Wednesday, May 24, 2006

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो

संदिप खरेच्या अनेक आवडत्या कवितांपैकी मला आवडलेली एक कविता

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो

मी जुनाट दारावरी किरकिरा बंदी
तो सताड उघड्या खिडक्यापरी स्वच्छंदी
मी बिजागरीशी जीव गांजवीत बसतो
तो लांघुन चौकट पार निघाया बसतो

डोळ्यात माझीया सुर्याहुन संताप
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते
घडवुन दागिने सुर्यफुलापरी झुलतो

मी पायी रुतल्या काचावरी चिडतो
तो त्याच घेउनी नक्षी मांडुनी बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो

मी आस्तिक मोजत पुण्याची खोली
नवसांची ठेउनी लाच लावितो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन साऱ्या
अन धन्यवाद देवाचे घेउन जातो

मज अध्यात्माचा रोज नवा श्रृंगार
लपतो ना परि चेहरा आत भेसुर
तो फक्त ओढतो शाल नभाची तरिही
त्या श्याम निळ्याच्या मोरपिसापरी दिसतो.

--- संदिप खरे..

Tuesday, May 23, 2006

हरिश्चन्द्र गड,

हरिश्चन्द्र गड, मी ट्रेक सुरु करण्याच्या अगोदर पासुन ज्या किल्ल्याविषयी अनेकदा ऐकले होते, तो हरिश्चन्द्र गड अनुभवण्याचा योग असा अचानक जुळुन येईल असे वाटले नव्हते.

हा ट्रेक पुर्ण दोन दिवसांचा असल्यामुळे खरं म्हणजे अजुन तीन चार साथीदार हवे होते, पण सर्वच जण आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे आम्हाला दोघांनाच जावे लागले. टोलार खिंडीपर्यंत पोहोचण्यासाठी असलेल्या घनदाट जंगलातुन चालायला लागल्या बरोबरच एकुणच या गडावर आपल्याला किती आनंद मिळणार आहे याची कल्पना येते. टोलार खिंडीनंतर येणारा Rock patch ही त्याचीच पुढची झलक, आणि तो पुर्ण केल्याबरोबर दिसणार गड अप्रतीम, गडाच्या मुख्या भागात पोहोचण्या अगोदरच तुम्ही त्याच्या प्रेमात पडु लागता. पुढे अत्यंत सुंदर असे हरिहरेश्वराचे मंदीर, आणि बाहेर असलेले पुष्करणी तिर्थ या सर्वांचं दर्शन डोळ्यांच पारण फेडणारं, थोडसं पुढे उतरुन गेलं की केदारेश्वराचं प्रचंड मोठे शिवलिंग, आणी त्याची पाण्यात दिसणारी प्रतीमा याचं तर शब्दात वर्णन अशक्य. स्वतः ला विसरायला लावण्याचं कसब त्या परिसरात नक्कीच आहे.

हरिश्चंद्र गडाचा सर्वात भावनारा भाग म्हणजे कोकण कडा, त्या कड्यावर पोहोचे पर्यंत काहीही जाणवले नाही, आणि कड्यावर पोहोचताच ते दृश्य बघुन मी हरखुनच गेलो. अंगावर सरसरुन काटा येणे म्हणजे नेमके काय याचा मी प्रत्यक्षात अनुभव तिथेच घेतला. त्या कड्यावरुन दिसणार्‍या दृश्यावरुन नजर हटत नव्हती. संध्याकाळच्या वेळेला कातरवेळ म्हणतात, त्याच वेळेत मनाची अस्वथता वाढते, पण अशाच त्या संध्याकाळी देहभान हरपवुन आम्ही सुर्यास्त बघितला. सुर्याने दिलेला अनुभव कमी होता की काय म्हणुन तो गेल्याबरोबर चंद्राने आपलं अस्तित्व दाखवुन द्यायला सुरुवात केली. पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात उजळलेला कोकणकडा काय दिसतो ते खरच तिथे गेल्याशिवाय कळणे अशक्य. हरिश्चंद्र गडावर काढलेले ते ३० तास या गडाला ट्रेक ची पंढरी का म्हणतात हे सांगुन गेले, अविस्मरणिय अशा आठवणी मागे ठेवुन, आणि वारकर्‍याप्रमाणे पुढच्या वारीची ओढ लावुन हा ट्रेक संपला.

आता वाट बघतोय पुढच्या वेळी कधी जायला मिळेल याची..

Tuesday, May 16, 2006

भारत पाकिस्तान - एक शीतयुद्ध

अलिकडेच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळुन आले आहे की काही दिवसांपुर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्या मधे अणुयुद्धासाठी जोरदार हालचाली सुरु होत्या. सादर आहे याच सर्व हालचालींचा लेखाजोखा खास बातमी दारांकडुन ...


पाकिस्तानी सैन्याने भारतावर अणुबॉम्ब टाकण्याचे ठरवले. यासाठी त्यांना त्यांच्या सरकारची परवानगीची गरज नाही, त्यामुळे लगेचच त्यांनी उलटगणतीला सुरुवात केली. इकडे भारतीय तंत्र सुधारलेले असल्यामुळे भारतीय सैन्याला आठ सेकंदाच्या आत पाकिस्तानच्या या हालचालीची माहीती मिळाली. भारतीय सैन्याने लगेचच उत्तरादाखल आपला अणुबॉम्ब टाकण्याची तयारी केली पण त्यांना यासाठी सरकारची परवानगी हवी असते त्यामुळे त्यांनी तशी परवानगी राष्ट्रपतींकडे मागितली. राष्ट्रपतींनी ती मागणी मंत्रिमंडळाच्या विचारार्थ पाठविली. त्यावर पंतप्रधानांनी संसदेच्या अधिवेशनाची घोषणा केली. ज्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरु झाले तेंव्हा वारंवार होणारे वॉक-आउट्स आणि विरोधी पक्षाने केलेला गदारोळ यामुळे संसद अनिश्चित कालासाठी स्थगित करण्यात आली. राष्ट्रपतींनी मात्र लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी सरकारला बजावले. तिकडे दरम्यानच्या काळात पाकिस्तानी सैन्याने तयारी करुन ठेवलेला अणुबॉम्ब तांत्रिक अडचणीमुळे त्यांना सोडता आला नाही. त्यांचे यासाठी प्रयत्न सुरुच राहीले..
इकडे भारतीय सरकार ज्या पक्षाच्या पाठींब्यावर होते त्यांनी बाहेरुन दिलेला पाठींबा काढुन घेतल्यामुळे अल्पमतात आले. राष्ट्रपतींनी त्यांना आठ दिवसांच्या आत विश्वासमत प्रस्ताव सिद्ध करण्यास सांगितले पण तसे न होउ शकल्यामुळे सरकार बरखास्त करण्यात आले व काळजी वाहू सरकारची स्थापना झाली. काळजीवाहू सरकारच्या पंतप्रधानांनी मात्र भारतीय सैन्याला अणुबॉम्ब साठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला. पण याला लगेचच निवडणुक आयोगाने निवडणुका जाहीर झालेल्या आहेत असे सांगत आक्षेप घेतला. त्याविरोधात मग एक जनहीत याचिका सुप्रिम कोर्टात दाखल करण्यात आली. सुप्रिम कोर्टाने मात्र काळजीवाहु सरकारला असा निर्णय घेता येत असल्याचा निर्णय दिला.


तिकडे पाकिस्तानी सैन्याचा एक प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी दुसरा प्रयत्न केला आणि यावेळी अणुबॉम्ब प्रक्षेपित करण्यात त्यांना यश मिळाले पण अंतराचा घोळ झाल्यामुळे सकाळी ११ वाजता त्यांच्याच देशातील एका सरकारी इमारतीवर त्याचा स्फोट झाला, सुदैवाने त्या वेळेपर्यंत कर्मचारी पोहोचले नसल्यामुळे कुठलीही जीवीत हानी झाली नाही !!. त्यांनी लगेचच पुढच्या प्रयत्नाची तयारी केली पण यावेळी नियोजीत वेळेच्या आधीच काही लष्करी अधिकाऱ्यांनी तो बॉम्ब दहशतवाद्यांना विकल्याचे त्यांच्या लक्षात आले, पुन्हा तयारी सुरु झाली त्यांच्या पुढच्या प्रयत्ना साठी., यावेळी त्यांनी मागच्या अनुभवावरुन शहाणपण शिकुन अमेरिका किंवा चीन यांच्याकडुन बॉम्ब आणि त्याचे तंत्र घेण्याचे ठरविले.


इकडे भारतात सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर लगेचच काळजीवाहु प्रधानमंत्र्यांनी सर्वपक्षीय सभा बोलावली आणि यावेळी बॉम्ब टाकण्याची परवानगी देण्यासाठी सर्वच पक्ष तयार झाले. पण सैन्यापर्यंत ती परवानगी पोहोचण्याच्या अगोदरच, मानवी हक्क आयोग आणि इतर संघटनांनी या निर्णयाचा विरोध करायला सुरुवात केली. मानवी साखळ्या आणि रास्ता रोको सारखे हातखंडे वापरुन हा विरोध सुरु होता. याच संदर्भात कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टन मधे 'Send this to every indian you know' असा विषय असणाऱ्या ई मेल ची चेन सुरु करुन विरोध प्रदर्शनाला सुरुवात केली.


तिकडे पाकिस्तानात त्यांच्या बॉम्बने बिघडण्याचे आपले काम सुरु ठेवले. त्यामुळे कधी वाळवंटात तर कधी अरबी समुद्रात जाउन त्यांचे बॉम्ब पडत असत. शेवटी त्यांनी अमेरिकेकडुन मिळालेला एक बॉम्ब पाठवण्याचे ठरवले, पण पाकिस्तानी सैन्य त्या बॉम्बचे तंत्र समजावुन घेण्यास असमर्थ असल्यामुळे त्यांनी तो आहे तसाच पाठवला. पण तो अमेरिकेने बनविलेला असल्यामुळे त्याचे मुळ लक्ष 'रशिया' होत्या त्याप्रमाणे तो भारताच्या दिशेने येण्या ऐवजी रशियाच्या दिशेने गेला. रशियन सैन्याला याची अगोदरच खबर लागल्यामुळे अर्ध्यावाटेतच निकामी करण्यात ते यशस्वी झाले. पण याला उत्तर म्हणुन त्यांनी आपल्याकडील काही क्षेपणास्त्र पाकिस्तानवर पाठवले. पाकिस्तानी सैन्याचे सगळे लक्ष भारतावर असल्यामुळे त्यांना हा प्रकार समजण्यास वेळ लागला आणि त्या बॉम्ब ने त्यांच्या राजधानीवर हमला चढवला, सर्वत्र गोंधळ माजला, पाकिस्तान ने लगेच आपल्यावर अन्याय झाला आहे अशी ओरड करुन जागतिक मदतीची मागणी केली.


भारताने यावर लगेचच आपले तीव्र दुःख व्यक्त करुन मदतीसाठी मिलियन डॉलर चे पारले जी बिस्किटे पाठवुन दिली..

अशा प्रकारे भारतीय सैन्याला कधीही परवानगी मिळाली नाही
आणि पाकिस्तानी सैन्याला कधीही व्यवस्थीत पणे आपले काम करता आले नाही.

And both lived happily everyafter!!!!
(इंटरनेट वरुन साभार)

Thursday, May 11, 2006

ते आत्ताच करा...

प्रभाव


इ मेल वरुन कधी कधी आपल्याला खुप चांगलं असं काहीतरी मिळुन जातं, असंच काहीतरी... ज्यांचा आपल्यावर नकळत प्रभाव पडुन जातो...

Wednesday, May 10, 2006

निर्णय

निर्णय

एका शहरात राहणार्‍या 'तो' आणि 'ती' यांची हि गोष्ट आहे. खुपच कोवळ वय होतं त्यावेळी दोघांच ज्यावेळी त्याने तिला प्रपोझ केलं तेंव्हा. ती अकरावी मधे आणि तो बारावीत. खरं म्हणजे त्यावेळी त्याने केवळ आकर्षणातुन आणि त्या वयात उमलणार्‍या भावनांना प्रेम समजुन तिला प्रपोझ केलं आणि तिची सुद्धा परिस्थीती काही वेगळी नव्हती. पण तरीही तिचा होकार त्या दोघांना एका अनामीक पण गोड बंधनात बांधण्यासाठी पुरेसा होता. मात्र लवकरच कॉलेजला सुट्ट्या लागल्या आणि होकारांनंतर पुढे भेटीगाठी वाढण्या अगोदरच त्यांचा भेटण्याचा मार्ग बंद झाला. त्या पुर्वी ते केवळ दोन तीन वेळाच भेटले होते. सुट्टित भेटण्यासाठी त्या दोघांनीही प्रयत्न केले पण दोघांच्या घरच्या परिस्थी नुसार त्यांना भेटणे शक्यच नव्हते, मग त्यांना एक आधार मिळाला तो म्हणजे फोन चा. घरच्यांची नजर चुकवुन दोघे बर्‍याच वेळी फोन वरुन एकमेकांशी संपर्क साधत असत, अर्थात तो ही खुप कमी वेळेला पण अगदीच न भेटण्यापेक्षा त्यांना तेवढे बोलणे पुरेसे होते. आणि एकाच शहरात असल्यामुळे बर्‍याच सार्वजनीक ठिकाणी त्यांची भेट घडायची, अर्थात ही भेट सुद्धा केवळ नजरेचीच असायची कारण तिच्या बरोबर किंव्हा त्याच्या बरोबर नेहमी कुणितरी असायचेच.

बारावीच्या निकाला नंतर त्याने इंजिनियरींग ला प्रवेश घेतला आणि त्यासाठी तो दुसर्‍या शहरात गेला, आणि इथुन खरी सुरुवात झाली त्यांच्या प्रेमाच्या परिपक्वतेला. कोवळ्या वयात सुरु झालेल प्रेम कुठवर जाईल याची त्या दोघांनाही कल्पना नव्हती पण तो दुसर्‍या शहरात जाताच दोघांनाही आपल्या मधे निर्माण झालेल्या एक नाजुक बंधंनाची जाणिव झाली. पहिले दोन महीने त्या दोघांना एकमेकांना पाहणे अशक्य झाले होते आणि फोन वरुन सुद्ध संपर्क झाला नव्हता. आणि याच काळात त्या दोघांना प्रेमाचा खरा अर्थ, ती हुरहुर, ती हरवुन जाण्याची लक्षणं या सगळ्या सगळ्यांचा अनुभव येत होता. आणि एक दिवस त्याने तिला फोन केला त्यावेळी दोघेही निशब्द झाले होते, खरं म्हणजे काय बोलावं ते ही सुचत नव्हतं, आणि आपल्याला नेमकं काय होतय ते सुद्धा कळत नव्हत.बर्‍यच वेळ निशब्द संवाद झाल्यानंतर त्या दोघांनाही कंठ फुटला आणी मग बराच वेळ ते बोलत राहीले, आता दोघांना एकमेकांची नविन ओळख होत होति. जस जसे दिवस पुढे जावु लागले तस तसे ते एकमेकात गुंतत गेले, खरं म्हणजे इतरांच्या बातीत जे खुप अगोदर होतं ते या दोघांच्या बाबतीत नंतर होत होतं. तिला त्याची पुर्ण ओळख पटु लागली होती. कॉलेज ला असतांना न चुकता दिवसातुन किमान एकदा त्यांच फोन वरुन बोलण होत असे, आणि तो सुट्टीला घरी आला की पुन्हा नजर भेट (!). चोरुन भेटण्यात किंवा बोलण्यात असलेला निराळाच आनंद त्यांना मिळत होता. आता कधीतरी वेळ साधुन ती तिच्या मैत्रीणी सोबत किंवा कुठलेही कारण साधुन त्याच्या घरी येत असे, उद्देश एकच त्याला डोळे भरुन पहावे बस्स. वेगवेगळ्या प्रसंगातुन त्या दोघांच्या मनाचे भावबंध उघडत होते.

एव्हाना त्या दोघांचे नात खुप दृढ झाले होते, आणि त्यांच्या या प्रवासाला तीन वर्षे पुर्ण झाली होती. त्याचा जबरदस्त आत्मविश्वास, त्याची philosophy , त्याचे प्रेमाबद्दलचे विचार, त्याची देवावरील श्रद्धा य सगळ्या बद्दलचे विचार या सगळ्या सागळ्या गोष्टी तिला त्याच्या प्रेमात हरखुन जाण्यास भाग पाडत होत्या. तर तिची कष्ट करण्याची तयारी, प्रत्येक वळणावर आपल्याला साथ देण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टी त्याला भावत होत्या. या दोघांच्या प्रेमाची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तीन चार वर्षांच्या कालावधीत ते एकमेकांना समोरासमोर केवळ पाच सात वेळा केवळ भेटले असतील, आणि प्रत्येक भेट केवळ तीन चार मिनिटांची. एवढ्याच अवधीत ते प्रेमाच्या एका वेगळ्या पातळीवर येउन पोहोचले होते. म्हणजे एक गोष्ट नक्की झाली होती की त्या दोघांचे प्रेम केवळ शारीरीक आकर्षणातुन आलेले नव्हते, तर ते एका वरच्या पातळीवर होते. एखाद्या व्यक्ती वर भान हरपुन प्रेम करणे म्हणजे काय असते हे त्या दोघांकडे पाहुन कळत असे. आणि दोघेहि एकमेकांच्या भावना जपत, एकमेकांच्या परिवारा विषयी काळजी घेत आपल्या जीवनाला आकार देत होते. त्यांच्या एकमेकांना जास्त न भेटण्याचं कारण कुणाची भिती वाटणे हे नव्हते, तर दोघांना ही आपल्या मुळे दुसर्‍याला घरी त्रास होउ नये असे वाटत होते, एकमेकांच्या याच प्रेमापोटी खुप इच्छा असुनही त्यांच्या भेटी खुपच मर्यादीत होत्या. पण त्यांच्या फोन वरुन \nबोलण्यामधे जास्त सुरक्षीतता असल्यामुळे फोन हेच दोघांच्या भावना पोचविण्याचं साधन बनलं होतं. एखादा दिवस त्याच्याशी बोलणं झाला नाही की तिच मन सैरभैर होत असे आणि त्याचं सुद्धा कशातच लक्ष लागत नसे. अगदी सकाळी उठल्यापासुनची दिनचर्या दोघं एकमेकांना सांगत असतं. एकमेकांविषयीची काळजी मागे सोडत हे संभाषण संपत असे. दोघांचे विचार तर एवढे जुळत होते की ते प्रेमात पडले याचं कुणालाच नवल वाटु नयेत. एकमेकांच्या झालेल्या चुका दाखविण्यात आणि त्याबद्दल माफी मागण्यात सुद्धा ते मागे नव्हते. तासनतास बोलण्यासारख प्रेमी जणांकडे असतच काय असा प्रश्न त्यांना पुर्वी पडत होता पण आता त्याचं उत्तर त्यांना स्वतः च्या उदाहरणावरुन मिळत होते. बोलण्यासाठी किंबहुना विषयाची गरजच पडत नसे, कुठल्याही विषयावर हे बोलणे सुरु राही, मग त्यात \'जेवण झालं का\' या साध्या प्रश्नावरुन थेट \'तुला माझी आठवण येते का\' या प्रश्नापर्यंतचा रंजक प्रवास असायचा. \'फोन\' च्या शोधाबद्दल प्रेमात पडलेल्यांनी दिलेल्या अनेक अनेक धन्यवादामुळे ग्राहम बेल नक्कीच स्वर्गात गेला असेल. प्रेम तर कुठही बघायला मिळत पण प्रेमाचा हा वेगळा अविष्कार दुर्मिळ असतो. खुप खुप वरच्या पातळीवरील प्रेम, ज्यामधे शरिराबद्दलच विचारही नसतो, आणि एकमेकांवर असते ते श्रद्धा, निखळ आणि पवित्र प्रेम. एखाद्या मंदिरात गेल्यावर आपल्याला तेथील वातावरणातुन एक वेगळीच अनुभुती जाणवते, मन अगदी हलक होउन शांत होत जात थेट तसाच अनुभव ते दोघे जगत होते. समाधीच्या अवस्थे नंतर चेहर्‍या वर एक प्रकारचं मंद स्मित फुलते, त्याचा उगम सामन्याला कधीच कळत नाही, मात्र ज्याच्या चेहर्‍यावर ते स्मित झळकत असते तो अनामिक शांतीचा अनुभव घेत असतो, त्याचा परिस्थीतितुन हे दोघे जात होते.


पुढच्या वर्षी त्याचे कॉलेज संपले आणी लगेचच त्याला एका मोठ्या कंपनी मधे नोकरी सुद्धा मिळाली. तो दिवस त्या दोघांसाठी अवर्णीय असा आनंद देणारा होता. आता लवकरच त्या दोघांचे ऐक्य शक्य होते, खरं म्हणजे त्यांचे मानसीक ऐक्य खुप पुर्वीच झाले होते पण तरीही त्याला समाज मान्यता मिळण्याची गरज होती. नोकरी निमीत्त त्याला आणखी एका दुरवरच्या शहरात जावे लागणार होते म्हणुन खरं म्हणजे दोघांनाही वाईट वाटत होते पण तरीही भविष्यातील सुखद काळ आता त्या दोघांनाही खुणावु लागला होता. गेल्या पाच वर्षापासुन दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रेमाला आता एक नवे वळण लवकरच लगण्याची शक्यता होती. त्याने नवीन शहरात जाउन जम बसवला, आणि या दरम्यान तिच्याशी न चुकता बोलणे सुरु होतेच. आताशा बोलण्याचा विषय थोडासा पुढे गेला होता आणि तो लग्ना पर्यंत येउन पोहोचला होता. बोलण्यातुन त्या दोघांनी एकमेकांना आपापल्या घरतील लोकांची त्यांच्या जीवनसाथीदाराबद्दालची कल्पना सांगितली. आणि दोघांनाही आपला जोडीदार या अपेक्षांवर पुर्ण उतरेल याची खात्री होती. पुढे येउ घातलेल्या सहजीवनांच्या कल्पना रंगवत त्यांचे दिवस जात होते, एकमेकांच्या आवडीनिवडी जपत आपण कसा संसार करु याची ती दोघे उजळणी करत असतं. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी आपपल्या होणार्‍या बाळांची नावे सुद्ध ठरवुन ठेवली होती. एकदा सहज म्हणुन त्याने दोघांची कुंडली परिसरातील एका ज्ञानी व्यक्ती कडे पाठवुन बघितली आणी त्याचे उत्तर मिळाले तेंव्हा तर त्या दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला कारण त्याच्या नुसार दोघांचे ३६ पैकी ३३ गुण जुळत होते, आपण खरोखरच Made for each other आहोत याच्या त्या गोष्टीमुळे शिक्कमोर्तब झाले.

मधल्या काळात तिचे लग्नाचे वय झाल्यामुळे तिच्या घरी स्थळ येण्यासाठी सुरुवात झाली होती, पण मला पुढे शिकायचे आहे या सबबी खाली तिणे या सर्व मुलांना टाळले होते आणी एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिच्या आई बाबांनी सुद्धा तिच्या इछेपुढे जास्त जोर दिला नव्हता. \n\n\n \nपण एकदा मात्र एक खुप चांगल स्थळ तिच्या साठी आलं होतं आणी कुठल्याही उपवर मुलीच्या आई वडिलांनी केला असता तो विचार त्यांनी सुद्धा केला. पण ती ने तो विचार ठाम नकार देउन परतवुन लावला पण या प्रसंगानंतर आता आपल्याला जास्त दिवस असा विरोध करत राहता येणार नाही असं तिच्या लक्षात आलं आणि म्हणुन एक दिवस तिने त्याच्या शी बोलतांना हा विषय काढला.

"अरे, मला वाटतं आता आपण घरी सांगुन टाकायला हवं, कारण आता फार दिवस मी आलेली स्थळं परतवु शकणार नाही."

"अगं तशी माझी काहिच हरकत नाही पण माझ्या नोकरीत अजुन माझे Confirmation आले नाही आणि confirmation च्या अगोदर पासुनच मी लग्नाचा विचार करण थोडसं बरोबर वाटत नाही .."

"अरे येइलच ना तुझ confirmation लवकरच आणि हवं तर सध्या फक्त सांगुन ठेउ घरी, आणि मग confirmation नंतर लग्नाचा विचार करता येईल"

"चालेल, मग मी आजच आईला सांगतो, "

"आणि मी माझ्या आईला, पण ठावुक आहे ना रे कसं सांगायचं ठरलं आहे ते.."

"हो गं, मी तसचं सांगणार आहे.."

या निरागस प्रेमाचा एक निर्णायक टप्पा आला होता, आणि आता या क्षणी कुठलीही चुक होउ नये याची त्यांनी खबरदारी घेतली होती. तसे दोघेही आपपल्या घरी लाडके होते, पण तरीही त्यांच्या प्रेम विवाहाला कितपत पाठींबा मिळेल या बद्दल त्यांच्या मनात थोडीशी शंका होती. आणि म्हणुनच त्यांनी एक उपाय योजला होता, तो म्हणजे घरी प्रेम विवाह करायचा आहे हे सांगायचेच नाही, तर रितसर एखाद्या व्यक्ती मार्फत त्याच्यासाठी त्याच्या घरी बोलणी सुरु करयाची, त्याचाच पुढचा टप्पा म्हणुन तो कांदेपोहे कार्यक्रम तिच्या घरी जावुन करणार आणि सगळा काही normal आहे असं भासवत लग्न करणार असा plan त्यांनी आखुन ठेवला होता. दोघांची जात एकच असल्यामुळे आणी दोघांच्याही घरात लग्नासाठी तयारी सुरु असल्यामुळे यात काही problem येईल असे वाटत नव्हते. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी कांदेपोहे कार्यक्रमाची रंगीत तालीम सुद्धा केली होती, म्हणजे तो काय प्रश्न विचारणार, त्यावर तीने काय उत्तर द्यायची वैगरे सगळ काही Fixed होतं, Arranged Love Marriage करायला निघाले होते ती दोघे. या साठी ती आपल्या एका मावशीला विश्वासात घेउन सांगणार होती. तिने एक दिवस त्या मावशीला सगळा प्रकार सांगितला आणि मदत करण्याची विनंती केली. त्या मावशीनेही जास्त आढेवेढे न घेता लगेचच तिच्या आई कडे जावुन तिच्या साठी एक योग्य स्थळ आहे असं सांगुन त्याच्या घराविषयी माहीती सांगितली. तिच्या बाबांनी मुलाविषयी आणि त्याच्या घराविषयी जास्त माहीती काढली आणी सारे काही व्यवस्थीत आहे याची खात्री पटताच त्यांनी त्याच्या घरी जाउन बोलणी करण्यास तयारी दाखविली. हे सगळ ऐकताच तिला कधी हे सगळं त्याला सांगते असं झालं होतं. त्या रात्री त्या दोघांनाही झोप आली नव्हती, आपल्या पाच वर्षाच्या प्रेमाची एक प्रकारे पुर्तता होणार असे त्या दोघांना वाटत होते.

तो सुट्टी घेउन आपल्या घरी आला होता आणी जणु काही घडलेच नाही अशा अविर्भावात वावरत होता पण आतुन परमानंद झाला होता. आता कुठल्याही क्षणी तिकडुन निरोप येईल आणी मग \'कांदापोहे\'. एक दिवस तिचे काका त्यांच्या घरी आले आणी त्याच्या आई बाबांशी बोलुन निघुन गेले. मोठ्या उत्सुकतेने त्याने घरात पाउल ठेवले आणि आई च्या उद्गाराने ते पाउल जागीच अडखळले. आई बाबांना सांगात होती "त्या घरातील मुलगी आपली सुन म्हणुन आपल्या घरात येउ शकत नाही!!".. हे सगळे त्याला अनपेक्षीतच होते. दोन क्षण त्याला काहीच कळेना. थोड्या वेळानंतर घरात कुणिच बोलत नाही हे बघुन नाईलाजाने त्यानेच विषय काढला,

"आई, ते काका कशाला गं आले होते "

"तुझ्यासाठी एक स्थळ आणलं होतं त्यांनी ", "असं, कुठलं बरं.. ? "

"\'ती\' "

"मग काय सांगितलस तु त्यांना " \n"काय सांगायचं, तसं अजुन सांगितलं नाही काही, पण नाही म्हणुन सांगणार आहे "

"का?, मुलगी बघण्याच्या अगोदरच नाही, ते का बरं..:"

"त्यांच्या घरातील मुलगी आपल्या घरात सुन म्हणुन नको आणि का ते विचारु नकोस "

"अगं पण असा काय problem आहे काय हरकत आहे ते सांगशील की नाही "

"हे बघ तु हा प्रश्न विचारु नकोस, त्याच्या मागे खुप मोठं कारण आहे असं समज, आणि हा विषय इथेच संपव "

"पण जर मी असं म्हणालो की मला तिच्याशीच लग्न करायचे तर ??"

"तर तुला हा आग्रह सोडावा लागेल, माझी तुझ्या लग्नाला किंबहुना प्रेम विवाहाला सुद्धा परवानगी आहे, पण त्या मुलीसोबत शक्यच नाही "

"हे बरं आहे तुझं, म्हणे प्रेम विवाहाला परवानगी आहे पण फक्त त्याच मुली सोबत नको, असं काय घोडं मारलय तिने तुमचं "

"माझ्या नकारामागे काही तरी विशेष कारण असेल एवढं समजुन घेशील अशी मला अपेक्षा आहे. " आई चा आवाज खुप हळवा झाला होता..

त्यानंतर त्याने खुप वेळ आई बाबांशी वाद घातला, पण ते दोघेही आपल्या मतावर ठाम होते, आणि ते कारण सांगायला सुद्धा तयार नव्हते. त्याच्या मनात विचारचक्र सुरु झाले. .... असं का करावं आईने आणि बाबांनी... त्याचं त्याच्या कुटुंबियांवर खुप प्रेम होतं आणि त्यांच सुद्धा, त्यांचा एक मोठा परिवार होता, आणि सर्व लोक त्यांना एकमेकांना जपणारी माणसं असेच ओळखत होते.... आई बाबांचे विचार फार मागासलेल नव्हते आणि दोघांनी प्रत्येक वेळि आपल्या मनाचा मोठेपणा दाखवुन दिला होता मग आजच असं का बरं व्हावं... ज्या अर्थी ते एवढ्या मनापासुन सांगत आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल..... , पण म्हणुन काय मी तिला नकार देउ, शक्यच नाही, ....... कदाचीत तिच्या घरातील वातावरण, त्यावर तर काही आक्षेप नसेल ना...... असेल काहीही कारण पण गेल्या पाच वर्षांपासुन मी तिला ओळखतो, न पाहता नकार द्यावा असं तिच्यात नक्कीच काही नव्हतं..........., मग काही घरगुती कारण असेल किंवा इतर काही.... पण कुठलही कारण असेल तरी मझ लग्न तिच्याशी आणि फक्त तिच्याशीच होईल, ..... पण परवानगी तर मिळत नाही मग...... काय करायचं...पळुन जायचं घरातुन....

या विचारावर त्याचं मन येउन थांबलं..... बराच साधक बाधक विचार करुन त्याने आपण घरुन पळुन जावुन लग्न करु शकतो असा विचार केला.... पण तरीही कुठेतरी काहीतरी चुकत होते खास.... त्याचं मन कमालीच अस्थीर झाला होतां.,.. काय होत होतं त्याला कळत नव्हतं.,... पण मनात अनेक विचार ढवळुन निघत होते...

थोड्यावेळातच फोन च्या रिंग ने तो भानावर आला.. हा नक्की तिचाच फोन, त्याने विचार केला... काय सांगणार आपण तिला, कसं सांगणार, पुढे काय करायचं असा प्रश्न तिने विचारल्यावर काय उत्तर देणार मी.....

"हॅलो, "

"मी बोलतेय.."

"... बोल " त्याच्या तोंडुन शब्द फुटत नव्हता..

".. अरे काय झालं.. "

"तु मला भेटु शकतेस का आत्ता "..

"आत्ता, बघते प्रयत्न करुन, पन काय झालं सांगशिल की नाही.."

"ते भेटल्यावरच सांगेन पण लवकरात लवकर \'तिथे\' ये "...

थोड्याच वेळात ते दोघेही त्या ठिकाणी आले.. तिने आल्याबरोबर त्याच्या चेहर्‍याकडे बघुन काय झालं असवं ते ओळखले, त्याला काय बोलावं ते सुचत नव्हत, आणी डोळे भरुन आले होते,.. तिच्या ह्रदयाची धड धड वाढली होती, कुठल्याश्या अनामीक शंकेने तिचे मन ग्रासले गेले..

"अरे, काय झालं "

"......"

"बोल ना काय झालं., लवकर सांग ना रे,.. "

त्याने उत्तरादाखल फक्त मान हलवली...आणि ती त्याच्या कुशीत शिरली...

"नीट सांगशील काय झालं.."

