Tuesday, May 16, 2006

भारत पाकिस्तान - एक शीतयुद्ध

अलिकडेच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळुन आले आहे की काही दिवसांपुर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्या मधे अणुयुद्धासाठी जोरदार हालचाली सुरु होत्या. सादर आहे याच सर्व हालचालींचा लेखाजोखा खास बातमी दारांकडुन ...


पाकिस्तानी सैन्याने भारतावर अणुबॉम्ब टाकण्याचे ठरवले. यासाठी त्यांना त्यांच्या सरकारची परवानगीची गरज नाही, त्यामुळे लगेचच त्यांनी उलटगणतीला सुरुवात केली. इकडे भारतीय तंत्र सुधारलेले असल्यामुळे भारतीय सैन्याला आठ सेकंदाच्या आत पाकिस्तानच्या या हालचालीची माहीती मिळाली. भारतीय सैन्याने लगेचच उत्तरादाखल आपला अणुबॉम्ब टाकण्याची तयारी केली पण त्यांना यासाठी सरकारची परवानगी हवी असते त्यामुळे त्यांनी तशी परवानगी राष्ट्रपतींकडे मागितली. राष्ट्रपतींनी ती मागणी मंत्रिमंडळाच्या विचारार्थ पाठविली. त्यावर पंतप्रधानांनी संसदेच्या अधिवेशनाची घोषणा केली. ज्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरु झाले तेंव्हा वारंवार होणारे वॉक-आउट्स आणि विरोधी पक्षाने केलेला गदारोळ यामुळे संसद अनिश्चित कालासाठी स्थगित करण्यात आली. राष्ट्रपतींनी मात्र लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी सरकारला बजावले. तिकडे दरम्यानच्या काळात पाकिस्तानी सैन्याने तयारी करुन ठेवलेला अणुबॉम्ब तांत्रिक अडचणीमुळे त्यांना सोडता आला नाही. त्यांचे यासाठी प्रयत्न सुरुच राहीले..
इकडे भारतीय सरकार ज्या पक्षाच्या पाठींब्यावर होते त्यांनी बाहेरुन दिलेला पाठींबा काढुन घेतल्यामुळे अल्पमतात आले. राष्ट्रपतींनी त्यांना आठ दिवसांच्या आत विश्वासमत प्रस्ताव सिद्ध करण्यास सांगितले पण तसे न होउ शकल्यामुळे सरकार बरखास्त करण्यात आले व काळजी वाहू सरकारची स्थापना झाली. काळजीवाहू सरकारच्या पंतप्रधानांनी मात्र भारतीय सैन्याला अणुबॉम्ब साठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला. पण याला लगेचच निवडणुक आयोगाने निवडणुका जाहीर झालेल्या आहेत असे सांगत आक्षेप घेतला. त्याविरोधात मग एक जनहीत याचिका सुप्रिम कोर्टात दाखल करण्यात आली. सुप्रिम कोर्टाने मात्र काळजीवाहु सरकारला असा निर्णय घेता येत असल्याचा निर्णय दिला.


तिकडे पाकिस्तानी सैन्याचा एक प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी दुसरा प्रयत्न केला आणि यावेळी अणुबॉम्ब प्रक्षेपित करण्यात त्यांना यश मिळाले पण अंतराचा घोळ झाल्यामुळे सकाळी ११ वाजता त्यांच्याच देशातील एका सरकारी इमारतीवर त्याचा स्फोट झाला, सुदैवाने त्या वेळेपर्यंत कर्मचारी पोहोचले नसल्यामुळे कुठलीही जीवीत हानी झाली नाही !!. त्यांनी लगेचच पुढच्या प्रयत्नाची तयारी केली पण यावेळी नियोजीत वेळेच्या आधीच काही लष्करी अधिकाऱ्यांनी तो बॉम्ब दहशतवाद्यांना विकल्याचे त्यांच्या लक्षात आले, पुन्हा तयारी सुरु झाली त्यांच्या पुढच्या प्रयत्ना साठी., यावेळी त्यांनी मागच्या अनुभवावरुन शहाणपण शिकुन अमेरिका किंवा चीन यांच्याकडुन बॉम्ब आणि त्याचे तंत्र घेण्याचे ठरविले.


इकडे भारतात सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर लगेचच काळजीवाहु प्रधानमंत्र्यांनी सर्वपक्षीय सभा बोलावली आणि यावेळी बॉम्ब टाकण्याची परवानगी देण्यासाठी सर्वच पक्ष तयार झाले. पण सैन्यापर्यंत ती परवानगी पोहोचण्याच्या अगोदरच, मानवी हक्क आयोग आणि इतर संघटनांनी या निर्णयाचा विरोध करायला सुरुवात केली. मानवी साखळ्या आणि रास्ता रोको सारखे हातखंडे वापरुन हा विरोध सुरु होता. याच संदर्भात कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टन मधे 'Send this to every indian you know' असा विषय असणाऱ्या ई मेल ची चेन सुरु करुन विरोध प्रदर्शनाला सुरुवात केली.


तिकडे पाकिस्तानात त्यांच्या बॉम्बने बिघडण्याचे आपले काम सुरु ठेवले. त्यामुळे कधी वाळवंटात तर कधी अरबी समुद्रात जाउन त्यांचे बॉम्ब पडत असत. शेवटी त्यांनी अमेरिकेकडुन मिळालेला एक बॉम्ब पाठवण्याचे ठरवले, पण पाकिस्तानी सैन्य त्या बॉम्बचे तंत्र समजावुन घेण्यास असमर्थ असल्यामुळे त्यांनी तो आहे तसाच पाठवला. पण तो अमेरिकेने बनविलेला असल्यामुळे त्याचे मुळ लक्ष 'रशिया' होत्या त्याप्रमाणे तो भारताच्या दिशेने येण्या ऐवजी रशियाच्या दिशेने गेला. रशियन सैन्याला याची अगोदरच खबर लागल्यामुळे अर्ध्यावाटेतच निकामी करण्यात ते यशस्वी झाले. पण याला उत्तर म्हणुन त्यांनी आपल्याकडील काही क्षेपणास्त्र पाकिस्तानवर पाठवले. पाकिस्तानी सैन्याचे सगळे लक्ष भारतावर असल्यामुळे त्यांना हा प्रकार समजण्यास वेळ लागला आणि त्या बॉम्ब ने त्यांच्या राजधानीवर हमला चढवला, सर्वत्र गोंधळ माजला, पाकिस्तान ने लगेच आपल्यावर अन्याय झाला आहे अशी ओरड करुन जागतिक मदतीची मागणी केली.


भारताने यावर लगेचच आपले तीव्र दुःख व्यक्त करुन मदतीसाठी मिलियन डॉलर चे पारले जी बिस्किटे पाठवुन दिली..

अशा प्रकारे भारतीय सैन्याला कधीही परवानगी मिळाली नाही
आणि पाकिस्तानी सैन्याला कधीही व्यवस्थीत पणे आपले काम करता आले नाही.

And both lived happily everyafter!!!!
(इंटरनेट वरुन साभार)

No comments: