Wednesday, May 10, 2006

निर्णय

निर्णय

एका शहरात राहणार्‍या 'तो' आणि 'ती' यांची हि गोष्ट आहे. खुपच कोवळ वय होतं त्यावेळी दोघांच ज्यावेळी त्याने तिला प्रपोझ केलं तेंव्हा. ती अकरावी मधे आणि तो बारावीत. खरं म्हणजे त्यावेळी त्याने केवळ आकर्षणातुन आणि त्या वयात उमलणार्‍या भावनांना प्रेम समजुन तिला प्रपोझ केलं आणि तिची सुद्धा परिस्थीती काही वेगळी नव्हती. पण तरीही तिचा होकार त्या दोघांना एका अनामीक पण गोड बंधनात बांधण्यासाठी पुरेसा होता. मात्र लवकरच कॉलेजला सुट्ट्या लागल्या आणि होकारांनंतर पुढे भेटीगाठी वाढण्या अगोदरच त्यांचा भेटण्याचा मार्ग बंद झाला. त्या पुर्वी ते केवळ दोन तीन वेळाच भेटले होते. सुट्टित भेटण्यासाठी त्या दोघांनीही प्रयत्न केले पण दोघांच्या घरच्या परिस्थी नुसार त्यांना भेटणे शक्यच नव्हते, मग त्यांना एक आधार मिळाला तो म्हणजे फोन चा. घरच्यांची नजर चुकवुन दोघे बर्‍याच वेळी फोन वरुन एकमेकांशी संपर्क साधत असत, अर्थात तो ही खुप कमी वेळेला पण अगदीच न भेटण्यापेक्षा त्यांना तेवढे बोलणे पुरेसे होते. आणि एकाच शहरात असल्यामुळे बर्‍याच सार्वजनीक ठिकाणी त्यांची भेट घडायची, अर्थात ही भेट सुद्धा केवळ नजरेचीच असायची कारण तिच्या बरोबर किंव्हा त्याच्या बरोबर नेहमी कुणितरी असायचेच.

बारावीच्या निकाला नंतर त्याने इंजिनियरींग ला प्रवेश घेतला आणि त्यासाठी तो दुसर्‍या शहरात गेला, आणि इथुन खरी सुरुवात झाली त्यांच्या प्रेमाच्या परिपक्वतेला. कोवळ्या वयात सुरु झालेल प्रेम कुठवर जाईल याची त्या दोघांनाही कल्पना नव्हती पण तो दुसर्‍या शहरात जाताच दोघांनाही आपल्या मधे निर्माण झालेल्या एक नाजुक बंधंनाची जाणिव झाली. पहिले दोन महीने त्या दोघांना एकमेकांना पाहणे अशक्य झाले होते आणि फोन वरुन सुद्ध संपर्क झाला नव्हता. आणि याच काळात त्या दोघांना प्रेमाचा खरा अर्थ, ती हुरहुर, ती हरवुन जाण्याची लक्षणं या सगळ्या सगळ्यांचा अनुभव येत होता. आणि एक दिवस त्याने तिला फोन केला त्यावेळी दोघेही निशब्द झाले होते, खरं म्हणजे काय बोलावं ते ही सुचत नव्हतं, आणि आपल्याला नेमकं काय होतय ते सुद्धा कळत नव्हत.बर्‍यच वेळ निशब्द संवाद झाल्यानंतर त्या दोघांनाही कंठ फुटला आणी मग बराच वेळ ते बोलत राहीले, आता दोघांना एकमेकांची नविन ओळख होत होति. जस जसे दिवस पुढे जावु लागले तस तसे ते एकमेकात गुंतत गेले, खरं म्हणजे इतरांच्या बातीत जे खुप अगोदर होतं ते या दोघांच्या बाबतीत नंतर होत होतं. तिला त्याची पुर्ण ओळख पटु लागली होती. कॉलेज ला असतांना न चुकता दिवसातुन किमान एकदा त्यांच फोन वरुन बोलण होत असे, आणि तो सुट्टीला घरी आला की पुन्हा नजर भेट (!). चोरुन भेटण्यात किंवा बोलण्यात असलेला निराळाच आनंद त्यांना मिळत होता. आता कधीतरी वेळ साधुन ती तिच्या मैत्रीणी सोबत किंवा कुठलेही कारण साधुन त्याच्या घरी येत असे, उद्देश एकच त्याला डोळे भरुन पहावे बस्स. वेगवेगळ्या प्रसंगातुन त्या दोघांच्या मनाचे भावबंध उघडत होते.

एव्हाना त्या दोघांचे नात खुप दृढ झाले होते, आणि त्यांच्या या प्रवासाला तीन वर्षे पुर्ण झाली होती. त्याचा जबरदस्त आत्मविश्वास, त्याची philosophy , त्याचे प्रेमाबद्दलचे विचार, त्याची देवावरील श्रद्धा य सगळ्या बद्दलचे विचार या सगळ्या सागळ्या गोष्टी तिला त्याच्या प्रेमात हरखुन जाण्यास भाग पाडत होत्या. तर तिची कष्ट करण्याची तयारी, प्रत्येक वळणावर आपल्याला साथ देण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टी त्याला भावत होत्या. या दोघांच्या प्रेमाची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तीन चार वर्षांच्या कालावधीत ते एकमेकांना समोरासमोर केवळ पाच सात वेळा केवळ भेटले असतील, आणि प्रत्येक भेट केवळ तीन चार मिनिटांची. एवढ्याच अवधीत ते प्रेमाच्या एका वेगळ्या पातळीवर येउन पोहोचले होते. म्हणजे एक गोष्ट नक्की झाली होती की त्या दोघांचे प्रेम केवळ शारीरीक आकर्षणातुन आलेले नव्हते, तर ते एका वरच्या पातळीवर होते. एखाद्या व्यक्ती वर भान हरपुन प्रेम करणे म्हणजे काय असते हे त्या दोघांकडे पाहुन कळत असे. आणि दोघेहि एकमेकांच्या भावना जपत, एकमेकांच्या परिवारा विषयी काळजी घेत आपल्या जीवनाला आकार देत होते. त्यांच्या एकमेकांना जास्त न भेटण्याचं कारण कुणाची भिती वाटणे हे नव्हते, तर दोघांना ही आपल्या मुळे दुसर्‍याला घरी त्रास होउ नये असे वाटत होते, एकमेकांच्या याच प्रेमापोटी खुप इच्छा असुनही त्यांच्या भेटी खुपच मर्यादीत होत्या. पण त्यांच्या फोन वरुन \nबोलण्यामधे जास्त सुरक्षीतता असल्यामुळे फोन हेच दोघांच्या भावना पोचविण्याचं साधन बनलं होतं. एखादा दिवस त्याच्याशी बोलणं झाला नाही की तिच मन सैरभैर होत असे आणि त्याचं सुद्धा कशातच लक्ष लागत नसे. अगदी सकाळी उठल्यापासुनची दिनचर्या दोघं एकमेकांना सांगत असतं. एकमेकांविषयीची काळजी मागे सोडत हे संभाषण संपत असे. दोघांचे विचार तर एवढे जुळत होते की ते प्रेमात पडले याचं कुणालाच नवल वाटु नयेत. एकमेकांच्या झालेल्या चुका दाखविण्यात आणि त्याबद्दल माफी मागण्यात सुद्धा ते मागे नव्हते. तासनतास बोलण्यासारख प्रेमी जणांकडे असतच काय असा प्रश्न त्यांना पुर्वी पडत होता पण आता त्याचं उत्तर त्यांना स्वतः च्या उदाहरणावरुन मिळत होते. बोलण्यासाठी किंबहुना विषयाची गरजच पडत नसे, कुठल्याही विषयावर हे बोलणे सुरु राही, मग त्यात \'जेवण झालं का\' या साध्या प्रश्नावरुन थेट \'तुला माझी आठवण येते का\' या प्रश्नापर्यंतचा रंजक प्रवास असायचा. \'फोन\' च्या शोधाबद्दल प्रेमात पडलेल्यांनी दिलेल्या अनेक अनेक धन्यवादामुळे ग्राहम बेल नक्कीच स्वर्गात गेला असेल. प्रेम तर कुठही बघायला मिळत पण प्रेमाचा हा वेगळा अविष्कार दुर्मिळ असतो. खुप खुप वरच्या पातळीवरील प्रेम, ज्यामधे शरिराबद्दलच विचारही नसतो, आणि एकमेकांवर असते ते श्रद्धा, निखळ आणि पवित्र प्रेम. एखाद्या मंदिरात गेल्यावर आपल्याला तेथील वातावरणातुन एक वेगळीच अनुभुती जाणवते, मन अगदी हलक होउन शांत होत जात थेट तसाच अनुभव ते दोघे जगत होते. समाधीच्या अवस्थे नंतर चेहर्‍या वर एक प्रकारचं मंद स्मित फुलते, त्याचा उगम सामन्याला कधीच कळत नाही, मात्र ज्याच्या चेहर्‍यावर ते स्मित झळकत असते तो अनामिक शांतीचा अनुभव घेत असतो, त्याचा परिस्थीतितुन हे दोघे जात होते.


पुढच्या वर्षी त्याचे कॉलेज संपले आणी लगेचच त्याला एका मोठ्या कंपनी मधे नोकरी सुद्धा मिळाली. तो दिवस त्या दोघांसाठी अवर्णीय असा आनंद देणारा होता. आता लवकरच त्या दोघांचे ऐक्य शक्य होते, खरं म्हणजे त्यांचे मानसीक ऐक्य खुप पुर्वीच झाले होते पण तरीही त्याला समाज मान्यता मिळण्याची गरज होती. नोकरी निमीत्त त्याला आणखी एका दुरवरच्या शहरात जावे लागणार होते म्हणुन खरं म्हणजे दोघांनाही वाईट वाटत होते पण तरीही भविष्यातील सुखद काळ आता त्या दोघांनाही खुणावु लागला होता. गेल्या पाच वर्षापासुन दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रेमाला आता एक नवे वळण लवकरच लगण्याची शक्यता होती. त्याने नवीन शहरात जाउन जम बसवला, आणि या दरम्यान तिच्याशी न चुकता बोलणे सुरु होतेच. आताशा बोलण्याचा विषय थोडासा पुढे गेला होता आणि तो लग्ना पर्यंत येउन पोहोचला होता. बोलण्यातुन त्या दोघांनी एकमेकांना आपापल्या घरतील लोकांची त्यांच्या जीवनसाथीदाराबद्दालची कल्पना सांगितली. आणि दोघांनाही आपला जोडीदार या अपेक्षांवर पुर्ण उतरेल याची खात्री होती. पुढे येउ घातलेल्या सहजीवनांच्या कल्पना रंगवत त्यांचे दिवस जात होते, एकमेकांच्या आवडीनिवडी जपत आपण कसा संसार करु याची ती दोघे उजळणी करत असतं. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी आपपल्या होणार्‍या बाळांची नावे सुद्ध ठरवुन ठेवली होती. एकदा सहज म्हणुन त्याने दोघांची कुंडली परिसरातील एका ज्ञानी व्यक्ती कडे पाठवुन बघितली आणी त्याचे उत्तर मिळाले तेंव्हा तर त्या दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला कारण त्याच्या नुसार दोघांचे ३६ पैकी ३३ गुण जुळत होते, आपण खरोखरच Made for each other आहोत याच्या त्या गोष्टीमुळे शिक्कमोर्तब झाले.

मधल्या काळात तिचे लग्नाचे वय झाल्यामुळे तिच्या घरी स्थळ येण्यासाठी सुरुवात झाली होती, पण मला पुढे शिकायचे आहे या सबबी खाली तिणे या सर्व मुलांना टाळले होते आणी एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिच्या आई बाबांनी सुद्धा तिच्या इछेपुढे जास्त जोर दिला नव्हता. \n\n\n \nपण एकदा मात्र एक खुप चांगल स्थळ तिच्या साठी आलं होतं आणी कुठल्याही उपवर मुलीच्या आई वडिलांनी केला असता तो विचार त्यांनी सुद्धा केला. पण ती ने तो विचार ठाम नकार देउन परतवुन लावला पण या प्रसंगानंतर आता आपल्याला जास्त दिवस असा विरोध करत राहता येणार नाही असं तिच्या लक्षात आलं आणि म्हणुन एक दिवस तिने त्याच्या शी बोलतांना हा विषय काढला.

"अरे, मला वाटतं आता आपण घरी सांगुन टाकायला हवं, कारण आता फार दिवस मी आलेली स्थळं परतवु शकणार नाही."

"अगं तशी माझी काहिच हरकत नाही पण माझ्या नोकरीत अजुन माझे Confirmation आले नाही आणि confirmation च्या अगोदर पासुनच मी लग्नाचा विचार करण थोडसं बरोबर वाटत नाही .."

"अरे येइलच ना तुझ confirmation लवकरच आणि हवं तर सध्या फक्त सांगुन ठेउ घरी, आणि मग confirmation नंतर लग्नाचा विचार करता येईल"

"चालेल, मग मी आजच आईला सांगतो, "

"आणि मी माझ्या आईला, पण ठावुक आहे ना रे कसं सांगायचं ठरलं आहे ते.."

"हो गं, मी तसचं सांगणार आहे.."

या निरागस प्रेमाचा एक निर्णायक टप्पा आला होता, आणि आता या क्षणी कुठलीही चुक होउ नये याची त्यांनी खबरदारी घेतली होती. तसे दोघेही आपपल्या घरी लाडके होते, पण तरीही त्यांच्या प्रेम विवाहाला कितपत पाठींबा मिळेल या बद्दल त्यांच्या मनात थोडीशी शंका होती. आणि म्हणुनच त्यांनी एक उपाय योजला होता, तो म्हणजे घरी प्रेम विवाह करायचा आहे हे सांगायचेच नाही, तर रितसर एखाद्या व्यक्ती मार्फत त्याच्यासाठी त्याच्या घरी बोलणी सुरु करयाची, त्याचाच पुढचा टप्पा म्हणुन तो कांदेपोहे कार्यक्रम तिच्या घरी जावुन करणार आणि सगळा काही normal आहे असं भासवत लग्न करणार असा plan त्यांनी आखुन ठेवला होता. दोघांची जात एकच असल्यामुळे आणी दोघांच्याही घरात लग्नासाठी तयारी सुरु असल्यामुळे यात काही problem येईल असे वाटत नव्हते. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी कांदेपोहे कार्यक्रमाची रंगीत तालीम सुद्धा केली होती, म्हणजे तो काय प्रश्न विचारणार, त्यावर तीने काय उत्तर द्यायची वैगरे सगळ काही Fixed होतं, Arranged Love Marriage करायला निघाले होते ती दोघे. या साठी ती आपल्या एका मावशीला विश्वासात घेउन सांगणार होती. तिने एक दिवस त्या मावशीला सगळा प्रकार सांगितला आणि मदत करण्याची विनंती केली. त्या मावशीनेही जास्त आढेवेढे न घेता लगेचच तिच्या आई कडे जावुन तिच्या साठी एक योग्य स्थळ आहे असं सांगुन त्याच्या घराविषयी माहीती सांगितली. तिच्या बाबांनी मुलाविषयी आणि त्याच्या घराविषयी जास्त माहीती काढली आणी सारे काही व्यवस्थीत आहे याची खात्री पटताच त्यांनी त्याच्या घरी जाउन बोलणी करण्यास तयारी दाखविली. हे सगळ ऐकताच तिला कधी हे सगळं त्याला सांगते असं झालं होतं. त्या रात्री त्या दोघांनाही झोप आली नव्हती, आपल्या पाच वर्षाच्या प्रेमाची एक प्रकारे पुर्तता होणार असे त्या दोघांना वाटत होते.

तो सुट्टी घेउन आपल्या घरी आला होता आणी जणु काही घडलेच नाही अशा अविर्भावात वावरत होता पण आतुन परमानंद झाला होता. आता कुठल्याही क्षणी तिकडुन निरोप येईल आणी मग \'कांदापोहे\'. एक दिवस तिचे काका त्यांच्या घरी आले आणी त्याच्या आई बाबांशी बोलुन निघुन गेले. मोठ्या उत्सुकतेने त्याने घरात पाउल ठेवले आणि आई च्या उद्गाराने ते पाउल जागीच अडखळले. आई बाबांना सांगात होती "त्या घरातील मुलगी आपली सुन म्हणुन आपल्या घरात येउ शकत नाही!!".. हे सगळे त्याला अनपेक्षीतच होते. दोन क्षण त्याला काहीच कळेना. थोड्या वेळानंतर घरात कुणिच बोलत नाही हे बघुन नाईलाजाने त्यानेच विषय काढला,

"आई, ते काका कशाला गं आले होते "

"तुझ्यासाठी एक स्थळ आणलं होतं त्यांनी ", "असं, कुठलं बरं.. ? "

"\'ती\' "

"मग काय सांगितलस तु त्यांना " \n"काय सांगायचं, तसं अजुन सांगितलं नाही काही, पण नाही म्हणुन सांगणार आहे "

"का?, मुलगी बघण्याच्या अगोदरच नाही, ते का बरं..:"

"त्यांच्या घरातील मुलगी आपल्या घरात सुन म्हणुन नको आणि का ते विचारु नकोस "

"अगं पण असा काय problem आहे काय हरकत आहे ते सांगशील की नाही "

"हे बघ तु हा प्रश्न विचारु नकोस, त्याच्या मागे खुप मोठं कारण आहे असं समज, आणि हा विषय इथेच संपव "

"पण जर मी असं म्हणालो की मला तिच्याशीच लग्न करायचे तर ??"

"तर तुला हा आग्रह सोडावा लागेल, माझी तुझ्या लग्नाला किंबहुना प्रेम विवाहाला सुद्धा परवानगी आहे, पण त्या मुलीसोबत शक्यच नाही "

"हे बरं आहे तुझं, म्हणे प्रेम विवाहाला परवानगी आहे पण फक्त त्याच मुली सोबत नको, असं काय घोडं मारलय तिने तुमचं "

"माझ्या नकारामागे काही तरी विशेष कारण असेल एवढं समजुन घेशील अशी मला अपेक्षा आहे. " आई चा आवाज खुप हळवा झाला होता..

त्यानंतर त्याने खुप वेळ आई बाबांशी वाद घातला, पण ते दोघेही आपल्या मतावर ठाम होते, आणि ते कारण सांगायला सुद्धा तयार नव्हते. त्याच्या मनात विचारचक्र सुरु झाले. .... असं का करावं आईने आणि बाबांनी... त्याचं त्याच्या कुटुंबियांवर खुप प्रेम होतं आणि त्यांच सुद्धा, त्यांचा एक मोठा परिवार होता, आणि सर्व लोक त्यांना एकमेकांना जपणारी माणसं असेच ओळखत होते.... आई बाबांचे विचार फार मागासलेल नव्हते आणि दोघांनी प्रत्येक वेळि आपल्या मनाचा मोठेपणा दाखवुन दिला होता मग आजच असं का बरं व्हावं... ज्या अर्थी ते एवढ्या मनापासुन सांगत आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल..... , पण म्हणुन काय मी तिला नकार देउ, शक्यच नाही, ....... कदाचीत तिच्या घरातील वातावरण, त्यावर तर काही आक्षेप नसेल ना...... असेल काहीही कारण पण गेल्या पाच वर्षांपासुन मी तिला ओळखतो, न पाहता नकार द्यावा असं तिच्यात नक्कीच काही नव्हतं..........., मग काही घरगुती कारण असेल किंवा इतर काही.... पण कुठलही कारण असेल तरी मझ लग्न तिच्याशी आणि फक्त तिच्याशीच होईल, ..... पण परवानगी तर मिळत नाही मग...... काय करायचं...पळुन जायचं घरातुन....

या विचारावर त्याचं मन येउन थांबलं..... बराच साधक बाधक विचार करुन त्याने आपण घरुन पळुन जावुन लग्न करु शकतो असा विचार केला.... पण तरीही कुठेतरी काहीतरी चुकत होते खास.... त्याचं मन कमालीच अस्थीर झाला होतां.,.. काय होत होतं त्याला कळत नव्हतं.,... पण मनात अनेक विचार ढवळुन निघत होते...

थोड्यावेळातच फोन च्या रिंग ने तो भानावर आला.. हा नक्की तिचाच फोन, त्याने विचार केला... काय सांगणार आपण तिला, कसं सांगणार, पुढे काय करायचं असा प्रश्न तिने विचारल्यावर काय उत्तर देणार मी.....

"हॅलो, "

"मी बोलतेय.."

"... बोल " त्याच्या तोंडुन शब्द फुटत नव्हता..

".. अरे काय झालं.. "

"तु मला भेटु शकतेस का आत्ता "..

"आत्ता, बघते प्रयत्न करुन, पन काय झालं सांगशिल की नाही.."

"ते भेटल्यावरच सांगेन पण लवकरात लवकर \'तिथे\' ये "...

थोड्याच वेळात ते दोघेही त्या ठिकाणी आले.. तिने आल्याबरोबर त्याच्या चेहर्‍याकडे बघुन काय झालं असवं ते ओळखले, त्याला काय बोलावं ते सुचत नव्हत, आणी डोळे भरुन आले होते,.. तिच्या ह्रदयाची धड धड वाढली होती, कुठल्याश्या अनामीक शंकेने तिचे मन ग्रासले गेले..

"अरे, काय झालं "

"......"

"बोल ना काय झालं., लवकर सांग ना रे,.. "

त्याने उत्तरादाखल फक्त मान हलवली...आणि ती त्याच्या कुशीत शिरली...

"नीट सांगशील काय झालं.."

"आई ने नकार दिला "

"पण का ते कळु शकेल, माझ्यात अशी कुठली कमी आहे की आईंनी न बघताच नकार दिला "

"तोच तर प्रॉब्लेम आहे ना.. आई काहिच सांगायला तयार नाही.."

तिच्या डोळ्यातुन धारा यायला सुरुवात झाली, बराच वेळ त्या दोघांची अवस्था तशीच राहीली.. भानावर येत तिने निर्धाराने प्रश्न केला

"मग आता काय विचार केलायस तु... "

"माझ मन खुप अशांत आहे गं, मी खुप विचार केला, आणि आपण पळुन जाण्यावाचुन गत्यंतर नाही, असं माझं मत झालं., तुला काय वाटते.."

"पळुन जावुन लग्न... " तिला हे अगदीच अनपेक्षीत नव्हते, तरीही तिला आश्चर्याचा धक्का बसलाच..

"काय गं काय झालं माझ्यावर विश्वास नाही का.."

"तसं नाही रे माझा तुझ्यावर आणि तुझ्या कर्तुत्वावर पुर्ण विश्वास आहे पण..."

"पण काय .."

"विचार करावा लागेल रे, खरं म्हणजे आपण या पुर्वी अनेकदा बोललो आहे तुला आठवतं ते... " तिने बोलायला सुरुवात केली..

"अरे पळुन जावुन लग्न करायला माझी काही सुद्धा हरकत नाही., माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे, पण म्हणुन तरीही मला हा विचारच पटत नाही. अरे बरेचसे लोक घेतात हा निर्णय, पण म्हणुन हा निर्णय आपण आंधळेपणाने तसाच स्विकारायचा. या विचाराची एक दुसरी बाजु कुणिच का लक्षात घेत नाही. कुणा दोघांचं एकमेकांवर खुप प्रेम बसतं आणि घरातुन नकार मिळाल्यामुळे ते पळुन जावुन लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण ते कधी त्याच्या पुढे जावुन विचार करतात, नाही. त्यांचं प्रेम त्यांना आंधळं बनवतं. कधी विचार करतात त्या आई बापा चा ज्याने वयाची वीस पंचवीस वर्षे आपल्याला वाढवलेलं असतं, आणि आपल्या सुखासाठी त्यांनी जीवनभर केवळ कष्टच केलेल असतात, असा आई बाबांना केवळ त्यांचा आपल्या प्रेमा साठी सोडुन जायचं. कितीही प्रेम असलं दोन जीवांचं एकमेकावर तरी ते लग्न करण्याचा निर्णय घेतात, कशासाठी, सुखी होण्यासाठीच ना, म्हणजे हा एक प्रकारचा स्वार्थच. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी देवतासमान आई बापांना दुख देणं कितपत योग्य आहे,.. काही प्रेमी जोडप्यांना लग्नानंतर स्विकारलं जातं तेंव्हा त्यांना वाटतं आपला विजय झाला पण त्यांचा झाला असतो तो पराभव., आई बाप त्यांना स्विकारतात ते केवळ त्या दोघांच्या सुखासाठी. आठवतं आपण प्रत्येकाने लहाणपणी एक निश्चय केलेला असतो, की आपण मोठे झाल्यावर आपल्या आईला नेहमी सुखी ठेवु म्हणुन, मग अरे केवळ आपल्याला सुख मिळावं म्हणुन त्यांना त्रास देण्यात कसलं आलयं प्रेम. प्रेम जरुर करावं माणसानं, आणि प्रेम विवाह सुद्धा करावा, पण तोच विवाह जर सर्वांच्या संमतीने झाला तरच त्याला अर्थ आहे. हे बघ हवं तर आपण घरी चर्चा करु, आपल्या प्रेमाचं महत्व पटवुन देउ, शक्य तेवढे प्रयत्न करु, आपण दोघे एकमेकांनाच परिपुर्ण कसे ठरु शकु हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करु, शक्य ते सर्व काही करु.पण हे सगळे केल्यानंतरही तुझी आई मला स्विकारणार नसेल तर.... " बोलता बोलता तिचा स्वर अडखळला..

"तर तर आपण विभक्त होउन जाउ. तु म्हणत असशिल कीती निर्दयी आहे मी हो ना.. पण अरे हाच साधक बाधक विचार आहे, आपलं प्रेम शरीराच्या बंधनात कधिच नव्हत, आणि म्हणुनच आपण शरीराने लग्न करुन एकत्र आलो किंवा नाही आलो तरी आपलं तरलं प्रेम आपल्याला नक्कीच सोबत राहील. मला ठावुक आहे की माझ्या शिवाय तु आणि तुझ्याशिवाय मी अशी कल्पना सुद्धा करवत नाही, पण आपल्या समोर सध्या तेवढा एकच पर्याय अहे. काही मुर्ख लोक प्रेमात यशस्वी नाही झाले की जीव देण्याचा मार्ग निवडतात, त्यांच्या विचारांची मला कीव येते. अरे जीवन संपविण्यात कसलं आलय प्रेम, हिम्मत असेल तर, एकमेकांच्या प्रेमात आणि आठवणीत आयुष्य जगवुन दाखवा. हे बघ तु सुद्धा यावर विचार कर.. पण मला तरी हाच एक मार्ग दिसतो आहे या परिस्थीतीत.."

तो तिचे विचार ऐकुन स्तब्ध झाला, आपल्याला नेमके काय होत होते ते त्याला कळले. आणि आपल्या दोघांचे विचार इतके कसे जुळतात याचे त्याला राहुन राहुन आश्चर्य वाटत होते. ... त्याने सर्व मार्गाने प्रयत्न करुन सुद्धा त्याच्या घरुन परवानगी मिळाली नाही म्हणुन मग त्यांनी आपण ठरवलेला मार्ग निवडण्याचे ठरवले.

त्यांची शेवटची, एका अर्थाने शेवटचीच, भेट त्यांच्या जीवनात अविस्मरणिय होणार होती.. त्या दिवशी ते बराच वेळ बसुन होते. दोघेही एकमेकांना डोळ्यात साठवत होते, पण आधीच अश्रुंनी भरुन गेलेल डोळे ते सुद्धा धड करु देत नव्हते.

"का नियती ला हे मंजुर नसावे " तो

"अरे तुच सांगत असतोस ना, बी पॉझीटिव्ह म्हणुन, मग आताही तुझा तो विचार तसाच राहु दे, " ती एवढे म्हणाली खरी, पण आता तीच्याही भावनांचा बांध फुटला, आणि त्याच्या कुशीत येउन तिने अश्रुंना मोकळि वाट करुन दिली. आपल्यावर एवढी प्रेम करणारी व्यक्ती, अशी अचानक दुरावणार हे सत्य दोघांनाही पचवीता येत नव्हते, पण अर्थात तो त्यांनीच निवडलेला मार्ग होता. असा वेगळाच मार्ग निवडतांना त्यांना त्रास झाला होता निश्चितच पण इतरांच्या सुखासाठी स्वतःच सुख नाकारण यातच त्यांच्या प्रेमाची परिपुर्णता होती..

... ती ला थोड्याच दिवसात लग्न करावे लागले, तो ही त्याच मार्गावर आहे. त्याच्या जीवनात मधल्या काळत बरेच सकारात्मक बदल घडले पण दुर्दैवाने ते ऐकण्यासाठी ती नव्हतीच. पुर्वी दिवसातुन किमान एकदा होणार त्यांचा संवाद आता खुंटला आहे, तरीही त्याने आपला मोबाईल नंबर बदलला नाही, हीच अपेक्षा बाळगुन कदाचीत तिला कधी माझी गरज पडली तर मी उप्लब्ध असेन..

आज दोघेही जगताहेत, एकमेकांच सुख जपत इतरांच सुख जपत.. अशाच वेळी गदिमांच्या त्या ओळी खर्‍या होतात

दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ...

सुभाष डिके

1 comment:

Unknown said...

Jane kyo is jahaan me aaisa hota hai,khushi jo de wahi rota hai,umar phar sath nibha na sake jane kyo pyar usise hota hai...