"आई ने नकार दिला "

"पण का ते कळु शकेल, माझ्यात अशी कुठली कमी आहे की आईंनी न बघताच नकार दिला "

"तोच तर प्रॉब्लेम आहे ना.. आई काहिच सांगायला तयार नाही.."

तिच्या डोळ्यातुन धारा यायला सुरुवात झाली, बराच वेळ त्या दोघांची अवस्था तशीच राहीली.. भानावर येत तिने निर्धाराने प्रश्न केला

"मग आता काय विचार केलायस तु... "

"माझ मन खुप अशांत आहे गं, मी खुप विचार केला, आणि आपण पळुन जाण्यावाचुन गत्यंतर नाही, असं माझं मत झालं., तुला काय वाटते.."

"पळुन जावुन लग्न... " तिला हे अगदीच अनपेक्षीत नव्हते, तरीही तिला आश्चर्याचा धक्का बसलाच..

"काय गं काय झालं माझ्यावर विश्वास नाही का.."

"तसं नाही रे माझा तुझ्यावर आणि तुझ्या कर्तुत्वावर पुर्ण विश्वास आहे पण..."

"पण काय .."

"विचार करावा लागेल रे, खरं म्हणजे आपण या पुर्वी अनेकदा बोललो आहे तुला आठवतं ते... " तिने बोलायला सुरुवात केली..

"अरे पळुन जावुन लग्न करायला माझी काही सुद्धा हरकत नाही., माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे, पण म्हणुन तरीही मला हा विचारच पटत नाही. अरे बरेचसे लोक घेतात हा निर्णय, पण म्हणुन हा निर्णय आपण आंधळेपणाने तसाच स्विकारायचा. या विचाराची एक दुसरी बाजु कुणिच का लक्षात घेत नाही. कुणा दोघांचं एकमेकांवर खुप प्रेम बसतं आणि घरातुन नकार मिळाल्यामुळे ते पळुन जावुन लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण ते कधी त्याच्या पुढे जावुन विचार करतात, नाही. त्यांचं प्रेम त्यांना आंधळं बनवतं. कधी विचार करतात त्या आई बापा चा ज्याने वयाची वीस पंचवीस वर्षे आपल्याला वाढवलेलं असतं, आणि आपल्या सुखासाठी त्यांनी जीवनभर केवळ कष्टच केलेल असतात, असा आई बाबांना केवळ त्यांचा आपल्या प्रेमा साठी सोडुन जायचं. कितीही प्रेम असलं दोन जीवांचं एकमेकावर तरी ते लग्न करण्याचा निर्णय घेतात, कशासाठी, सुखी होण्यासाठीच ना, म्हणजे हा एक प्रकारचा स्वार्थच. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी देवतासमान आई बापांना दुख देणं कितपत योग्य आहे,.. काही प्रेमी जोडप्यांना लग्नानंतर स्विकारलं जातं तेंव्हा त्यांना वाटतं आपला विजय झाला पण त्यांचा झाला असतो तो पराभव., आई बाप त्यांना स्विकारतात ते केवळ त्या दोघांच्या सुखासाठी. आठवतं आपण प्रत्येकाने लहाणपणी एक निश्चय केलेला असतो, की आपण मोठे झाल्यावर आपल्या आईला नेहमी सुखी ठेवु म्हणुन, मग अरे केवळ आपल्याला सुख मिळावं म्हणुन त्यांना त्रास देण्यात कसलं आलयं प्रेम. प्रेम जरुर करावं माणसानं, आणि प्रेम विवाह सुद्धा करावा, पण तोच विवाह जर सर्वांच्या संमतीने झाला तरच त्याला अर्थ आहे. हे बघ हवं तर आपण घरी चर्चा करु, आपल्या प्रेमाचं महत्व पटवुन देउ, शक्य तेवढे प्रयत्न करु, आपण दोघे एकमेकांनाच परिपुर्ण कसे ठरु शकु हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करु, शक्य ते सर्व काही करु.पण हे सगळे केल्यानंतरही तुझी आई मला स्विकारणार नसेल तर.... " बोलता बोलता तिचा स्वर अडखळला..

"तर तर आपण विभक्त होउन जाउ. तु म्हणत असशिल कीती निर्दयी आहे मी हो ना.. पण अरे हाच साधक बाधक विचार आहे, आपलं प्रेम शरीराच्या बंधनात कधिच नव्हत, आणि म्हणुनच आपण शरीराने लग्न करुन एकत्र आलो किंवा नाही आलो तरी आपलं तरलं प्रेम आपल्याला नक्कीच सोबत राहील. मला ठावुक आहे की माझ्या शिवाय तु आणि तुझ्याशिवाय मी अशी कल्पना सुद्धा करवत नाही, पण आपल्या समोर सध्या तेवढा एकच पर्याय अहे. काही मुर्ख लोक प्रेमात यशस्वी नाही झाले की जीव देण्याचा मार्ग निवडतात, त्यांच्या विचारांची मला कीव येते. अरे जीवन संपविण्यात कसलं आलय प्रेम, हिम्मत असेल तर, एकमेकांच्या प्रेमात आणि आठवणीत आयुष्य जगवुन दाखवा. हे बघ तु सुद्धा यावर विचार कर.. पण मला तरी हाच एक मार्ग दिसतो आहे या परिस्थीतीत.."

तो तिचे विचार ऐकुन स्तब्ध झाला, आपल्याला नेमके काय होत होते ते त्याला कळले. आणि आपल्या दोघांचे विचार इतके कसे जुळतात याचे त्याला राहुन राहुन आश्चर्य वाटत होते. ... त्याने सर्व मार्गाने प्रयत्न करुन सुद्धा त्याच्या घरुन परवानगी मिळाली नाही म्हणुन मग त्यांनी आपण ठरवलेला मार्ग निवडण्याचे ठरवले.

त्यांची शेवटची, एका अर्थाने शेवटचीच, भेट त्यांच्या जीवनात अविस्मरणिय होणार होती.. त्या दिवशी ते बराच वेळ बसुन होते. दोघेही एकमेकांना डोळ्यात साठवत होते, पण आधीच अश्रुंनी भरुन गेलेल डोळे ते सुद्धा धड करु देत नव्हते.

"का नियती ला हे मंजुर नसावे " तो

"अरे तुच सांगत असतोस ना, बी पॉझीटिव्ह म्हणुन, मग आताही तुझा तो विचार तसाच राहु दे, " ती एवढे म्हणाली खरी, पण आता तीच्याही भावनांचा बांध फुटला, आणि त्याच्या कुशीत येउन तिने अश्रुंना मोकळि वाट करुन दिली. आपल्यावर एवढी प्रेम करणारी व्यक्ती, अशी अचानक दुरावणार हे सत्य दोघांनाही पचवीता येत नव्हते, पण अर्थात तो त्यांनीच निवडलेला मार्ग होता. असा वेगळाच मार्ग निवडतांना त्यांना त्रास झाला होता निश्चितच पण इतरांच्या सुखासाठी स्वतःच सुख नाकारण यातच त्यांच्या प्रेमाची परिपुर्णता होती..

... ती ला थोड्याच दिवसात लग्न करावे लागले, तो ही त्याच मार्गावर आहे. त्याच्या जीवनात मधल्या काळत बरेच सकारात्मक बदल घडले पण दुर्दैवाने ते ऐकण्यासाठी ती नव्हतीच. पुर्वी दिवसातुन किमान एकदा होणार त्यांचा संवाद आता खुंटला आहे, तरीही त्याने आपला मोबाईल नंबर बदलला नाही, हीच अपेक्षा बाळगुन कदाचीत तिला कधी माझी गरज पडली तर मी उप्लब्ध असेन..

आज दोघेही जगताहेत, एकमेकांच सुख जपत इतरांच सुख जपत.. अशाच वेळी गदिमांच्या त्या ओळी खर्‍या होतात

दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ...

सुभाष डिके

Monday, May 08, 2006

पांडवगड ट्रेक

नुकताच आम्ही पांडवगड ट्रेक पुर्ण केला.

माझ्या अनेक ट्रेक पैकी अत्यंत उत्तम असे या ट्रेक चे वर्णन करता येईल.. चढतांनाच चुकलेली वाट, आम्ही नकळत निवडलेला अवघड रस्ता, त्यावर चढतांना आलेला अनुभव सगळच अवर्णणीय. शेर वाडिया यांची भेट हा त्यातीलच अजुन एक चांगला अनुभव. आम्ही वाडिया यांची एक छोटेखानी मुलाखतच घेतली, त्यात इकडे एकटे रहाण्याचा निर्णय घेतांना काय वाटले असे विचारल्यावर त्यांनी आम्हाला You live in a city, still you are alone. I am lucky that I am living alone, but I am not alone असे तत्वज्ञान सुद्धा ऐकवले. ते वर्षातुन एकदा, किंवा दोनदाच गड उतरतात तरीहि जगाशी जोडलेले आहेत, चक्क Internet , cell phone च्या साह्याने. दृढ निश्चय, तो तडिस नेण्याची धडपड, आणि तरीही चेहर्‍यावर टिकुन राहीलेले हास्य या गोष्टी शिकवायला शेर वाडीया यांच्या सारखा गुरु मिळणे ही त्या ट्रेक ची उपलब्धी. अशी भेट घडल्यावर आम्ही त्यांच्या सोबत फोटो न काढणे शक्यच नव्हते. गड फिरुन आम्ही परत उतरल्यावर मेणवली गावातील कृष्णेच्या चंद्राकार घाटावर आलेला अनुभव हा तर या सगळ्या अध्यायाचा कळस. अत्यंत थकलेल्या अवस्थेत आम्ही इकडे पोहोचलो आणि आमचे स्वागत केले ते दुधडी भरुन वाहणाऱ्या कृष्णे ने मग काय त्या अद्वितीय आनंदात आम्ही जवळपास तास भर बसलो. भरीस भर म्हणुन वाई गावातील बंडु गोरेंकडचे जेवण होतेच. आणि हे सगळे कमीच म्हणुन की काय एका मोराने आम्हाला सुंदर असे दर्शन दिले, पुढे धोम गावातील मंदिर, त्याबाहेरील छानसा नंदी

एखाद्या दिवसाने आपल्याला भरभरुन द्यावं याचं आदर्श उदाहरण म्हणजे हा ट्रेक

Saturday, May 06, 2006

विडंबन - अरे अरे बुटा झालासी साधन

सर्वोच्च न्यायालयाने बुटासिंग यांच्या निर्णयाविषयी नापसंती व्यक्त केली होती. सर्व जाणतात की या निर्णयामागे नेमके कोण होते... पण तरीही

(चाल - अरे अरे ज्ञाना झालासी पावन)

अरे अरे बुटा झालासी साधन,
तुझे तुज स्थान कळो आले ॥धृ॥

मोडुनी मनासी, तोडुनी नियमासी
केली विधानसभा भंग जेंव्हा ॥१॥

सोनियाचे मन, लालुचेही गुण
कोर्टी अडलकलासी तुची तेंव्हा ॥२॥

स्वतःची निवृत्ती, अन्यथा गच्छंती
नसे अन्य मार्ग तुजपुढे ॥३॥

याची एक खेळा, होती सर्व गोळा
चिरडली जनता तुमच्या मधे ॥४॥

अरे अरे बुटा झालासी साधन,
तुझे तुज स्थान कळो आले

.................. सुभाष डिके

Friday, May 05, 2006

काही तुकडे

येता जाते कशावर तरी नजर पडते, काही तरी ऐकु येतं, ते सगळचं लिहुन ठेवण शक्य नाही पण तरिही अशेच काही तुकडे...


अकेली होती गर उन वादियों में तो कभी लौटकर ना आती,
क्‍यो खयाल बनकर साथ साथ चलते रहे तुम ?.....
जाने कब किस मोडपर हमराह बनी हैं तनहाईयॉं
हम तो समझे थे अकेले ही है सफरमें.....'



एक अधिक एक किती?
अंकगणित : दोन
मैत्री : अकरा
प्रेम : एक !!!

आदत हो गयी ...

बेवफाई की यह इंतहा हो गयी ,
के तुझसे जुदा होकर भी जीने की आदत हो गयी ।

तुम लौट के आओगे हमसे मिलने,
रोज दिल को बहलाने की आदत हो गयी ।

तेरे वादे पे क्या भरोसा किया हमने,
के शब भर तेरा इंतजार करने की आदत हो गयी ।

खुशी मे भी हम क्या मुस्कुराते की,
तेरे गम मे रोने की आदत हो गयी ।

काफ़िले निकल गये हमे छोड के
के अकेले सफ़र करने की आदत हो गयी ।

हर मोड पर मिली गम की परछाईया
जिंदगी से समझोता करने की आदत हो गयी ।

जानते थे नही हो सकते कभी आप हमारे
फिर भी खुदा से आपको ही मांगने की आदत हो गयी

पैमान-ए-वफ़ा हमे क्या मालुम इबाद
के बेवफाओंसे दिल लगाने की आदत हो गयी ...

Thursday, May 04, 2006

प्रमोद महाजन

अशी खुप थोडकीच असतात ज्यांना सर्वांचच प्रेम लाभत रहातं, अशांपैकीच एक..दिल्ली गाजविणाऱ्या काही मोजक्या मराठी माणसांपैकी एक ..


प्रमोद महाजन




जमल्यास परतुन या हो...

Wednesday, May 03, 2006

यादे याद आती है

लोणावळ्याहुन पुण्याला आलो त्याला काल एक महिना पुर्ण झाले. गेली अडीच वर्षे मी नोकरीच्या निमित्ताने लोणावळ्याला काढली. कालच एका मित्राने मला प्रश्न केला "काय रे कसे वाटतेय?, What do you miss ".. या प्रश्नावर खरं म्हणजे मी विचारच केला नव्हता. आणि जसं जसा मी विचार करु लागलो तसतश्या अनेक गोष्टी माझ्या नजरे समोरुन तरळुन गेल्या.

नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने आपण ज्या कुठल्या गावात रहात असतो त्या गावाशी तिथल्या अनेक गोष्टींशी आपला ऋणानुबंध राहणे साहजिकच आहे. लोणावळ्याची आठवण झाली आणि सगळ्यात प्रथम माझ्या नजरेसमोर आला तो तिथला पाउस... लोणावळ्याला Join करण्यापुर्वी खरं म्हणजे मनात खुप हुरहुर होती तिथल्या वातावरणाबाबत आणि एकंदरितच निसर्गाबाबत. पण अगदी पहील्या दिवसापासुन तर पुढे अडीच वर्षे याचा निर्सगाने मला वेळोवेळी साथ दिली. मी Office join केले होते ऐन जुलै महिन्यात आणि अगदी त्याच दिवशी आलेल्या जोरदार पावसामुळे मी खरं म्हणजे वैतागलो होतो, अर्थात त्याच माझा दोष नव्हताच म्हणा. कारण एवढा मुसळधार पाउस मी कधी अनुभवलाच नव्हता. पण पुढे जसजसा मी रुळु लागलो तस तसं या पावसाशी माझी जवळीक वाढायला लागली. आमच्या ऑफिस ला जाण्यासाठी सुमारे २५ किमी लांबीचा आणि ४५ मिनिटे प्रवासाचा एक अत्यंत सुंदर असा घाटातला मार्ग होता. या मार्गावर अनेक वळणावर हा निसर्गराजा आपल्या वेगवेगळ्या रुपाने दर्शन देत असे. कुठे कोसळणारा धबधबा, तर कुठे घनदाट धुके, दुरवर पसरलेल्या डोंगर रांगा आणि अशा रस्त्यावरुन रोज ऑफिसला जायचे असल्यामुळे सकाळी सकाळी मनाला एक नवा तजेला मिळत असे आणि संध्याकाळी दिवसभराच्या कामाचा सगळा शीण घालवण्याचं सामर्थ्य सुद्धा त्यामधे होतं. ऑफिस मधुन सुद्धा एका हातात कॉफीचा कप आणि खिडकीतुन बाहेर दिसणारे पावसाचे प्रताप असा दुहेरी मिलाफ साजरा होत असे. पावसाळ्यात आम्ही ऑफिसमधील ए. सी. चालु करणे शक्यतो टाळत असु कारण बाहेरुन येणारी ताजी स्वच्छ हवा आम्हाला जास्त सुखावत असे. अशा वातावरणात काम करण्यात एक निराळीच मजा असे, कधीही ताणतणावाचे प्रसंग आले की ऑफिस मधुन बाहेर निघावं आणि समोर दिसणाऱ्या पावसाकडे बघत रहावं. काहीच क्षणात आपण आत्ता खुप चिडलो होतो, किंवा चिंतेत होतो हे सांगुन सुद्धा खरं वाटायचं नाही. अशा या पावसात भिजण्याची मजा तर आणखी निराळी. पुण्या मुंबई हून सुट्टी च्या दिवशी अनेक लोक त्या पावसात भिजण्यासाठी येत असतं. अर्थात त्यांच्या भिजण्याला धांगडधिंग्याचचं स्वरुप असे. पण तरिहि अशा भाउगर्दीतुन दुरजाउन एखाद्या वळणावर उतरावं आणि या पावसाचा आनंद घ्यावा. माझ्या घराच्या खिडकीतुन दुरवरचा एक छोटासा धबधबा अगदी स्पष्ट दिसत असे. तो धबधबा आणी त्याच खिडकीमधुन दिसणारा पौर्णिमेचा चंद्र या भांडवला वर मी त्या घरात जवळपास एक वर्ष एकट्याने काढु शकलो. याच पावसाशी निगडीत अशा अनेक वैयक्तीक आठवणी सुद्धा आहेत आणि हा पाउस आठवता आठवाता त्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळुन जातो. आता नोकरीच्या निमित्ताने लोणावळा सोडावं लागलं आणि पुण्यात यावं लागलं , पण आजही डोळे मिटले की पटकन डोळ्यासमोर तो पाउस, तो रस्ता, तो धबधबा दिसत रहातो आणि मन चिंब होउन जातं त्या आठवणींनी.... I miss all the fun..


