटुन घेउन जो बंध निर्माण केला होता तोच Covalent Bond

---------------- सुभाष डिके

No comments: