हरिश्चन्द्र गड, मी ट्रेक सुरु करण्याच्या अगोदर पासुन ज्या किल्ल्याविषयी अनेकदा ऐकले होते, तो हरिश्चन्द्र गड अनुभवण्याचा योग असा अचानक जुळुन येईल असे वाटले नव्हते.
हा ट्रेक पुर्ण दोन दिवसांचा असल्यामुळे खरं म्हणजे अजुन तीन चार साथीदार हवे होते, पण सर्वच जण आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे आम्हाला दोघांनाच जावे लागले. टोलार खिंडीपर्यंत पोहोचण्यासाठी असलेल्या घनदाट जंगलातुन चालायला लागल्या बरोबरच एकुणच या गडावर आपल्याला किती आनंद मिळणार आहे याची कल्पना येते. टोलार खिंडीनंतर येणारा Rock patch ही त्याचीच पुढची झलक, आणि तो पुर्ण केल्याबरोबर दिसणार गड अप्रतीम, गडाच्या मुख्या भागात पोहोचण्या अगोदरच तुम्ही त्याच्या प्रेमात पडु लागता. पुढे अत्यंत सुंदर असे हरिहरेश्वराचे मंदीर, आणि बाहेर असलेले पुष्करणी तिर्थ या सर्वांचं दर्शन डोळ्यांच पारण फेडणारं, थोडसं पुढे उतरुन गेलं की केदारेश्वराचं प्रचंड मोठे शिवलिंग, आणी त्याची पाण्यात दिसणारी प्रतीमा याचं तर शब्दात वर्णन अशक्य. स्वतः ला विसरायला लावण्याचं कसब त्या परिसरात नक्कीच आहे.
हरिश्चंद्र गडाचा सर्वात भावनारा भाग म्हणजे कोकण कडा, त्या कड्यावर पोहोचे पर्यंत काहीही जाणवले नाही, आणि कड्यावर पोहोचताच ते दृश्य बघुन मी हरखुनच गेलो. अंगावर सरसरुन काटा येणे म्हणजे नेमके काय याचा मी प्रत्यक्षात अनुभव तिथेच घेतला. त्या कड्यावरुन दिसणार्या दृश्यावरुन नजर हटत नव्हती. संध्याकाळच्या वेळेला कातरवेळ म्हणतात, त्याच वेळेत मनाची अस्वथता वाढते, पण अशाच त्या संध्याकाळी देहभान हरपवुन आम्ही सुर्यास्त बघितला. सुर्याने दिलेला अनुभव कमी होता की काय म्हणुन तो गेल्याबरोबर चंद्राने आपलं अस्तित्व दाखवुन द्यायला सुरुवात केली. पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात उजळलेला कोकणकडा काय दिसतो ते खरच तिथे गेल्याशिवाय कळणे अशक्य. हरिश्चंद्र गडावर काढलेले ते ३० तास या गडाला ट्रेक ची पंढरी का म्हणतात हे सांगुन गेले, अविस्मरणिय अशा आठवणी मागे ठेवुन, आणि वारकर्याप्रमाणे पुढच्या वारीची ओढ लावुन हा ट्रेक संपला.
आता वाट बघतोय पुढच्या वेळी कधी जायला मिळेल याची..
No comments:
Post a Comment