लोणावळ्यापासुन दुर राहतांना अजुन एक गोष्ट मी खुप miss करतो ती म्हणजे मुंबईचे FM Radio Channels आणि विशेषतः Radio Jokies. मी जेंव्हा लोणावळ्याला रहायला आलो तेंव्हा विविधभारती आणि पुणे आकाशवाणी यांच्या पलीकडे तिसरे Radio Channel मला ठाउक नव्हते. पण लोणावळ्याला मुंबईमधुन प्रसारीत होणाऱ्या सर्व वाहीन्या अगदी स्पष्ट ऐकु येत असत, अगदी Love at first sight म्हणतात ना तसा प्रकार झाला. जुलै २००३ साली जेंव्हा मी join झालो त्यावेळी Win ९४.६ नावाचे एक Radio Channel होते. त्यावर सकाळी ५.०० वाजता अंजली पाटिल यांनी सादर केलेला एक मराठी गाण्यांचा कार्यक्रम लागत असे. नितांत सुंदर अशी गाणी अगदी पहाटे पहाटे ऐकायला मिळत असे, त्यातुन अंजली पाटील यांचं निवेदन तर दुधात साखरचं.. त्यांचा आवाज ऐकत दिवस सुरु होत असे.. पुढे लगेचच ७.०० वाजता 'मलिष्का' येत असे, आणि मग पुढे तिच्या चटपटीत कार्यक्रमांना सुरुवात होत असे. याच वाहिनीवर अनुराग पांडे सुद्धा एक कार्यक्रम सादर करत असे. पुढे पुरेसे पैसे न जमवु शकल्यामुळे ती वाहिनी बंद झाली.. मलिष्का आणी अनुराग पांडे यांनी ९३.५ Red FM मधे प्रवेश केला पण अंजली पाटील कुठे गेल्या ठावुक नाही, I miss her... मुंबईतुन सध्या (म्हणजे मी लोणावळा सोडेपर्यंत तरी) ९१.० रेडिओ सिटी, ९२.५ गोल्ड एफ एम, ९३.५ ऱेड एफ एम, ९८.३ रेडिओ मिरची, १००.१ एफ एम गोल्ड, आणी १०७.० एफ एम रेनबो असे अनेक channel लागत असे. प्रत्येकाची एक एक खासियत असे. सकाळी ७.०० वाजता मलिष्का, आणि रेडिओ सिटी वर सिंपली प्राची यांचा कार्यक्रम सुरु होत असे आणि मला दोघीही आवडत असल्यामूळे आलटुन पालटुन ऐकावं लागत असे. मला गाण्यापेक्षा त्यांच्या आवाजातील गोडवा जास्त सुखावत असे. पुढे दहा वाजता रेडिओ सखा अश्विन किंवा लावण्या येत असतं, त्यानंतर दिवाना नंबर 1 to infinity अनिरुद्ध,, आत्त्त्ता सुद्धा एक एक नाव त्यांचा आवाज आठवण करुन देत आहे.. I miss them all,.....

Tuesday, May 02, 2006

इक्बाल - एक चित्रपट एक संदेश

बऱ्याच दिवसांपुर्वी एका मित्राने 'इक्बाल' जरुर पहा असा मेसेज पाठविला होता. त्यानंतर सुद्धा अनेकांकडुन तशीच शिफारस झाल्याने चित्रपट पहाणे आवश्यक होते., म्हणुन काल सुट्टीत वेळात वेळ काढुन चित्रपट पाहिला, आणि एवढी उत्तम कलाकृती बघण्यासाठी आपल्याला एवढा वेळ लागला म्हणुन वाईट वाटले.

दोनच तासाच्या चित्रपटात 'इक्बाल' तुम्हाला खुर्चीला खिळवुन ठेवतो आणि चित्रपट गृहातुन बाहेर पडल्यानंतर बऱ्याच दिवसांनतर एक चांगला चित्रपट बघितल्याचे समाधान प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर दिसते. Bollywood चा नेहमीचा एकही फॉर्म्युला (सासु सुन, संपत्तीचे झगडे, दहशतवाद, मारधाड, निव्वळ गोड प्रेमकथा) न वापरता सुद्धा चांगला चित्रपट निर्माण करता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'इक्बाल'.
'इक्बाल' - एका छोट्याश्या गावातील शेतकऱ्याचा मुकबधीर मुलगा. आपल्या आईकडुन गर्भातुनच क्रिकेटविषयीचे प्रेम घेउन आलेला. वडिल घराच्या अडीअडचणी मुळे त्रासलेले, साहजिकच त्यांची इच्छा की त्यांच्या मुलाने शेतीत हातभर लावावा अशी. पण क्रिकेटच्या वेडाने झपाटलेल्या 'इक्बाल'ला ते मंजुर नाही. आपल्या बहिणीच्या साह्याने गावात सुरु असलेल्या academy च्या बाहेर दुर उभा राहुन academy च्या शिक्षकांकडुन शिकण्याचा प्रयत्न करतो. नंतर बहिण त्याअअ academy मधे प्रवेश मिळवुन देते, पण काही कारणाने त्याला academy सोडुन जावे लागते, मग नसिरुद्दीन शहा कडुन शिकायचे असे 'इक्बाल' ठरवतो, पण नसिरुद्दीन शहा त्याला तयार नसतो, मग मह्त्प्रयत्नाने 'इक्बाल' आणि त्याची बहीन त्याला तयार करतात. पुढे वडिलांचा नकार आडवा येतो तेंव्हा रात्रीचा दिवस करुन 'इक्बाल' तयारी करतो, रणजी team मधे निवड होण्यासाठी 'राजकारण' मधे येते पण तरिही त्याची निवड होते, पुढे Indian team मधे निवड होण्याची वेळ येते, मग नेमके काय होते हे तर चित्रपटातच पाहण्यासारखे.

अभिनयाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर श्रेयस तळपदे ने संधिचे सोने केलेयं. एकही शब्द न बोलता संपुर्ण चित्रपटावर तो एक छाप सोडुन जातो. आनंदाचे आणि जबरदस्त इच्छाशक्ती दाखविण्याच्या प्रत्येक प्रसंगात त्याच्या चेहऱ्यावरिल हावभाव एवढे नैसर्गिक आहेत, त्याचे डोळे एवढे बोलके दिसतात की हा मुकबधीर आहे की नाही असा प्रश्न पडावा. श्वेता प्रसाद चे तर करावे तेवढे कौतुन थोडे आहे, समोर नसिरुद्दीन शहा सारखा अभिनेता असतांना सुद्धा तिच्या अभिनयातुन कुठेही नवखेपणा जाणवत नाही. शाब्बास श्वेता.. नसिरुद्दीन शहा आणि गिरिश कर्नाड यांच्या अभिनयाबद्दल लिहिण्यास मी असमर्थ आहे, त्यांच्या नावाचा उल्लेखच सर्व काही वर्णन करण्यास समर्थ आहे. प्रतिक्षा लोणकर ने साकारलेली आई आणि यतीन ने साकारलेला असहाय्य बाप हे सुद्धा तेवढ्याच तोडीचे आहेत. नागेश चं दिग्दर्शन याविषयी तर लिहावं तेवढ थोडं आहे, साध्या साध्या आणि छोट्या प्रसंगातुन संपुर्ण चित्रपट पुर्ण करत जाण हे त्याचं वैशिष्ट्य. चित्रपटाचं संगित आणि विशेषतः KK ने गायलेलं 'आशायें' हे गाणं एवढं सुंदर आहे की तुमच्या मनातील निराशा दुर करण्याचं सामर्थ्य त्यामधे नक्कीच आहे.

पण चित्रपट पाहणे व त्याची प्रशंसा करणे यावरच 'इक्बाल' संपत नाही. 'इक्बाल' च्या निमित्ताने अनेक गोष्टी आपण शिकु शकतो. आपल्या जीवनात काहीतरी करुन दाखविण्याची इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते पण 'इक्बाल' बघतांना या इच्छापुर्ती साठी घ्यावे लागणारे कष्ट किति आणि कसे असावेत याचे धडे आपल्याला मिळत जातात. बोलता व ऐकता येत नाही तरिही मनात जोपासलेल्या स्वप्नपुर्ती साठी अथक परिश्रम करण्याची तयारी 'इक्बाल' दाखवतो. एवढेच नव्हे तर आपल्या गुरुला सुद्धा तयार करण्यासाठी तो मागे पुढे पहात नाही. वडिल शेतावर जाण्यासाठी सांगतात तेंव्हा दिवसा शेतावर आणि रात्री मैदानावर जाण्याची तयारी तो दाखवतो. यशाच्या जवळ पोहोचत असतांना मोहाचे काही क्षण त्याला आपल्या लक्षापासुन दुर बोलावतात पण ध्येय समोर दिसत असतांना इतर कशालाही गौण मानुन केवळ आणी केवळ ध्येयाकडेच पाहण्याची शिकवण 'इक्बाल' आपल्याला देतो.
'इक्बाल' मधील सुंदर गाणे पुढे देत आहे

आशायें आशायें आशायें
कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास
हर कोशिश मे हो बार बार, करे दरियाओंको आर पार ..
तुफानोको चीर के , मंजिलो को छीन ले ॥१॥
आशायें खिले दिलकी, उम्मीदे हसे दिलकी
अब मुश्किल नही कुछ भी, अब मुश्किल नही कुछ भी ॥धृ॥
उड जाये लेके खुशी अपने संग तुझको वहा
जन्नत से मुलाकात हो पुरी हो तेरी हर दुआ ॥२॥
गुजरे ऐसी हर रात रात हो ख्वाइशोसे बात बात
लेकर सुरज से आग आग, गाए जा अपना राग राग
कुछ ऐसा करके दिखा खुद खुश हो जाए खुदा ॥३॥


--------------
निराशा झटकुन उठा, आपल्या ध्येयावर नजर ठेवा, तयारी असु द्या अफाट परिश्रम करण्याची, ढवळुन निघण्याची तरच कळेल चव यशाची. स्वतःला झोकुन द्या, आणि मग बघा यशाच्या शिखरावरुन दिसणारं सुंदर दृश्य
सुभाष डिके

Email forwards आणि आपण

संगणक आणि संगणकाशी संबंधीत सर्व लोकांनाच आपल्या जीवनाशी ई मेल चे जुळलेले नाते आणि त्याची अपरिहार्यता मान्य असेल. ई मेल चे उपयोग सर्वांना ठाउक आहेतच त्यातीलच एक ई मेल वापरण्यामागचे मुख्य कारण म्हणजे forwarded emails.


प्रत्येक जण आपापल्या आयुष्यातुन भल्या बुऱ्या प्रसंगाना तोंड देउन पुढे जात असतो. असं म्हणतात ना की सुखाच्या क्षणी सर्वच पुढे येतात पण दुःखाच्या, अडचणीच्या प्रसंगी जो पुढे येतो तो खरा मित्र. आपल्या सर्वांच्याच जीवनात इतर मित्रांसोबतच या forwarded emails चा खुप मोठा हात आहे हे मान्य करावे लागेल.


सुखी होण्याच्या काही मार्गामधे छोट्या छोट्या गोष्टींमधे सुख शोधावं असं सांगितलेलं असतं. अगदी तेच काम या forwarded emails करत असतात. कधी कधी असं होतं की कुठल्याश्या कारणावरुन आपलं boss बरोबर किंवा सहकर्मचाऱ्या बरोबर वाद होतो, काही क्षण काय करावे काहीच सुचत नाही आणि अशाच वेळी तुमच्या मेल बॉक्स मधे एक तुम्हाला ताजं तवाना करणारा मेल येउन पडलेला असतो. त्यामधे काहीही असो एखादी सुंदर गोष्ट वा एखादा अगदिच फालतु विनोद, पण त्यावेळी तुम्हाला त्याची खरोखरचं गरज असते आणि तुम्ही मग लगेच थोडसं हसुन आपल्या कामाला लागता. तुम्हाला हाच प्रकार अनेकदा जाणवेल, कधी मनात निराशा दाटुन येते, किंवा कुठल्याश्या चुकलेल्या निर्णयामुळे मन विषण्ण झालेलं असतं आणि अश्या वेळी एखादी चांगली गोष्ट तुम्हाला वाचायला मिळाली की ती निराशा कुठल्या कुठे पळुन जाते.


याच ई -मेल्स चे अनेक ग्रुप सुद्धा बनतात, मग त्यातुन अनेकदा अत्यंत उपयुक्त अशी माहीती सर्वांनाच मिळत रहाते. ई मेल मुळे अनेकांना चांगले मित्र मैत्रिणी मिळालाचे उदाहरणं तर अनेक आहेतच. आपल्या अनेक मित्रांपैकी एखादा असा असतो की रोज निदान त्याची एक तरी ई मेल मिळणारच, मग काही दिवसानंतर आपण नकळत त्याच्याकडुन / तिच्याकडुन येणाऱ्या ई मेलची वाट बघु लागतो, आणि एखादा दिवस, दोन दिवस रिकामे गेले की मग सुनेसुने वाटत रहाते. नकळत एकमेकाची ख्याली खुशाली कळविण्याचे काम सुद्धा याच ई मेल्स करतात. कुणाशी भांडण झाल्यास एखादी चांगली ईमेल माफी मागण्याचं काम करुन जाते. आणी कुणाची फारच आठवण येत असल्यास अशीच एखादी ईमेल आपल्या साथीला येउन जाते. बऱ्याचदा ई मेल वरुन येणारे विनोद, कविता, गोष्टी जपुन ठेवुन पुन्हा पुन्हा वाचाव्यात अश्या असतात. मग चटकन आपल्याला आवडलेली एखादी गोष्ट कविता, विनोद इतरांसोबत सुद्धा शेअर करावा या भावनेने आपण सुद्धा तीच ई मेल पुढे पाठवुन मोकळे होतो.


अर्थात याला काळी बाजु सुद्धा आहे ती म्हणजे वेळेचा अपव्यय. काही लोकांना दिवसभर याच गोष्टीत वेळ घालवण्याची सवय असते आणि ती नक्कीच चुकिची आहे. पण थोडक्यात वापर केल्यास याच ई मेल्स आपली उत्पादनक्षमता वाढविण्यास नक्की मदत करतील यात नवल नाही. बऱ्याच लोकांना Email चा वापर फक्त तेवढ्या पुरता करावा असं वाटतं असतं आणि तसं वाटणं साहजिक सुद्धा आहे., पण थोडंस पुढे जाउन तुमच्या एखाद्या मित्राने/मैत्रिणीने तुम्हाला एखादी चांगली ई मेल पाठविली तर बिघडले कुठे? अर्थात काही मेल्स असतात निव्वळ डोकेदुखी. उदा. हा मेल १० लोकांना पाठवा म्हणजे तुमच्या इच्छा पुर्ण होतील, किंवा तुम्हाला Microsoft कडुन अमुक एक रकमेचा चेक मिळेल वैगरे. आणि सुशिक्षीत (किंबहुना उच्च शिक्षीत) असुनही ही मंडळी का असले मेल्स forward करतात कुणास ठावुक? अश्या मेल्स ना त्याच क्षणी delete करुन टाकण्यातच शहाणपणा आहे. पण अशा काही मेल्स चा अपवाद वगळला तर तुमच्या लक्षात येईल की forwarded mails मधे सुद्धा एक प्रकारची मजा असते. आणि तीच मजा आपण सर्वांनी अनुभवली असेलच

सुभाष डिके